२० ग्रामसभा मालामाल
By admin | Published: September 28, 2015 01:34 AM2015-09-28T01:34:29+5:302015-09-28T01:34:29+5:30
पंचायत क्षेत्र विस्तार कायदा १९९६ व १९ आॅगस्ट २०१४ रोजीच्या राज्यपालांच्या ....
बांबू कापणी व विक्री : ८१ लाख कोषात
दिलीप दहेलकर गडचिरोली
पंचायत क्षेत्र विस्तार कायदा १९९६ व १९ आॅगस्ट २०१४ रोजीच्या राज्यपालांच्या अधिसूचनेनुसार पेसा क्षेत्रातील ग्रामसभांना बांबू कापणी, व्यवस्थापन व विक्रीचा अधिकार मिळाला आहे. या अधिकाराचा वापर करून जिल्ह्यातील पेसा हद्दीतील ग्रामसभांनी बांबूची कापणी, व्यवस्थापन व विक्री केली आहे. यातून जिल्ह्यातील २० ग्रामसभा मालामाल झाल्या असून या ग्रामसभांच्या बँक कोषात निव्वळ नफ्याचे ८१ लाख ५४ हजार ९१८ रूपये जमा झाले आहेत.
२०१४-१५ या वर्षात गडचिरोली, कुरखेडा, कोरची, एटापल्ली, भामरागड, धानोरा व अहेरी या सात तालुक्यातील ६८ ग्रामपंचायतीमधील ३६ ग्रामसभांनी वन विभागाकडे प्रस्ताव सादर करून बांबू कापणी व विक्री करण्यासंदर्भात समर्थन दर्शविले. त्यानंतर ग्रामसभांनी प्रत्यक्ष बांबूची कापणी, व्यवस्थापन व विक्री केली. यामध्ये गडचिरोली तालुक्यातील जळेगाव, जमगाव, काळशी, मारदा, जल्लेर, एटापल्ली तालुक्यातील वटेर, गट्टेपल्ली, येडसगोंदी, कोरची तालुक्यातील येडजाल, टेमली, गोडरी, भामरागड तालुक्यातील कृष्णार, कोसफुंडी, कोडपे, तिरकामेटा, धानोरा तालुक्यातील काकडयेली, हिपानेर, बंधूर, मुंगनेर, येणगाव आदी २० ग्रामसभांना समावेश आहे. जळेगाव ग्रामसभेने १९ हजार ९१५, जमगाव ४७ हजार १६, काळशी ३ हजार ४०, जल्लेर २३ हजार ५०८, वटेर १३ हजार ४५०, गट्टेपल्ली १ हजार ९६१, येडसगोंदी ३८ हजार ४७८, येडजाल १४ हजार १९५, कृष्णार ६ हजार ८१९, कोसफुंडी २२ हजार ८८४, कोडपे १४ हजार १७४, तिरकामेटा ४ हजार ९९६, टेमली ११ हजार ६७८, हिपानेर २ लाख ९१ हजार ८७०, बंधूर ५३ हजार ८०३, मुंगनेर १ लाख ४९ हजार ९९१ येनगाव ग्रामसभेने ९७ हजार मोठ्या व मध्यम बांबूची विक्री केली.
३ कोटी ४२ लाखांची मजुरी वितरित
जिल्ह्यातील २० ग्रामसभांनी वन विभागाच्या मार्गदर्शनानुसार योग्यरित्या बांबूची कापणी, व्यवस्थापन व विक्री केली. या बांबू विक्रीतून हजारो मजुरांना एकूण ३ कोटी ४२ लाख ४६ हजार २४६ रूपयांची मजुरी वितरित करण्यात आली आहे. जळेगाव ग्रामसभेने ७ लाख ५८ हजार ११०, जमगाव ३७ लाख ४१ हजार १२०, काळशी १ लाख १९०, जल्लेर २० लाख ४२ हजार ३०१, वटेर ८ लाख ७४ हजार २५०, गट्टेपल्ली १ लाख २७ हजार, येडसगोंदी २६ लाख ९३ हजार, ऐडजाल ९ लाख ९३ हजार, कृष्णार ४ लाख ७७ हजार, कोसफुंडी १६ लाख १ हजार, कोडपे ग्रामसभेने ९ लाख ९२ हजारांची मजुरी मजुरांना वितरित केली.
मारदा ग्रामसभेच्या बांबूची उचल नाही
गडचिरोली तालुक्यातील मारदा ग्रामपंचायतीने २०१४-१५ यावर्षात बांबूची कापणी केली. लिलाव प्रक्रिया खोळंबल्याने या ग्रामसभेच्या बांबूची उचल झाली नाही. त्यामुळे या ग्रामसभेला बांबूतून रक्कम मिळाली नाही. कोषात पैसा जमा न झालेली मारदा ही एकमेव ग्रामसभा आहे.