२११ गावे प्रभावित
By admin | Published: July 12, 2016 02:14 AM2016-07-12T02:14:19+5:302016-07-12T02:14:19+5:30
गेल्या चार दिवसांपासून गडचिरोली जिल्ह्यात संततधार पाऊस कायम असून सोमवारी सकाळपासून तर दुपारपर्यंत
१२० गावांचा संपर्क तुटला : दमदार पावसाने जिल्ह्याला झोडपले
गडचिरोली : गेल्या चार दिवसांपासून गडचिरोली जिल्ह्यात संततधार पाऊस कायम असून सोमवारी सकाळपासून तर दुपारपर्यंत दमदार पावसाने जिल्ह्याला चांगलेच झोडपले. या पावसामुळे नदी, नाल्यांना पूर आला असून गडचिरोली जिल्हा मुख्यालयाशी तब्बल १२० गावांचा संपर्क पूर्णत: तुटलेला आहे. तर पूर परिस्थितीमुळे एकूण २११ गावे प्रभावित झाली आहेत. गेल्या २४ तासात गडचिरोली जिल्ह्यात एकूण ९५३.८ मिमी पाऊस झाला आहे. गडचिरोली जिल्ह्यात मागील ७२ तासात ८६.३७ मिमीच्या सरासरीने एकूण ३ हजार १२२.५४ मिमी पाऊस झाला असल्याची नोंद जिल्हा आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्षाने घेतली आहे. भामरागडलगतच्या पर्लकोटा, अहेरीनजीकच्या प्राणहिता नदीला पूर कायम आहे. सिरोंचा तालुक्यातील कंबालपेठा, येर्रावागू नाल्याला पूर आहे. अहेरी तालुक्यातील गडअहेरी नाल्यावर पाणी चढले आहे. एटापल्ली तालुक्यातील झाडापापडा, डुम्मी नाल्याला तसेच बांडे नदीला पूर आहे. आष्टीच्या पुलावरही पाणी चढले आहे. चौडमपल्ली पुलावरून दोन फूट पाणी वाहत होते. (लोकमत न्यूज नेटवर्क)
नऊ मार्ग बंद
४पूर परिस्थितीमुळे जिल्ह्यातील नऊ मार्ग बंद झाले असून या मार्गावरील वाहतूक सोमवारी ठप्प होती. परिणामी गडचिरोली व अहेरी आगाराला एकूण ३३५ बसफेऱ्या रद्द कराव्या लागल्या. पुरामुळे बंद असलेल्या मार्गांमध्ये सिरोंचा-आसरअल्ली, आलापल्ली-आष्टी, आलापल्ली-भामरागड, कसनसूर-एटापल्ली, चामोर्शी-घोट, मुलचेरा-आलापल्ली, गडचिरोली-साखेरा-पेंढरी-बोटेहूर, कारवाफा-पोटेगाव, घोट-मार्र्कंडा (कं.) व एटापल्ली-गट्टा आदींचा समावेश आहे. सायंकाळी ५ वाजतापासून आष्टी-चंद्रपूर मार्गावरील वाहतूक सुरू झाली.
यंत्रणा सज्ज
जिल्ह्याच्या पूर्व व दक्षिण भागातील पूर परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातून दोन राजपत्रित अधिकारी व इतर कर्मचाऱ्यांची चमू साधन सामुग्रीसह प्रत्यक्ष अतिसंवेदनशील भागात पोहोचली आहे. पूर परिस्थिती नियंत्रण आणण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज आहे.
सिरोंचा मार्गावर कोसळलेले झाड
४सिरोंचा मार्गावर उमानूरपासून दोन किमी अंतरावर रविवारी रात्री १ वाजताच्या सुमारास मोठे झाड कोसळले. या मार्गावरील वाहतूक बंद झाली. वन विभागाचे चार ते पाच कर्मचारी सोमवारी दुपारी १२.३० वाजता घटनास्थळावर पोहोचले. मात्र सायंकाळी ४ वाजेपर्यंत सदर झाड रस्त्यावर पडलेल्या स्थितीत कायम होते. त्यामुळे एका गरोदर महिलेला पायी उमानूर येथे जावे लागले. जिमलगट्टाचे वनाधिकारी नैताम यांनी ३ वाजता येऊन घटनास्थळाला भेट दिली.
वैरागड नदीच्या पुलावर पाणी
४वैरागड परिसरातील वैलोचना नदीच्या पुलावर पूर असून वैरागड-पाठणवाडादरम्यानच्या नाल्यावरून १० फूट पाणी वाहत आहे. वैलोचना नदीच्या पुरामुळे वैरागड-मानापूर व वैरागड-कढोली दोन्ही मार्ग बंद झाले असून वाहतूक विस्कळीत झाली आहे. रविवारच्या रात्रीपासून ते सोमवारी दुपारपर्यंत झालेल्या पावसाने वैरागड परिसर जलयम झाले आहे. रोवणीची कामे ठप्प पडली आहे. अतिवृष्टीमुळे पाठणवाडा व कराडी गावालगतचे तलावाचे पाणी ओव्हरफ्लो झाले आहे.
४सोमवारी सकाळपासून दुपारी १२ वाजतापर्यंत गडचिरोली शहरात दमदार पाऊस झाला. या पावसामुळे शहरातील सखल भागात पाणी साचले असून अंतर्गत मार्गावर पाणी वाहत होते. तसेच चामोर्शी मार्गावर राधे बिल्डींगजवळ, आरमोरी मार्गावर नाक्याजवळ, गटसाधन केंद्राच्या परिसरातील रस्त्यावरही पाणी वाहत होते. गोकुलनगरलगतच्या तलावाच्या पात्रात बांधण्यात आलेल्या घरांना पायथ्यापर्यंत पाणी चढला. कन्नमवार नगरातील रस्ते जलमय झाले.
अतिवृष्टीची शक्यता
४गेल्या चार दिवसांपासून गडचिरोली जिल्ह्यात संततधार पाऊस सुरू आहे. पूर परिस्थितीमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. ११ ते १३ जुलैदरम्यान विदर्भाच्या काही भागासह गडचिरोली जिल्ह्यातही अतिवृष्टी होण्याची शक्यता प्रशासनाने व्यक्त केली आहे. त्यादृष्टीने नागरिकांनी आवश्यक ती सतर्कता बाळगावी, असे आवाहन आपत्ती व्यवस्थापन विभाग गडचिरोली यांनी केले आहे.