२१ ला गडचिरोलीत आदिवासी मेळावा
By Admin | Published: October 19, 2015 01:58 AM2015-10-19T01:58:44+5:302015-10-19T01:58:44+5:30
जिल्हा गोटूल समिती व आदिवासी विद्यार्थी संघाच्या संयुक्त विद्यमाने गडचिरोली येथील चांदाळा मार्गावरील गोटूल भूमीवर ...
पत्रकार परिषद : दोन दिवसीय मेळाव्यात विविध कार्यक्रम
गडचिरोली : जिल्हा गोटूल समिती व आदिवासी विद्यार्थी संघाच्या संयुक्त विद्यमाने गडचिरोली येथील चांदाळा मार्गावरील गोटूल भूमीवर २१ व २२ आॅक्टोबर रोजी आदिवासी देवतांची महापूजा व आदिवासी मेळाव्याचे आयोजन करण्यात आल्याची माहिती आ. डॉ. देवराव होळी व आविसंचे सरसेनापती नंदू नरोटे यांनी रविवारी पत्रकार परिषदेत दिली.
क्रांतिवीर शहीद बाबूराव शेडमाके यांच्या स्मृतिदिनानिमित्त आदिवासी मेळावा होणार आहे. बुधवारी २१ आॅक्टोबर रोजी सकाळी ८ ते ११ वाजतापर्यंत मैदानी क्रीडास्पर्धा घेण्यात येतील. त्यानंतर आधुनिक काळात ग्रामसभेचे महत्व व आदिवासी समाज या विषयावर मार्गदर्शन करण्यात येईल. सामाजिक कार्यकर्ते देवाजी तोफा कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राहतील. यानंतर आदिवासी मेळावा होईल. राज्याचे आदिवासी विकास राज्यमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांच्या हस्ते मेळाव्याचे उद्घाटन होईल. खा. अशोक नेते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राहतील. या मेळाव्यानंतर रात्री सांस्कृतिक कार्यक्रम होतील. गुरुवारी २२ आॅक्टोबरला सकाळी १० वाजता पेसा कायदा- समज व गैरसमज आणि आरक्षणाची गरज या विषयावर परिसंवाद होईल. कवी प्रभू राजगडकर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राहतील, दुपारी १२ वाजता आदिवासी देवतांची महापूजा व मार्गदर्शन कार्यक्रम होईल. अध्यक्षस्थानी आविसंचे सरसेनापती नंदू नरोटे हे राहतील. देवरीचे आ. संजय पुराम यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन होईल. यावेळी राज्याचे अर्थ व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा सत्कार करण्यात येईल. याप्रसंगी डॉ.नरेशचंद्र काठोडे हे स्पर्धा परिक्षेविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत, अशी माहिती आ. डॉ. होळी व नरोटे यांनी दिली. यावेळी आविसंचे अॅड. मोहन पुराम, सुधाकर नाईक उपस्थित होते.