१९ टक्के खतांचे नमुने निघाले बोगस!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2018 11:25 PM2018-04-19T23:25:47+5:302018-04-19T23:25:47+5:30
शेतकऱ्यांचे वर्षभराचे बजेट अवलंबून असलेल्या खरीप व रबी हंगामातील पीक चांगले यावे यासाठी शेतकरी शेतात मोठे कष्ट घेतात. पण काही खत, बियाणे व कीटकनाशक कंपन्या शेतकऱ्यांच्या माथी बोगस माल मारून त्यांच्या स्वप्नांवर पाणी फेरत आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : शेतकऱ्यांचे वर्षभराचे बजेट अवलंबून असलेल्या खरीप व रबी हंगामातील पीक चांगले यावे यासाठी शेतकरी शेतात मोठे कष्ट घेतात. पण काही खत, बियाणे व कीटकनाशक कंपन्या शेतकऱ्यांच्या माथी बोगस माल मारून त्यांच्या स्वप्नांवर पाणी फेरत आहेत. २०१७-१८ या आर्थिक वर्षात कृषी विभागाने घेतलेल्या खतांच्या ३४८ नमुन्यांपैकी तब्बल ६६ नमुने अप्रमाणित निघाले. मात्र त्या सर्व कंपन्या, विक्रेत्यांवर कडक कारवाई करण्याऐवजी कृषी विभागाने १४ विक्रेत्यांवर कारवाई करीत ३९ नमुन्यांसाठी संबंधितांना केवळ ताकिद देऊन अभय दिले.
खतांचे ६६ नमुने (एकूण खतापैकी १९ टक्के) अप्रमाणित, अर्थात बोगस निघाले. त्या खतांमध्ये अपेक्षित गुणांची मात्र कमी आढळली. त्यामुळे ते खत वापरल्यानंतरही त्याचा अपेक्षित लाभ शेतकऱ्यांना झाला नाही. परिणामी त्यांना पीकांच्या उत्पन्नात नुकसान सहन करावे लागले. रासायनिक खत विक्री करणाऱ्या १४ विक्रेत्यांविरूद्ध अप्रमाणित बियाणेप्रकरणी न्यायालयात प्रकरण दाखल करण्यात आले आहे. २२ विक्रेत्यांंचा खतांचासाठा सील करून विक्रीबंदीचे आदेश देण्यात आले.
गेल्या हंगामात बियाण्यांचे ५१० नमुने काढण्यात आले. त्यापैकी १० नमुने अप्रमाणित आढळले. त्यापैकी ४ नमुने न्यायालयीन खटल्यासाठी पात्र ठरवून ६ जणांना ताकीद देण्यात आली. ४ जणांना विक्रीबंदीचे आदेश देण्यात आले. याशिवाय कीटकनाशकांचे १२१ नमुने काढण्यात आले. त्यापैकी ५ नमुने अप्रमाणित आढळले तर २९ जणांना नियमांचे पालन न केल्याबद्दल विविध कारणांसाठी विक्री बंदीचे आदेश देण्यात आले.
जिल्ह्यात गेल्या हंगामात एक गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक, २० अर्धवेळ गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक, १५ जिल्हा परिषदेचे अर्धवेळ गुणवत्ता निरीक्षक असे ३५ गुणनियंत्रण निरीक्षक कार्यरत आहेत. जिल्ह्यात असलेल्या बियाण्यांच्या २७९, रासायनिक खत विक्रीच्या ५०० आणि कीटकनाशक विक्रीच्या २३३ परवानाधारक विक्री केंद्रांचे निरीक्षण, तपासणी करण्याची त्यांची जबाबदारी आहे. गेल्यावर्षी जिल्हा पातळीवर १, तालुकास्तरावर १२ अशी एकूण १३ दक्षता पथकांची स्थापना करण्यात आली होती.
१३ तक्रार निवारण कक्ष
सन २०१८-१९ या आर्थिक वर्षासाठी शेतकऱ्यांना योग्य दर्जा व गुणवत्तेचा कृषी माल मिळावा यासाठी प्रत्येक तालुकास्तरावर एक आणि जिल्हास्तरावर एक अशी १३ भरारी पथके आणि शेतकऱ्यांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी १३ तक्रार निवारण कक्षांची स्थापना करण्यात आली आहे. यावर्षी बियाण्यांचे ५९०, रासायनिक खतांचे ३०६ तर कीटकनाशकांचे १२१ नमुने घेण्याचे लक्ष्यांक देण्यात आले आहेत.