महिलांनी पकडली २० लिटर दारू
By admin | Published: September 15, 2015 03:49 AM2015-09-15T03:49:37+5:302015-09-15T03:49:37+5:30
तालुक्यातील चुटुगुंटा ग्राम पंचायत अंतर्गत येणाऱ्या दामपूर व चुटुगुंटा येथे महिलांनी एकत्र येऊन दारूविक्रेत्याच्या
मुलचेरा : तालुक्यातील चुटुगुंटा ग्राम पंचायत अंतर्गत येणाऱ्या दामपूर व चुटुगुंटा येथे महिलांनी एकत्र येऊन दारूविक्रेत्याच्या विरोधात मोहीम राबवून दोन दारूविक्रेत्यांकडून २० लिटर मोहफुलाची दारू रविवारी पकडली.
दामपूर येथे गेल्या अनेक दिवसांपासून दारूची अवैध विक्री मोठ्या प्रमाणात सुरू होती. पोलिसांनी संबंधित दारूविक्रेत्या आरोपींवर गुन्हा दाखल करून अनेकदा कारवाई केली. मात्र दारूविक्री बंद झाली नाही. त्यामुळे गावातील महिलांनी एकत्र येऊन दारूवर आळा घालण्याचा निर्धार केला. त्यानंतर आक्रमक पवित्रा घेऊन ऐन तान्हा पोळ्याच्या दिवशी रविवारला चुटुगुंटा येथील गंगुबाई सिडाम व दामपूर येथील नलीन डे या दारूविक्रेत्यांकडून प्रत्येक १० लिटर अशी एकूण १ हजार २०० रूपयांची २० लिटर दारू जप्त केली. त्यानंतर तंटामुक्त समितीच्या सहकार्याने या महिलांनी दोन्ही दारूविक्रेत्या आरोपींना पोलिसांच्या स्वाधीन केले.
पोलीस हवालदार गणेश राठोड, पी. एस. रॉय यांनी २० लिटर दारू जप्त करून आरोपींना समन्स बजाविला. यावेळी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष लचमा सिडाम, लक्ष्मी वेलादी, पोलीस पाटील सुरेश मडावी, बुरमवार, लक्ष्मी मेश्राम, कौशल्या कन्नाके, बेबी मुंगीलवार यांनी सहकार्य केले.