१६९ जागांसाठी २० हजारावर आॅनलाईन अर्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2017 02:27 AM2017-03-18T02:27:28+5:302017-03-18T02:27:28+5:30
पोलीस अधीक्षक गडचिरोली यांच्या आस्थापनेवरील पोलीस शिपाई पदाच्या १६९ जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
पोलीस शिपाई पदभरती : अर्ज करण्याची मुदत वाढविली
गडचिरोली : पोलीस अधीक्षक गडचिरोली यांच्या आस्थापनेवरील पोलीस शिपाई पदाच्या १६९ जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. २४ फेब्रुवारीपासून पोलीस शिपाई पदासाठी आॅनलाईन आवेदन अर्ज सादर करण्यास सुरुवात झाली आहे. गुरूवारपर्यंत १६९ जागांसाठी जवळपास २० हजारांवर अर्ज प्राप्त झाले असल्याची माहिती पोलीस विभागाच्या सूत्रांकडून मिळाली आहे.
१६९ पदांपैकी तब्बल १२० जागा खुल्या प्रवर्गासाठी आहेत. यामध्ये आरक्षणानुसार सर्वसाधारण ३६, महिलांकरिता ३६, खेळाडूकरिता ६, प्रकल्पग्रस्तांसाठी ६, भूकंपग्रस्त २, माजी सैनिक १८, अंशकालीन पदवीधरांसाठी ६, पोलिसांच्या पाल्यांकरिता ४ व गृहरक्षक दलातील जवानासाठी ६ जागा राखीव ठेवण्यात आले आहे. अनुसूचित जमातीकरिता १९ जागा या भरतीत आरक्षित आहेत. यामध्ये सर्वसाधारण ५, महिलांकरिता ६, खेळाडू १, प्रकल्पग्रस्त १, माजी सैनिक ३, अंशकालीन पदवीधर १, पोलिसांच्या पाल्यांकरिता १ व गृहरक्षक दलातील उमेदवारांकरिता १ जागा राखीव ठेवण्यात आली आहे. भटक्या जमाती (ब) प्रवर्गातील उमेदवारांसाठी ५ जागा राखीव ठेवण्यात आले आहेत. या जागा आरक्षणानुसार सर्वसाधारण २, महिलांकरिता २, माजी सैनिकांसाठी १ जागा राखीव ठेवण्यात आली आहे. भटक्या जमाती क प्रवर्गातील उमेदवारांसाठी एकूण १० जागा या पदभरतीत आहेत. यामध्ये सर्वसाधारण १, महिला ३, खेळाडू १, प्रकल्पग्रस्त १, माजी सैनिक २, अंशकालीन पदवीधर १ व गृहरक्षक दलातील जवानासाठी १ जागा राखीव आहे.
विशेष मागास प्रवर्गातील उमेदवारांकरिता एकूण १३ जागा या भरतीत आहे. यामध्ये आरक्षणानुसार सर्वसाधारण ३, महिलांकरिता ४, खेळाडू १, प्रकल्पग्रस्त १, माजी सैनिक २, अंशकालीन पदवीधर १ व गृहरक्षक दलातील जवानासाठी १ जागा राखीव आहे. कारागृह विभागातील कारागृह शिपाई या आस्थापनेवर शिपायांची पदे उपलब्ध नसल्याची माहिती पोलीस विभागाने दिली आहे.
पोलीस शिपाई पदाची शारीरिक चाचणी २२ मार्चपासून सुरू होणार आहे. १६९ पदांसाठी २५ हजारवर उमेदवार आॅनलाईन अर्ज दाखल करण्याची शक्यता आहे. गडचिरोली जिल्ह्यात नोकरीच्या इतर कुठल्याही संधी नसल्याने मोठ्या संख्येने उमेदवार पोलीस भरतीत उतरतात. उमेदवारांची संख्या लक्षात घेता एका दिवशी जवळपास २ हजार उमेदवारांची शारीरिक चाचणी होईल, अशी माहिती पोलीस विभागाने दिली आहे. पदभरती संदर्भात जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांच्या मार्गदर्शनात अधिकाऱ्यांची बैठक पार पडली आहे. त्यानुसार त्या-त्या ठिकाणी अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या ड्यूट्या लावण्यात आल्या आहेत. उमेदवारही शारीरिक चाचणीच्या तयारीला भिडले आहेत. (प्रतिनिधी)
सीआरपीएफमध्येही पोलीस शिपाई पदाची संधी
राज्य राखीव पोलीस बल गट क्र. १३ वडसा (देसाईगंज) कॅम्प नागपूरच्या आस्थापनेवरील सशस्त्र पोलीस शिपाई पदभरतीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. रिक्त असलेल्या पोलीस शिपाई पदासाठी संगणकीय प्रणालीद्वारे आवेदनपत्र मागविण्यात आले आहे. यासंदर्भातील भरती प्रक्रियेची संपूर्ण माहिती शासनाच्या संकेतस्थळावर आहे. शिपाई पदासाठी आॅनलाईन अर्ज करण्याचा कालावधी २० मार्चपर्यंत वाढविण्यात आला आहे. सर्व आवश्यक प्रमाणपत्र व कागदपत्रे २० मार्च २०१७ अथवा त्यापूर्वीच्या दिनांकाची असावीत. मूळ कागदपत्रे पडताळणीच्या वेळेस सादर करावयाची आहेत. बेरोजगारांना सीआरपीएफमध्येही संधी आहे.
पोलीस शिपाई पदभरतीसाठी संगणकीय प्रणालीद्वारे आवेदन अर्ज भरण्याचा कालावधी यापूर्वी २४ फेब्रुवारी ते १७ मार्च असा होता. मात्र बेरोजगार युवकांसाठी आॅनलाईन अर्ज करण्याचा कालावधी वाढविण्यात आला आहे. २० मार्च २०१७ पर्यंत अर्ज करण्याची मुदत ठेवण्यात आली आहे. पोलीस भरतीकरिता आवश्यक सर्व प्रमाणपत्र व कागदपत्रे ही २० मार्च २०१७ अथवा त्यापूर्वीची असणे आवश्यक आहे. याबाबत सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी, जास्तीत जास्त उमेदवारांनी पोलीस शिपाई पदासाठी आॅनलाईन आवेदनपत्र सादर करावे.
- मंजूनाथ सिंगे, अप्पर पोलीस अधीक्षक, गडचिरोली