राज्यातील ९१ हजार लाभार्थी अनुदानाच्या प्रतीक्षेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 3, 2020 04:44 AM2020-03-03T04:44:07+5:302020-03-03T04:44:11+5:30
रमाई घरकूल योजनेंतर्गत २०१९-२० या आर्थिक वर्षात राज्यभरात सुमारे ९१ हजार ५५७ घरकुलांना मंजुरी दिली होती.
दिगांबर जवादे
गडचिरोली : रमाई घरकूल योजनेंतर्गत २०१९-२० या आर्थिक वर्षात राज्यभरात सुमारे ९१ हजार ५५७ घरकुलांना मंजुरी दिली होती. मात्र, आर्थिक वर्ष संपण्याच्या मार्गावर असताना अजूनपर्यंत एकाही लाभार्थ्याला पहिला हप्ता मिळाला नाही. त्यामुळे मंजूर झालेल्या घरकुलांचे काम रखडले आहे.
अनुसूचित जातीच्या लाभार्थ्यांना रमाई घरकूल योजनेंतर्गत अनुदान दिले जाते. या योजनेंतर्गत दरवर्षी राज्यभरात सुमारे १० हजार घरकूल बांधण्याचे उद्दिष्ट राहात होते. मात्र २०१९-२० या आर्थिक वर्षात तब्बल ९१ हजार ५५७ घरकूल बांधण्याचे रेकॉर्डब्रेक उद्दिष्ट देण्यात आले. वाढलेले उद्दिष्ट बघून प्रशासकीय यंत्रणा सुध्दा आश्चर्यचकीत झाली होती. सोबतच बेघर अनुसूचित जातीच्या लाभार्थ्यांच्या हक्काचा निवारा मिळण्याच्या आशाही पल्लवित झाल्या होत्या. पण, प्रत्यक्ष अनुदानच मिळाले नसल्यामुळे घोर निराशा झाली आहे.
घरकूल बांधकामासाठी चार हप्त्यांमध्ये अनुदान दिले जाते. घरकुलाला मंजुरी मिळाल्यानंतर पहिला हप्ता पावसाळ्यापूर्वी मिळेल, अशी अपेक्षा होती. पण आर्थिक वर्ष संपण्यासाठी जेमतेम महिनाभराचा कालावधी शिल्लक असताना राज्यभरातील एकाही लाभार्थ्याच्या खात्यात अनुदान जमा करण्यात आलेले नाही.
>तांत्रिक अडचणीमुळे अनुदान थांबले आहे. निधी मर्यादित असल्यामुळे आधी २०१८-१९ च्या लाभार्थ्यांना अनुदान देण्याचे निर्देश आहेत. त्यांचे वाटप झाले की २०१९-२० च्या लाभार्थ्यांसाठी अनुदान मिळेल.
- विश्वास सलामे, सहायक प्रकल्प संचालक, डीआरडीए, गडचिरोली