रेल्वेला २ लाख ७० हजारांचा फटका

By admin | Published: March 31, 2017 01:04 AM2017-03-31T01:04:32+5:302017-03-31T01:04:32+5:30

दक्षिण पूर्व मध्यरेल्वे अंतर्गत गडचिरोली शहरात सुरू करण्यात आलेल्या रेल्वे आरक्षण केंद्राला सात दिवसांपासून लिंक फेलमुळे ...

2 lakh 70 thousand people hit the train | रेल्वेला २ लाख ७० हजारांचा फटका

रेल्वेला २ लाख ७० हजारांचा फटका

Next

सहा दिवसापासून लिंक फेल : गडचिरोलीतील आरक्षण केंद्रातील दोष बीएसएनएलला सापडला नाही
गडचिरोली : दक्षिण पूर्व मध्यरेल्वे अंतर्गत गडचिरोली शहरात सुरू करण्यात आलेल्या रेल्वे आरक्षण केंद्राला सात दिवसांपासून लिंक फेलमुळे मोठ्या प्रमाणावर आर्थिक फटका बसला आहे. सहा दिवस उलटूनही भारत संचार निगमला येथील दोष अजूनही सापडलेला नसल्याने रेल्वे आरक्षण केंद्राचे काम पूर्णपणे ठप्प पडले आहे. मागील शुक्रवारपासून लिंक फेल झाली असून रेल्वे आरक्षण केंद्रावर तिकीट घेण्यासाठी येणाऱ्या प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे.
गडचिरोली जिल्ह्यात वडसा देसाईगंज हे रेल्वे स्थानक असून गडचिरोली येथे तत्कालीन खासदार व विद्यमान केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहीर यांच्या पुढाकारातून रेल्वे आरक्षण केंद्र नगर पालिका इमारतीच्या परिसरात सुरू करण्यात आले. सुरूवातीला सकाळी ८ ते दुपारी २ वाजेपर्यंत सोमवार ते शुक्रवार हे आरक्षण केंद्र सुरू राहत होते. त्यानंतर आता खासदार अशोक नेते यांच्या प्रयत्नामुळे या आरक्षण केंद्राचा वेळ एक तासाने वाढवून दुपारी ३ वाजेपर्यंत करण्यात आला आहे. या रेल्वे आरक्षण केंद्रावर जिल्ह्याच्या विविध भागातून नागरिक आरक्षित तिकीट मिळविण्यासाठी येतात. दररोज रेल्वे आरक्षण केंद्राची उलाढाल ४० ते ४५ हजार रूपयांची आहे. मात्र आता उन्हाळ्याचा सिजन सुरू झाल्याने आरक्षण केंद्रावर दररोज गर्दी दिसून येत आहे. गेल्या शुक्रवारपासून रेल्वे आरक्षण केंद्रातील इंटरनेट सेवेत दोष निर्माण झाला असल्याने लिंक फेल झालेली आहे. येथील रेल्वे विभागाचे अधिकारी प्रशांत वैद्य यांनी लेखी व तोंडी स्वरूपात भारत संचार निगमच्या अधिकाऱ्यांना याबाबत कळविल्यानंतर दोन ते तीन दिवसाने दोष शोधण्याचे काम सुरू करण्यात आले. अजूनपर्यंत दोष सापडला नाही.
बीएसएनएलचे पथक येथे बुधवारी काम करीत होते. परंतु त्यांना दोष मिळाला नाही. त्यामुळे मागील रविवार वगळता सहा दिवसात रेल्वे आरक्षण केंद्राला २ लाख ७० हजार रूपयांचा आर्थिक फटका बसला आहे. तत्काळ व सर्वसाधारण कोणतेच रिर्झवेशन लिंक फेल असल्याने मिळू शकत नाही. त्यामुळे रेल्वे आरक्षण केंद्राच्या अधिकाऱ्याचीही गोची झाली आहे. तिकीट घेण्यासाठी येणारे नागरिक केवळ चौकशी करून परत जात आहे. काहींना चंद्रपूर तर काहींना देसाईगंज येथे जाऊन तिकीट काढण्याची पाळी आली आहे. भारत संचार निगमने तत्काळ या आरक्षण केंद्रावरील लिंकचा दोष दूर करण्यासाठी उपाययोजना करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. (जिल्हा प्रतिनिधी)

मागील शुक्रवारपासून रेल्वे आरक्षण केंद्रातील लिंक फेल झाली आहे. त्यामुळे कुठल्याच प्रकारचे आरक्षण तिकीट येथून निघत नाही. बीएसएनएलचे कर्मचारी दोष शोधण्यासाठी येऊन गेलेत. परंतु त्यांना दोष सापडला नाही. दररोज ४० ते ४५ हजार रूपयांच्या तिकीटा येथून काढल्या जातात. आता पूर्ण काम ठप्प झाले आहे. याबाबत आपण रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळविले आहे.
- प्रशांत वैद्य, अधिकारी, रेल्वे तिकीट आरक्षण केंद्र गडचिरोली

Web Title: 2 lakh 70 thousand people hit the train

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.