२ हजार ४०० खेळाडू दाखविणार कौशल्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2017 10:34 PM2017-12-21T22:34:36+5:302017-12-21T22:34:56+5:30
आदिवासी विकास विभाग नागपूर अंतर्गत शासकीय व अनुदानित आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांच्या नागपूर विभागीय क्रीडा संमेलनाचे आयोजन २३ ते २५ डिसेंबर दरम्यान येथील जिल्हा प्रेक्षागार मैदानावर करण्यात आले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : आदिवासी विकास विभाग नागपूर अंतर्गत शासकीय व अनुदानित आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांच्या नागपूर विभागीय क्रीडा संमेलनाचे आयोजन २३ ते २५ डिसेंबर दरम्यान येथील जिल्हा प्रेक्षागार मैदानावर करण्यात आले आहे. सदर संमेलनात नागपूर विभागाच्या आठ प्रकल्पातील शासकीय व अनुदानित आश्रशाळांचे जवळपास २ हजार ४०० खेळाडू विद्यार्थी सहभागी होऊन आपले क्रीडा व कला कौशल्य दाखविणार आहेत.
संमेलनाचे उद्घाटन आदिवासी विकास वने राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांच्या हस्ते होणार आहे. अध्यक्षस्थानी आदिवासी विकास विभागाचे प्रधान सचिव राजेशकुमार राहतील. विशेष अतिथी म्हणून खा. अशोक नेते, आ. नागो गाणार, आ. मितेश भांगडिया, आ. डॉ. देवराव होळी, आ. कृष्णा गजबे तसेच प्रमुख अतिथी म्हणून नागपूर विभागीय आयुक्त अनुपकुमार व गडचिरोलीचे जिल्हाधिकारी ए.एस.आर. नायक उपस्थित राहणार आहेत. या संमेलनात गडचिरोली, अहेरी, भामरागड, चंद्रपूर, चिमूर, देवरी, भंडारा व नागपूर या आठ प्रकल्पातील खेळाडू विद्यार्थी सहभागी होणार आहेत. क्रीडा संंमेलनाचे बक्षीस वितरण २५ डिसेंबरला सायंकाळी ५ वाजता जि.प. अध्यक्ष योगीता भांडेकर यांच्या हस्ते होणार असून विशेष अतिथी म्हणून नगराध्यक्ष योगीता पिपरे तर प्रमुख अतिथी म्हणून कुलगुरू डॉ. नामदेव कल्याणकर, पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, कमांडंट मनोज कुमार, देवाजी तोफा हजर राहणार आहेत.
समित्यांमध्ये ३०० कर्मचाऱ्यांची नियुक्ती
या क्रीडा संमेलनाचे आयोजन आदिवासी विकास नागपूर विभागाच्या अप्पर आयुक्त डॉ. माधवी खोडे यांच्या नियंत्रणाखाली व सहाय्यक जिल्हाधिकारी तथा गडचिरोलीचे प्रकल्प अधिकारी डॉ. सचिन आेंबासे यांच्या मार्गदर्शनाखाली केलेले आहे. विभागीय क्रीडा संमेलन यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी गडचिरोली प्रकल्पाचे सहायक प्रकल्प अधिकारी विकास राचेलवार यांच्या नियंत्रणात विविध समित्या स्थापन केल्या असून नेमून दिलेली जबाबदारी पार पाडण्यासाठी सर्व समित्या मिळून क्रीडा शिक्षकांसह जवळपास ३०० कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.