कोरची रुग्णालयात १९ पदे रिक्त

By admin | Published: May 21, 2017 01:29 AM2017-05-21T01:29:35+5:302017-05-21T01:29:35+5:30

येथील ग्रामीण रुग्णालयात डॉक्टर व आरोग्य कर्मचाऱ्यांची सुमारे २७ पदे मंजूर आहेत.

19 posts vacant in Corchi's hospital | कोरची रुग्णालयात १९ पदे रिक्त

कोरची रुग्णालयात १९ पदे रिक्त

Next

एकही नियमित डॉक्टर नाही : रेफर टू गडचिरोलीमुळे रुग्ण त्रस्त
लोकमत न्यूज नेटवर्क
कोरची : येथील ग्रामीण रुग्णालयात डॉक्टर व आरोग्य कर्मचाऱ्यांची सुमारे २७ पदे मंजूर आहेत. मात्र यापैकी केवळ ८ आरोग्य कर्मचाऱ्यांची पदे भरण्यात आली आहेत. उर्वरित १९ पदे रिक्त आहेत. विशेष म्हणजे या रुग्णालयात एकही नियमित वैद्यकीय अधिकारी नाही. त्यामुळे तालुक्यातील रुग्णांचे मोठे हाल होत आहेत.
गडचिरोली जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या कोरची ग्रामीण रुग्णालयाच्या क्षेत्रात सुमारे ६० हजार लोकसंख्या आहे. कोरची तालुक्याची सीमा छत्तीसगड राज्याला लागून असल्याने येथील नागरिकांना कोरची ग्रामीण रुग्णालयाशिवाय इतर कोणताही रुग्णालय उपलब्ध नाही. तालुकास्तरावर असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र व आरोग्य पथकामध्ये सोयीसुविधांचा अभाव आहे. याही रुग्णालयांमध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांची अनेक पदे रिक्त आहेत. त्यामुळे प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये भरती झालेल्या रुग्णाला सर्वप्रथम ग्रामीण रुग्णालयात रेफर केले जाते. कोरची ग्रामीण रुग्णालयातही वेळेवर डॉक्टर व आरोग्य कर्मचारी उपस्थित राहत नाही व पाहिजे तेवढ्या सुविधाही उपलब्ध नाही. त्यामुळे त्या रुग्णाला नागपूर किंवा गडचिरोली येथे हलविण्याचा सल्ला दिला जातो. कोरची ते गडचिरोलीपर्यंतचे अंतर जवळपास १०० किमी आहे. एवढ्या प्रवासादरम्यान रुग्ण दम तोडण्याची शक्यता आहे.
कोरची ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधीक्षक, वैद्यकीय अधिकारी, परिचारिका, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, अधिपरिचारिका, परिचारिका आदींची सुमारे २७ पदे मंजूर आहेत. ग्रामीण भागातील महिला ग्रामीण रुग्णालयात प्रसूतीसाठी दाखल होतात. मात्र या ठिकाणी स्त्री रोगतज्ज्ञ व बालरोग तज्ज्ञ यांची पदे रिक्त आहेत. त्यामुळे गरोदर मातेवर वेळेवर उपचार होत नाही. चार दिवसांपूर्वी जिल्हा परिषद सदस्य अनिल केरामी यांनी कोरची ग्रामीण रुग्णालयाला भेट देऊन सोयीसुविधा व रिक्त पदांचा आढावा घेतला असता, या सर्व बाबी उघड झाल्या आहेत.
कोरची तालुक्यातील रुग्णांना ७० ते १०० किमी अंतरावर असलेल्या ब्रह्मपुरी, गोंदिया किंवा गडचिरोली येथे जावे लागते. गरीब रुग्ण शहरात जाऊन उपचार घेऊ शकत नाही. मागील अनेक वर्षांपासून कोरची रुग्णालयाला लागलेले रिक्तपदांचे ग्रहण अजूनही कायम आहे. रिक्तपदे भरण्यासंदर्भात लोकप्रतिनिधींनी अजूनपर्यंत प्रयत्न चालविले नसल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे. दरवर्षी कोरची तालुक्यात मलेरियाची साथ पसरते. त्यावेळेवर येथील परिस्थिती अत्यंत बिकट होते. त्यामुळे येथील रिक्तपदे भरण्यात यावी, अशी मागणी होत आहे. आंदोलन करण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे.

डॉ. तलमले यांच्याकडे प्रभार
कोरची ग्रामीण रुग्णालयात एकही नियमित वैद्यकीय अधिकारी नाही. या रुग्णालयाचा प्रभार प्राथमिक आरोग्य केंद्र बेतकाठीचे डॉ. तलमले यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. दोन्ही रुग्णालयात सेवा देऊन प्रशासकीय कामे सांभाळताना त्यांच्याही नाकी नऊ येत आहे. वेळेवर वैद्यकीय अधिकारी उपस्थित राहत नसल्याने वेळप्रसंगी आपल्या अनुभवाप्रमाणे येथील आरोग्य कर्मचारी रुग्णावर प्राथमिक उपचार करून त्याला गडचिरोली किंवा कुरखेडा येथे हलविण्याचा सल्ला दिला जातो. बहुतांश रुग्णांना रेफर केले जात असल्याने रुग्ण कमालीचे त्रस्त झाले आहेत. रिक्तपदांमुळे आरोग्य सेवा पूर्णपणे ढेपाळली आहे.

 

Web Title: 19 posts vacant in Corchi's hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.