सुविधा फार्मिंग कंपनीकडून १० कोटींनी फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2019 12:04 AM2019-08-01T00:04:43+5:302019-08-01T00:05:20+5:30
सिक्युरिटीज अॅन्ड एक्स्चेंज बोर्ड आॅफ इंडिया (सेबी)कडून मनाई असताना सुविधा फार्मिंग कंपनीच्या संस्थापक व संचालकांनी नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात ठेवी स्वीकारल्या. नंतर गडचिरोली येथील शाखा कार्यालय बंद करून १० कोटी रुपयांनी नागरिकांची फसवणूक केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : सिक्युरिटीज अॅन्ड एक्स्चेंज बोर्ड आॅफ इंडिया (सेबी)कडून मनाई असताना सुविधा फार्मिंग कंपनीच्या संस्थापक व संचालकांनी नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात ठेवी स्वीकारल्या. नंतर गडचिरोली येथील शाखा कार्यालय बंद करून १० कोटी रुपयांनी नागरिकांची फसवणूक केली. याप्रकरणी गडचिरोली पोलीस ठाण्यात कंपनीच्या संस्थापकासह दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला.
विनोदकुमार जमनाप्रसाद शंखवार व राजेंद्रकरण शंकरलाल राजपूत दोघेही रा.रायपूर (हल्ली मुक्काम देहरादून, उत्तराखंड) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. भोपाळ येथील सुविधा फार्मिंग अॅण्ड अलॉईड कंपनीचा संस्थापक विनोदकुमार शंखवार याने गडचिरोली येथील बट्टुवार कॉम्प्लेक्समध्ये भाड्याने जागा घेऊन तिथे कंपनीचे शाखा कार्यालय सुरू केले होते. या ठिकाणी अभिकर्त्यामार्फत ठेवीदारांकडून मोठ्या प्रमाणात रकमा गोळा केल्या. अधिक कमिशन देण्याचे आमिष दाखविल्याने अनेक गुंतवणुकदारांनी या कंपनीत पैसे गुंतविले.
विशेष म्हणजे या कंपनीला अशा पद्धतीने ठेवी स्वीकारून व्यवहार करण्यासाठी सेबीने मनाई केली होती. तरी सुद्धा या कंपनीच्या संस्थापकाने लोकांची आर्थिक फसवणूक केली. त्यानंतर दोन्ही आरोपी पसार झाले. या प्रकाराच्या तक्रारी वाढल्यानंतर आरोपींच्या विरोधात गडचिरोली पोलीस ठाण्यात भादंविचे कलम ४२०, ४०६, ४०९, १२० ब, ३४ अन्वये २० जुलै रोजी गुन्हा दाखल केला. दरम्यान गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन गडचिरोली पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला. तपासाअंती दोन्ही आरोपींनी जवळपास १० कोटी रुपयांची नागरिकांची फसवणूक केल्याचे निष्पन्न झाले.
दोघांविरूद्ध अटक वॉरंट
विनोदकुमार शंखवार व राजेंद्रकरण राजपूत या दोन्ही आरोपींविरोधात उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने अटक वॉरन्ट जारी केला आहे. सदर आरोपी कुठे दिसून आल्यास अथवा त्यांच्या राहण्याच्या ठिकाणाबाबत माहिती असल्यास तपास अधिकाऱ्याच्या ९८२३३९७२५५ व पोलीस नियंत्रण कक्ष ०७१३२-२२२१०० या क्रमांकावर नागरिकांनी संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे.