१९ मडकी मोहसडवा व दारू नष्ट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2019 10:31 PM2019-03-20T22:31:33+5:302019-03-20T22:31:58+5:30
तालुक्यातील परसवाडी टोला येथे मुक्तिपथ गाव संघटनेने अहिंसक कृतीद्वारे २० दारूविक्रेत्यांना नोटीस दिली. सहा जणांच्या घराची झडती घेत व आसपासच्या शिवारात शोधमोहीम राबवून १९ मडके मोहसडवा आणि गावठी दारू जप्त करून ती मंगळवारी नष्ट केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
आरमोरी : तालुक्यातील परसवाडी टोला येथे मुक्तिपथ गाव संघटनेने अहिंसक कृतीद्वारे २० दारूविक्रेत्यांना नोटीस दिली. सहा जणांच्या घराची झडती घेत व आसपासच्या शिवारात शोधमोहीम राबवून १९ मडके मोहसडवा आणि गावठी दारू जप्त करून ती मंगळवारी नष्ट केली. सोबतच विशेष ग्रामसभेत ठराव घेऊन विक्रेत्यांना आवश्यक दाखले व रेशनकार्डचा लाभ मिळणार नसल्याचा ठराव घेतला. रोजगार हमी योजनेच्या कामावरून कमी करण्याचाही ठराव ग्रामसभेने घेतला.
परसवाडी टोला येथे मोठ्या प्रमाणात दारूविक्री होते. त्यामुळे गावातील महिला त्रस्त झाल्या होत्या. गावातील दारूविक्री बंद होण्यासाठी काही दिवसांपूर्वी मुक्तिपथ गाव संघटनेद्वारे दारूबंदी संदर्भात विशेष ग्रामसभा घेतली. या ग्रामसभेत दारूविक्री बंद करण्याचा ठराव घेण्यात आला.
गावात २० दारूविक्रेते असल्याचे या सभेत निदर्शनास आले. त्यांच्याविरोधात कठोर कृती करून सर्वांना विक्री बंद करण्याबाबत वैयक्तिक नोटीस देण्यात आली. त्याचबरोबर गावात एक जाहीर नोटीस लावून दारूविक्री करताना आढळल्यास ग्रामपंचायत कडून आवश्यक दाखले मिळणार नसल्याचे सांगण्यात आले.
रेशनकार्डवर मिळणाऱ्या सुविधाचा लाभही थांबविला जाणार असून विक्रेत्यांना रोजगार हमी योजनेच्या कामावरूनही कमी करण्यात आले.
कठोर कृती करूनही यातील सहा विक्रेत्यांनी दारूविक्री सुरूच ठेवली. त्यामुळे गाव संघटनेने त्यांच्या घरी धाड मारली. सोबतच जवळच्या शिवारात शोधमोहीम राबवून १९ मडकी मोहसडवा आणि तीन डबकी दारू सापडली.
दारू गळण्याचे साहित्य आणि जप्त केलेली दारू संघटनेने नष्ट केली. जवळपास ५० गावकरी या अहिंसक कृतीत सहभागी झाले होते.
महिलेच्या घरी सापडली ३० लिटर दारू
परसवाडी टोला गावात महिला दारूविक्रेत्यांची संख्याही मोठी आहेत. यातील एका महिलेच्या घरी धाड मारली असता ३० लिटर मोहाची दारू व १ ड्रम सडवा सापडला. दारू आणि सर्व साहित्य नष्ट करून या महिलेला दारूविक्री बंद करण्याबाबत समज देण्यात आली.