गडचिरोली पोलिसांची मोठी कारवाई; १० लाखांचे बक्षीस असलेल्या दोन जहाल नक्षलवाद्यांना अटक
By मनोज ताजने | Published: October 8, 2022 02:39 PM2022-10-08T14:39:45+5:302022-10-08T14:49:55+5:30
पीपीसीएम सनीरामचा समावेश
गडचिरोली : जिल्ह्याच्या उत्तर भागात मोडीत काढलेल्या नक्षल चळवळीला पुन्हा सक्रिय करण्याच्या प्रयत्नात असलेल्या नक्षल्यांच्या कंपनी १० चा प्लाटून पार्टी कमिटी मेंबर (पीपीसीएम) सनीराम याच्यासह आणखी एका नक्षलवाद्याला गडचिरोली पोलिसांनी अटक केली आहे. यामुळे उत्तर भागात नक्षल्यांना पुन्हा एक हादरा बसला आहे. सनीराम याच्यावर ८ लाखांचे, तर सहकारी समुराम याच्यावर २ लाखांचे बक्षीस शासनाने ठेवले होते.
धानोरा उपविभागांतर्गत येणाऱ्या सावरगाव पोलीस मदत केंद्राच्या परिसरात २ संशयित व्यक्ती आल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार अधिक चौकशी केली असता ते नक्षलवादीच असल्याचे समजले. त्यावरून त्यांना अटक करण्यात आली. यात सनीराम उर्फ शंकर उर्फ कृष्णा श्यामलाल नरोटे (२४ वर्ष, रा. माेरचूल, ता. धानोरा) आणि समुराम उर्फ सूर्या घसेन नरोटे (२२ वर्ष, रा. मोरचूल, ता. धानोरा) यांचा समावेश आहे.
सनीराम हा ऑक्टोबर २०१५ मध्ये टिपागड दलममध्ये भरती होऊन डीव्हीसीएम जोगन्नाचा अंगरक्षक म्हणून २०१८ पर्यंत कार्यरत होता. त्यानंतर त्याला कंपनी १० मध्ये पाठविण्यात आले. २०२० ते आतापर्यंत तो कंपनी १० मध्ये पीपीसीएम पदावर कार्यरत होता. समुराम हा जन मिलिशिया सदस्य आहे. या दोघांचाही खून, जाळपोळ, चकमक अशा अनेक गुन्ह्यांमध्ये सहभाग आहे.
दोन वर्षांत १६ नक्षलवाद्यांना अटक
गडचिरोली पोलीस दलाने २०२० ते आतापर्यंत (दोन वर्षांत) १६ नक्षलवाद्यांना अटक केली. त्यांच्यावर शासनाने ६६ लाख रुपयांचे बक्षीस ठेवले होते. याशिवाय १ कोटी २४ लाखांचे बक्षीस असलेल्या १९ नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले. तर ५५ नक्षलवाद्यांचा पोलिसांच्या गोळीने वेध घेतला. त्या मृत नक्षलवाद्यांवर ४ कोटी १० लाखांचे बक्षीस होते.
अबुझमाडमधून मिळालेल्या संदेशानुसार रेकी
गेल्या दोन ते तीन वर्षांत उत्तर गडचिरोली भागात बऱ्याचअंशी नक्षल्यांची चळवळ मोडीत काढण्यात पोलीस दलाला यश आले. पण या भागात पुन्हा चळवळ सक्रिय करण्यासाठी काय करता येईल याची रेकी करण्यासाठी सनीराम व त्याच्या सहकाऱ्याला अबुझमाड (छत्तीसगड) येथील वरिष्ठ नक्षल नेत्यांनी पाठविले होते. पण याची कुणकुण पोलिसांना लागल्याने त्यांची योजना यशस्वी होऊ शकली नाही, असे पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. यावेळी एएसपी समीर शेख (प्रशासन), सोमय मुंडे (अभियान), अनुज तारे (अहेरी) हे अधिकारी उपस्थित होते.