१० इच्छुकांनी भरले १८ नामांकन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2019 10:51 PM2019-03-25T22:51:40+5:302019-03-25T22:51:59+5:30
गडचिरोली-चिमूर या अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी राखीव लोकसभा मतदार संघात नामांकन दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी ६ उमेदवारांनी अर्ज भरले. त्यामुळे अर्ज भरणाऱ्यांची एकूण संख्या १० झाली आहे. त्यांचे एकूण १८ अर्ज निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे आले आहेत. त्या अर्जांची मंगळवारी छाननी होऊन वैध अर्ज काढले जाणार आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : गडचिरोली-चिमूर या अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी राखीव लोकसभा मतदार संघात नामांकन दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी ६ उमेदवारांनी अर्ज भरले. त्यामुळे अर्ज भरणाऱ्यांची एकूण संख्या १० झाली आहे. त्यांचे एकूण १८ अर्ज निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे आले आहेत. त्या अर्जांची मंगळवारी छाननी होऊन वैध अर्ज काढले जाणार आहेत.
नामांकन दाखल करणाºया उमेदवारांमध्ये एकूण उमेदवारांमध्ये डॉ.नामदेव उसेंडी (भारतीय राष्ट्रीय काँग्रेस), अशोक नेते (भारतीय जनता पार्टी), देवराव नन्नावरे (आंबेडकराईट पार्टी आॅफ इंडिया), रमेशकुमार गजबे (वंचित बहुजन आघाडी), नामदेव किरसान (अपक्ष), दामोधर नेवारे (अपक्ष), सुवर्णा वरखडे (गोंडवाना गणतंत्र पार्टी), दिवाकर पेंदाम (बहुजन मुक्ती पार्टी), हरिचंद्र मंगाम व पवन रामचंद्र मगरे (बहुजन समाज पार्टी) यांचा समावेश आहे. मंगाम व मगरे यांनी बसपाकडून नामांकन दाखल केले असले तरी दोघांपैकी कोण अधिकृत हे रात्रीपर्यंत निवडणूक विभागाकडून स्पष्ट करण्यात आले नव्हते. दरम्यान लोकमतने बसपा पदाधिकाऱ्यांशी संपर्क केला असता मंगाम हेच अधिकृत उमेदवार असून त्यांच्या नावाचा एबी फॉर्म निवडणूक विभागाला दिला असल्याचे सांगण्यात आले.
शुक्रवार दि.२२ ला काँग्रेसचे डॉ.नामदेव उसेंडी यांनी आघाडीतील घटक पक्षांच्या नेत्यांना सोबत घेऊन शक्तीप्रदर्शन करत नामांकन दाखल केले होते. त्याच दिवशी भाजपचे उमेदवार व विद्यमान खासदार अशोक नेते यांनीही नामांकन भरले पण त्यावेळी कोणताही गाजावाजा केला नव्हता. त्यामुळे सोमवारी पुन्हा नव्याने नामांकन भरताना त्यांनी खुल्या जीपवरून अभिवादन करत जिल्हाधिकारी कार्यालय गाठले. यावेळी लोकसभा क्षेत्रातील आ.डॉ. देवराव होळी, आ.कृष्णा गजबे, आ.संजय पुराम, आ.बंटी भांगडिया तथा आ.रामदास आंबटकर, प्रमोद पिपरे, तसेच शिवसेनेच्या वतीने विजय श्रुंगारपवार व अरविंद कात्रटवार उपस्थित होते. काही वेळानंतर पालकमंत्री अम्ब्रिशराव आत्राम आणि त्यानंतर अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनीही गडचिरोली गाठून भाजपच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.
जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकारांना प्रवेशबंदी!
निवडणुकीच्या काळातील दैनंदिन घडामोडींची माहिती घेण्यासाठी नेहमीप्रमाणे सोमवारी (दि.२५) पत्रकार जिल्हाधिकारी कार्यालयात गेले असता त्यांना प्रवेशद्वारावरच अडवण्यात आले. नामांकन प्रक्रिया सुरू असल्यामुळे पत्रकारांना प्रवेश न देण्याचा आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी दिल्याची माहिती तेथे कर्तव्यावर असलेल्या पोलीस उपनिरीक्षकाने दिली. विशेष म्हणजे ही प्रवेशबंदी सायंकाळपर्यंत कायम होती. कोणतेही कारण न देता किंवा विश्वासात न घेता लादलेल्या या प्रवेशबंदीचा गडचिरोली प्रेस क्लबने निषेध व्यक्त केला.
निवडणुकीसाठी उमेदवारांनी नामांकन दाखल करणे ही बाब गोपनिय नाही. असे असताना तिथे पत्रकारांना प्रवेश का नाकारण्यात आला? याबाबत वेगवेगळ्या अधिकाऱ्यांकडून जाणून घेण्याचा प्रयत्न केला, परंतू कोणाकडेही त्याचे उत्तर नव्हते. जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश आहे एवढेच त्यांना माहीत होते. जिल्हाधिकारी शेखर सिंग यांनाही भ्रमणध्वनीवर संपर्क केला, मात्र त्यांनी कॉलच स्वीकारला नाही. इतर कोणत्याही लोकसभा मतदार संघांत अशा पद्धतीने पत्रकारांना प्रवेशबंदी केली नसताना गडचिरोलीत घडलेला हा प्रकार लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाला अपमान असल्याची भावना तमाम पत्रकारांनी व्यक्त केली. विशेष म्हणजे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात इतरही विभागांचे कार्यालय आहे. पण प्रवेशबंदीमुळे कोणत्याच कार्यालयात पत्रकारांना जाणे शक्य होत नव्हते.
मीडिया सेल गायब
निवडणुकीच्या काळात जिल्हाधिकारी कार्यालयात प्रसार माध्यमांसाठी स्वतंत्र मीडिया सेल कार्यरत राहणार असल्याचे जिल्हाधिकाºयांनी पत्रकार परिषदेत सांगितले होते. पण तो सेल गायब आहे. प्रसार माध्यमांना कोणत्याही बातम्या पुरविल्या जात नाही. सर्वात महत्वाचे म्हणजे निवडणूक काळात यापूर्वीच्या निवडणुकांचा गोषवारा देणारी पूर्वपिठीका काढली जाते. पण यावेळी अशी कोणतीही माहिती प्रकाशित करण्यात आली नाही.