नागपूरसाठी २१५ रूपये तिकीट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2018 12:57 AM2018-06-17T00:57:40+5:302018-06-17T00:57:40+5:30
एसटीने तिकिटाच्या दरात १८ टक्के वाढ लागू केली आहे. त्यामुळे प्रवाशांना अधिकचे पैसे मोजावे लागणार आहेत. जलद बसची गडचिरोली-नागपूरचे तिकीट यापूर्वी १८४ रूपये होते. आता २१५ रूपये जादा मोजावे लागणार आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : एसटीने तिकिटाच्या दरात १८ टक्के वाढ लागू केली आहे. त्यामुळे प्रवाशांना अधिकचे पैसे मोजावे लागणार आहेत. जलद बसची गडचिरोली-नागपूरचे तिकीट यापूर्वी १८४ रूपये होते. आता २१५ रूपये जादा मोजावे लागणार आहेत.
सातत्याने वाढत असलेल्या डिझेलच्या दरवाढीमुळे एसटी आर्थिक अडचणीत आली होती. त्याचबरोबर नुकतीच एसटी कर्मचाऱ्यांना पगारवाढही देण्यात आली. वाढत्या महागाईसोबत आर्थिक ताळमेळ जुडविण्यासाठी एसटीला भाडेवाढ करणे आवश्यक झाले होते. त्यानुसार शुक्रवारी १८ टक्के भाडेवाढ जाहीर करण्यात आली. ही भाडेवाढ लागू सुध्दा करण्यात आली आहे. गडचिरोली आगारातून सर्वाधिक बसेस नागपूरसाठी सुटतात. यापूर्वी नागपूरचे प्रवास भाडे १८४ रूपये होते. भाडेवाढीनंतर ते आता २१५ रूपये करण्यात आले आहे. नवीन भाडेवाढीनुसार अहेरी-चंद्रपूरचे तिकीट १५५ रूपये, अहेरी-गोंडपिपरीमार्गे नागपूरचे तिकीट ३५० रूपये, अहेरी-गडचिरोली ८५ रूपये व अहेरी-यवतमाळ ३३८ रूपये करण्यात आली आहे.
गडचिरोली आगारातून नागपूरसाठी शिवशाही बसेस सोडल्या जातात. शिवशाही बसेसच्याही भाड्यात वाढ करण्यात आली आहे. यापूर्वी गडचिरोली-नागपूरचे शिवशाहीचे तिकीट २७३ रूपये होते. ते आता ३२० रूपये करण्यात आले आहे. गडचिरोली आगारातून शिवशाही बससेवा उन्हाळ्यात सुरू करण्यात आली होती. त्यामुळे शिवशाहीला काही प्रमाणात प्रवाशी मिळत होते. तरीही खासगी बसच्या तुलनेत भाडे अधिक आहे, अशी तक्रार होती. आता पावसाळ्याला सुरूवात झाली आहे. त्यामुळे वातानुकूलित वाहनाची प्रवाशांना पाहिजे तेवढी आवश्यकता नाही. अशातच भाडेवाढ झाली आहे. त्यामुळे शिवशाहीला प्रवाशी मिळविताना चांगलीच अडचण जाणार आहे.
एसटीनेही भाडेवाढ करीत महागाईत आणखी भर टाकली आहे. दुर्गम भागातील नागरिक, विद्यार्थी यांनाही भाडेवाढीचा फटका बसणार आहे.
चिल्लरचा प्रश्न मिटविला
यापूर्वी एसटीचे तिकीट अगदी किलोमीटरच्या हिशोबाप्रमाणे होते. त्यामुळे एक ते दोन रूपयांच्या चिल्लरचा तुटवडा निर्माण होत होता. प्रवाशी वाहकाच्या हातात सरळ ५० किंवा १०० ची नोट ठोकून तिकीटाचा हिशोब वगळता पैसे परत मागत होते. वाहकाकडे चिल्लर राहत नसल्याने बºयाच वेळा वादही होत होते. कित्येक वेळा चिल्लरसाठी एसटी बसथांब्यावर काही वेळ थांबवावी लागत होती. नवीन भाडेवाढीत चिल्लरचा प्रश्न मिटविण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. पाच रूपयांच्या पटीने भाववाढ करण्यात आली आहे. यानंतरची तिकीट १५, २०, २५ रूपये अशा स्वरूपात राहणार आहे. पाचच्या पटीतील पैसे वाहक सहज उपलब्ध करून देऊ शकेल. त्यामुळे चिल्लरसाठी होणारे वाद संपुष्टात येतील, अशी अपेक्षा आहे.