२० दारू विक्रेत्यांच्या घरांवर धाडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 7, 2018 01:33 AM2018-06-07T01:33:38+5:302018-06-07T01:33:38+5:30
सिरोंचा पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या अमरावती गावात राहत्या घरातून अवैधरित्या दारू काढून तिची विक्री होत असल्याच्या माहितीवरून पोलिसांनी बुधवारी २० दारूविक्रेत्यांच्या घरावर धाड टाकून दोन ते तीन लाखांचा मुद्दमाल जप्त केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
सिरोंचा : सिरोंचा पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या अमरावती गावात राहत्या घरातून अवैधरित्या दारू काढून तिची विक्री होत असल्याच्या माहितीवरून पोलिसांनी बुधवारी २० दारूविक्रेत्यांच्या घरावर धाड टाकून दोन ते तीन लाखांचा मुद्दमाल जप्त केला.
अमरावती येथे अनेक दिवसांपासून अवैधरित्या दारू काढली जात आहे. गावात अवैध दारूनिर्मिती करून तिची सिरोंचा परिसरातील गावात विक्री व पुरवठा केला जात होता. येथील अवैध दारूविक्रेत्यांमुळे गावपरिसरातील अनेक लोकांना दारूचे व्यसन जडले होते. या दारूविक्रेत्यांच्या विरोधात अनेक नागरिकांनी तक्रारीही केल्या होत्या. येथील अवैध दारूविक्रीची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर सिरोंचा पोलीस ठाणे व मुक्तिपथ अभियानच्या कार्यकर्त्यांनी अमरावती येथील २० अवैध दारूविक्रेत्यांच्या घरावर धाडी टाकून त्यांच्याकडून मोहफूल सडवा, दारू व दारू निर्मितीकरिता लागणारे साहित्य जप्त केले. गावात अवैधरित्या सुरू असलेले संपूर्ण अड्डे नष्ट केले. सोबतच दोन अवैध दारूविक्रेत्यांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर मुंबई दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा नोंदविला. सदर कारवाई सिरोंचाचे उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन राठोड यांच्या मार्गदर्शनात सिरोंचा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पतंगराव पाटील, पोलीस उपनिरीक्षक आनंद टेकाम, मुक्तिपथ अभियानाचे जिल्हा उपसंचालक संतोष सावळकर, मुक्तिपथ अभियानाचे तालुका संघटक किशोर मल्लेवार, उपसंघटक महेंद्र सदनपू, तालुका प्रेरक संतोष चंदावार यांच्यासह पोलीस कर्मचाºयांनी केली.