२०८ गावांची पैसेवारी ५० पैशांच्या आत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 7, 2019 10:38 PM2019-01-07T22:38:42+5:302019-01-07T22:39:04+5:30
यावर्षीच्या खरीप हंगामातील पीकांची अंतिम पैसेवारी जिल्हा प्रशासनाने सोमवारी जाहीर केली. जिल्ह्याची सरासरी पैसेवारी ६२ पैसे आली आहे. मात्र अहेरी आणि भामरागड तालुक्यांमधील २०८ गावांची पैसेवारी ५० पैशांपेक्षा कमी असल्यामुळे त्या गावांना दुष्काळसदृश स्थितीसाठी असलेल्या शासनाच्या योजनांचा लाभ मिळण्याची शक्यता आहे. उर्वरित १२६९ गावांमधील पीकांचा उतारा मात्र चांगला असल्याचे जाहीर करण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : यावर्षीच्या खरीप हंगामातील पीकांची अंतिम पैसेवारी जिल्हा प्रशासनाने सोमवारी जाहीर केली. जिल्ह्याची सरासरी पैसेवारी ६२ पैसे आली आहे. मात्र अहेरी आणि भामरागड तालुक्यांमधील २०८ गावांची पैसेवारी ५० पैशांपेक्षा कमी असल्यामुळे त्या गावांना दुष्काळसदृश स्थितीसाठी असलेल्या शासनाच्या योजनांचा लाभ मिळण्याची शक्यता आहे. उर्वरित १२६९ गावांमधील पीकांचा उतारा मात्र चांगला असल्याचे जाहीर करण्यात आले.
यावर्षीची अंतिम पैसेवारी ३१ डिसेंबरपर्यंत जाहीर करण्याचे निर्देश राज्य शासनाकडून देण्यात आले होते. परंतू काही तालुक्यांची माहिती येणे बाकी असल्यामुळे जिल्ह्याची पैसेवारी जाहीर करण्यास थोडा वेळ लागला. जिल्ह्यातील एकूण १६८८ गावांपैकी खरीप पिकांची गावे १५३९ आहेत. त्यापैकी पीक नसलेली गावे ६२ आहेत.
एकूण लागवडीखाली असलेल्या १ लाख ८८ हजार ५४८.७५ हेक्टर क्षेत्रापैकी यावर्षी १ लाख ७२ हजार ५०८.७९ हेक्टरवर खरीप पिकांची लागवड झाली होती.
विशेष म्हणजे राज्य शासनाने दुष्काळ घोषित केलेल्या १५१ तालुके व २६८ महसूल मंडळात जिल्ह्यातील गावांचा समावेश नाही. शासनाकडून मागाहून त्या २०८ गावांचा दुष्काळाच्या यादीत समावेश केला जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
सिरोंचा तालुक्यात सर्वात चांगली स्थिती
अंतिम पैसेवारीनुसार यावर्षी अहेरी तालुक्यातील सर्वच्या सर्व म्हणजे ११८ गावांमधील पैसेवारी ४६ पैसे आली आहे. भामरागड तालुक्यातील ९० गावांची पैसेवारी ५० च्या आत तर १६ गावांची ५० पेक्षा जास्त आहे. सिरोंचा तालुक्याची पैसेवारी सर्वाधिक, म्हणजे ६८ पैसे आली आहे.