२ हजार ८५९ उमेदवारांनी दिली परीक्षा
By admin | Published: May 9, 2016 01:20 AM2016-05-09T01:20:12+5:302016-05-09T01:20:12+5:30
पोलीस विभागाच्या वतीने पोलीस शिपाई पदासाठी रविवारी पोलीस मुख्यालयात लेखी परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते.
१६७ जागांसाठी पोलीस भरती : २१२ उमेदवार होते अनुपस्थित
गडचिरोली : पोलीस विभागाच्या वतीने पोलीस शिपाई पदासाठी रविवारी पोलीस मुख्यालयात लेखी परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. २ हजार ८५९ उमेदवारांनी लेखी परीक्षा दिली. तर २१२ उमेदवार अनुपस्थित होते.
गडचिरोली जिल्हा पोलीस विभागाच्या वतीने १६७ जागांसाठी पोलीस शिपाई भरती घेण्यात आली. १५ हजार ४४३ उमेदवारांनी शारीरिक क्षमता चाचणी दिली होती. त्यापैकी १:१५ या प्रमाणे २ हजार ५७९ पुरूष व ४९२ महिला असे एकूण ३ हजार ७१ उमेदवारांना लेखीपरीक्षेला बसण्याची संधी देण्यात आली होती. त्यापैकी २ हजार ८५९ उमेदवारांनी लेखी परीक्षा दिली. २१२ उमेदवार अनुपस्थित होते. लेखी परीक्षा पोलीस मुख्यालयाच्या विविध इमारतींमध्ये घेण्यात आल्या. पोलीस विभागाच्या मार्फतीने पॅड, बॉलपेन पुरविण्यात आले होते. उन्हाची तीव्रता लक्षात घेऊन पोलीस विभागाकडून शेड, पेंडॉल, थंड पाणी, अल्पोपहार उपलब्ध करून देण्यात आले. संपूर्ण परीक्षा प्रक्रिया अतिशय पारदर्शक ठेवण्याच्या दृष्टीने उमेदवारांची तपासणी पूर्णवेळ व्हिडिओ शूटिंगची व्यवस्था करण्यात आली होती. तसेच उमेदवारांकरिता तत्काळ वैद्यकीय व्यवस्थाही परीक्षा केंद्रावर उपलब्ध होती. पोलीस विभागाचे विविध अधिकारी प्रत्यक्ष परीक्षेदरम्यान हजर होते. (नगर प्रतिनिधी)