गडचिरोली जिल्ह्यातील २१२ गावांना यावर्षी बसणार पुराचा फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 8, 2020 03:31 PM2020-06-08T15:31:18+5:302020-06-08T15:34:06+5:30
गडचिरोली जिल्ह्यातील २१२ गावांना यावर्षी पुराचा फटका बसण्याची शक्यता आहे. पूर परिस्थितीदरम्यान जीवित तसेच वित्त हानी टळावी, यासाठी आपत्ती व्यवस्थापन विभागामार्फत नियोजन व उपाययोजना केल्या आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : जिल्ह्यातील २१२ गावांना यावर्षी पुराचा फटका बसण्याची शक्यता आहे. पूर परिस्थितीदरम्यान जीवित तसेच वित्त हानी टळावी, यासाठी आपत्ती व्यवस्थापन विभागामार्फत नियोजन व उपाययोजना केल्या आहेत.
गडचिरोली जिल्ह्याचा सुमारे ६८ टक्के भाग जंगलाने व्यापला आहे. अनेक गावे घनदाट जंगलात वसली आहेत. या गावांना जाण्यासाठी रस्ते नाहीत. नदी, नाल्यांवर पूल बांधण्यात आले नाही. त्यामुळे पावसाळ्यात या गावांचा संपर्क तुटते. तसेच राज्यातील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत गडचिरोली जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस पडते. पावसाळ्यादरम्यान पूर परिस्थिती निर्माण होते. एकाचवेळी अनेक गावांचा संपर्क तुटत असल्याने प्रशासनाला पावसाळ्याच्या कालावधीत विशेष सतर्क राहावे लागते. यावर्षी आपत्ती व्यवस्थापन विभागाने नियोजन केले आहे. यामध्ये जिल्हाभरातील सुमारे २१२ गावांना पुराचा फटका बसण्याची शक्यता वर्तविली आहे. पावसाळ्याच्या कालावधीत या गावांवर प्रशासनाचे विशेष लक्ष राहणार आहे. पुरात सापडलेल्या नागरिकांना वेळेवर मदत मिळावी, शासकीय विभाग एकमेकांवर जबाबदारी ढकलू नये, यासाठी आपत्ती व्यवस्थापनाच्या चमूमध्ये सर्व विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा समावेश केला आहे.
प्रत्येक तालुक्यात पट्टीच्या पोहणाऱ्या कर्मचाऱ्यांची यादी प्रशासनाने घोषित केली आहे. प्रत्येक तालुक्याला लाईफ जॉकेट, लाईफ बोयाज, दोरखंड, फायर एक्सटिंगब्युशर, वायरलेस यंत्रणा, रिपिटर, इन्व्हर्टर, बॅटरी उपलब्ध करून देण्यात आली आहे. काही तालुक्यांना बोटसुद्धा उपलब्ध करून दिली आहे. मागील वर्षी सरासरीच्या तुलनेत अधिक पाऊस पडला होता. अनेकवेळा पूर परिस्थिती निर्माण झाल्याने प्रशासनाची धावपळ झाली होती. यावर्षीही सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली असल्याने जिल्हा प्रशासन सतर्क झाले आहे.
एटापल्ली तालुका जंगलाने व्यापला आहे. या तालुक्यातील बहुतांश गावे जंगलातच वसली आहेत. पावसाळ्यात या तालुक्यातील सुमारे ६३ गावांना पुराचा फटका बसते. त्यामुळे या तालुक्याकडे प्रशासनाचे लक्ष राहणार आहे.
सिरोंचा तालुक्यातून गोदावरी, प्राणहिता या मोठ्या नद्या वाहतात. नदी तिरावर तसेच सखल भागात असलेल्या ५७ गावांमध्ये पूर परिस्थिती निर्माण होते. या तालुक्याला यावर्षीही शासनामार्फत बोट उपलब्ध करून देण्यात आली आहे. स्थानिक कर्मचाऱ्यांना आपत्ती निवारणाचे प्रशिक्षण दिले जात आहे.