यावर्षी २१४० जणांना हिवतापाची लागण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2018 12:44 AM2018-11-22T00:44:22+5:302018-11-22T00:45:09+5:30
राज्यात सर्वाधिक हिवतापाचे रुग्ण आढळत असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात गेल्यावर्षीपर्यंत मोठ्या प्रमाणात मच्छरदाण्यांचे वाटप झाले. यावर्षीही १ लाख ६ हजार ३० मच्छरदाण्यांचे वाटप झाले असून अजूनही ७९ हजार मच्छरदाण्या शिल्लक आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : राज्यात सर्वाधिक हिवतापाचे रुग्ण आढळत असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात गेल्यावर्षीपर्यंत मोठ्या प्रमाणात मच्छरदाण्यांचे वाटप झाले. यावर्षीही १ लाख ६ हजार ३० मच्छरदाण्यांचे वाटप झाले असून अजूनही ७९ हजार मच्छरदाण्या शिल्लक आहेत. मात्र तीन वर्षात पुरेशा प्रमाणात मच्छरदाण्या वाटप झाल्याने यावर्षी हिवतापाचे प्रमाण घटले असून गेल्यावर्षीच्या तुलनेत अर्ध्यापेक्षाही कमी लोकांना हिवतापाची लागण झाल्याची नोंद हिवताप नियंत्रण विभागाने घेतली आहे.
७६ टक्के जंगलाचे क्षेत्र असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात डासांचे प्रमाण जास्त असते. जंगलालगतच्या गावांमध्ये दरवर्षी मोठ्या प्रमाणात हिवताप, डेंग्यूासारख्या डासजन्य आजारांचे रुग्ण आढळतात. वेळेवर योग्य उपचार मिळत नसल्याने अनेक जण दगावतात. यावर उपाय म्हणून केंद्र आणि राज्य सरकारच्या निधीतून मलेरियाचा उद्रेक होणाऱ्या गावांमध्ये नागरिकांना मोफत मच्छरदाण्यांचे वाटप करण्यात येत आहे. गेल्या तीन वर्षात ४ लाखांपेक्षा अधिक मच्छरदाण्यांचे वाटप जिल्ह्यात झाले आहे. त्याचा परिणाम म्हणून डासजन्य आजारांचे प्रमाण कमी होत असल्याचे दिसून येते. मच्छरदाण्या वाटण्याची केंद्र व राज्य सरकारकडून मच्छरदाण्यांचा पुरवठा केला जात असला तरी काही प्रमाणात स्थानिक स्तरावरही मच्छरदाण्यांची खरेदी झाली. ७९ हजार मच्छरदाण्या शिल्लक असल्यामुळे यातील काही मच्छरदाण्यांची खरेदी अनावश्यक ठरली आहे.
१६६१ गावांत डासनाशकाची फवारणी
डासांचे प्रमाण कमी करण्यासाठी जिल्हाभरात डासनाशक औषधाची फवारणी केली जाते. यात १३ जून ते ५ सप्टेंबरदरम्यान राबविलेल्या पहिल्या टप्प्यात ४७ प्राथमिक आरोग्य केंद्रातील ३७६ उपकेंद्रांतर्गत येणाºया १६६१ गावांमध्ये डासनाशक फवारण्यात आले. दुसºया टप्प्यात १७ सप्टेंबरपासून आतापर्यंत ७२६ गावांमध्ये फवारणी आटोपली आहे. आदिवासीबहुल गावांमध्ये लोक दिवसा घरी सापडत नसल्यामुळे सायंकाळी जाऊन फवारणी करावी लागत आहे. डासनाशक पचवण्याची डासांची क्षमता दरवर्षी वाढत असल्यामुळे दर तीन वर्षांनी औषध बदलविले जाते. सध्या लॅम्बडा (सायलोथ्रीन) या औषधाची फवारणी केली जात आहे.
अर्ध्यावर आले हिवतापाचे प्रमाण
यावर्षी जानेवारी ते आॅक्टोबर या १० महिन्यात ४ लाख ६२ हजार १९६ रुग्णांचे रक्तनमुणे तपासण्यात आले. त्यापैकी २१४० जणांना हिवतापाची लागण झाल्याचे आढळून आले. त्यापैकी २ जणांचा मृत्यू झाला. गेल्यावर्षी याच कालावधीत ४११९ जणांना मलेरियाने ग्रासले होते आणि ४ जणांचा मृत्यू झाला होता. यावर्षी घटलेले हिवतापाचे प्रमाण हे मच्छरदाण्यांचा वापर आणि योग्य फवारणीचा परिणाम असल्याचे दिसून येते.