गडचिरोलीतील 'ही' अतिसंवेदनशील गावं १० दिवसांपासून अंधारात; विद्युत विभाग झोपेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2022 04:43 PM2022-05-31T16:43:46+5:302022-05-31T16:50:14+5:30
दहा दिवसांपूर्वी अचानक वारा वादळ, पाऊस आल्याने विद्युत खांबांची तारे तुटून पडली यामुळे मयालघाट व मुरकुटी या गावांचा विद्युत पुरवठा खंडित झाला. तेव्हापासून या दोन्ही गावांची विद्युत सेवा पूर्णपणे ठप्प झाली आहे.
गडचिरोली : कोरची तालुक्यातील नागरिकांसाठी सध्या सर्वात मोठी डोकेदुखी बनलेली सेवा म्हणजे विद्युत सेवा. तालुक्यातील अतिसंवेदनशील आदिवासी बहुल मुरकुटी व मयालघाट या गावांमध्ये मागील दहा दिवसापासून विद्युत पुरवठा खंडित झाला आहे. याबाबत माहिती देण्यात आली असतानाही विद्युत विभाग याकडे दुर्लक्ष करत आहे. परिणामी येथील नागरिकांना उन्हाळ्यामध्ये उकाड्यात दिवस व अंधारात रात्र काढावी लागत आहे.
दहा दिवसांपूर्वी अचानक वारा वादळ, पाऊस आल्याने मयालघाट व मुरकुटी या गावांना विद्युत पुरवठा करणाऱ्या विद्युत वाहिनीवर मोठे झाड पडले. त्यामुळे दोन खांब व सहा ते सात खाबांवरची तारे तुटून खाली पडली. तेव्हापासून या दोन्ही गावांची विद्युत सेवा पूर्णपणे ठप्प झाली आहे. तसे तर कोरची तालुक्यातील नागरिकांसाठी वारंवार विद्युत सेवा खंडित होणे हे नवीन नाही. मात्र, संबंधित विभागाचे प्रभारी उपकार्यकारी अभियंता मिथिन मुरकुटे व कंत्राटदार तबरेज शेख यांना याबाबद माहिती देऊनसुद्धा विद्युत पुरवठा सुरळीत करण्याकडे सर्रास दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे.
कोरची तालुक्यातील वीज वितरण विभागाच्या विद्युत दुरुस्तीचे कंत्राट चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड येथील तबरेज शेख यांच्याकडे आहे. त्यांच्याशी फोनवरून विचारणा केली असता, विद्युत सेवा सुरळीत करण्यासाठी सध्या काम करणारे मजूर मिळत नाही. मजूर मिळाले की काम करणार, अस त्यांनी सांगितले. त्यामुळे आणखी किती दिवस येथील नागरिकांना अंधारात राहावे लागणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
कोरची येथील विद्युत विभागाचे कार्यकारी अभियंता मिथिन मुरकुटे यांच्याकडे प्रभार आहे. त्यांनी कामाला सुरुवात करायला पाहिजे होते. विद्युत पुरवठा खंडित झाले की दोन दिवसात कंत्राटदारांनी कामाला सुरुवात करायला पाहिजे होते, ठीक आहे मी कामाला सुरुवात करायला सांगतो आणि लवकरच विद्युत पुरवठा सुरळीत होईल असे फोनवरून विचारणा केली असता माहिती दिली आहे.
रवींद्र गाडगे, अधीक्षक अभियंता महावितरण गडचिरोली.