२०० गावांचा संपर्क तुटला
By admin | Published: July 11, 2016 01:14 AM2016-07-11T01:14:11+5:302016-07-11T01:14:11+5:30
मागील तीन दिवसांपासून संततधार सुरू असलेल्या पावसामुळे शनिवारी निर्माण झालेली पूर परिस्थिती रविवारीही कायम होती.
भामरागड शहर पाण्याखाली : दुसऱ्या दिवशीही पूरपरिस्थिती कायम; १० मार्ग बंद
गडचिरोली : मागील तीन दिवसांपासून संततधार सुरू असलेल्या पावसामुळे शनिवारी निर्माण झालेली पूर परिस्थिती रविवारीही कायम होती. जिल्ह्यातील जवळजवळ २०० गावांचा संपर्क अतिवृष्टीमुळे जिल्हा मुख्यालयाशी तुटलेलाच आहे. तर जवळजवळ १० ते १५ मार्गावरची वाहतूक ठप्प झाली आहे. अतिवृष्टीमुळे सिरोंचा तालुक्यात विठ्ठलरावपेठा येथे वीज पडून दोन म्हशी ठार झाल्या.
गडचिरोली जिल्ह्यात सततच्या पावसामुळे तसेच बाजूला असणाऱ्या गोसेखुर्द धरणातून विसर्ग चालू असल्याने सर्वच नद्या आणि नाल्यांची पाणी पातळी वाढत आहे. काही गावांना पुराचा तडाखा बसण्याची शक्यता आहे. या पार्श्वभुमीवर प्रशासन सतर्क आहे. नागरिकांनी देखील खबरदारी घ्यावी असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधीकरणाचे अध्यक्ष ए. एस. आर नायक यांनी केले आहे.
सर्व तहसीलदारांना रविवारी नदी आणी नाल्याजवळील गावांना भेट देउन बाधित होणा-या कुटुंबाना सतर्कतेचा इशारा द्यावा तसेच गरज पडल्यास सुरक्षित ठिकाणी हलवावे. जिवीत वा वित्तहानी होणार नाही याची खबरदारी घेण्याचे निर्देश जिल्हाधिका-यांनी दिले आहे. पुलावरून पाणी वाहते अशा ठिकाणी वाहतूक वेळीच बंद करण्यात यावी अशाही सुचना देण्यात आल्या आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी नायक यांनी दिली आहे.