2154 गरजू युवक-युवतींना मिळाली रोजगाराची दिशा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2021 11:01 PM2021-12-31T23:01:42+5:302021-12-31T23:03:15+5:30
जिल्हा पोलीस दलासह प्रथम एज्युकेशन फाउंडेशन, बँक ऑफ इंडिया स्टार आरसेटी, कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन (आत्मा) यांच्या संयुक्त विद्यमाने वेळोवेळी ‘रोजगार व स्वयंरोजगार मेळावा’ घेऊन नवनवीन युवकांना यात सामावून घेतले जात आहे. जिल्ह्यात युवक-युवतींना रोजगाराची संधी नगण्य आहे. युवक-युवतींमध्ये मेहनत करण्याची जिद्द आणि कार्यतत्परता असूनही संधी मिळत नाही. त्यामुळे जिल्ह्याबाहेर त्यांना रोजगार संधी देण्याचे नियोजन पोलीस विभागाच्या पुढाकारातून करण्यात आले.
लाेकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : जिल्ह्यातील बेरोजगारीची समस्या पाहता ग्रामीण भागातील गरजू युवा वर्ग चुकीच्या मार्गाने जाऊ नये, त्यांना रोजगार-स्वयंरोजगारातून सन्मानाने जगण्याची वाट मिळाली यासाठी पोलीस विभागाचे प्रयत्न सुरू आहेत. दुर्गम भागातील नागरिकांना सरकारी योजनांचा लाभ मिळवून देण्यासह त्यांच्या मदतीसाठी सदैव तत्पर राहणाऱ्या ‘पोलीस दादालोरा खिडकी’ (पोलीस दादाची खिडकी) या उपक्रमातून गेल्या काही महिन्यात तब्बल २१५४ युवक-युवतींना विविध प्रकारांचे व्यावसायिक प्रशिक्षण देऊन त्यांना रोजगार व स्वयंरोजगाराचा मार्ग दाखविला आहे.
जिल्हा पोलीस दलासह प्रथम एज्युकेशन फाउंडेशन, बँक ऑफ इंडिया स्टार आरसेटी, कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन (आत्मा) यांच्या संयुक्त विद्यमाने वेळोवेळी ‘रोजगार व स्वयंरोजगार मेळावा’ घेऊन नवनवीन युवकांना यात सामावून घेतले जात आहे. जिल्ह्यात युवक-युवतींना रोजगाराची संधी नगण्य आहे. युवक-युवतींमध्ये मेहनत करण्याची जिद्द आणि कार्यतत्परता असूनही संधी मिळत नाही. त्यामुळे जिल्ह्याबाहेर त्यांना रोजगार संधी देण्याचे नियोजन पोलीस विभागाच्या पुढाकारातून करण्यात आले. पोलीस अधीक्षक अंकित गोयल, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) समीर शेख, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) सोमय मुंडे, अनुज तारे यांच्या मार्गदर्शनाखाली हा वैशिष्ट्यपूर्ण उपक्रम पोलिसांच्या नागरी कृती शाखेकडून राबविला जात आहे.
दि. ३०च्या मेळाव्याला पोलीस अधिकाऱ्यांसह आत्माचे कार्यक्रम समन्वयक तथा कृषी विज्ञान केंद्राचे प्रकल्प संचालक संदीप कऱ्हाळे, लिड बँकेचे व्यवस्थापक युवराज टेंभुर्णे प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमासाठी सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी व सर्व प्रभारी अधिकारी, नागरी कृती शाखेचे प्रभारी अधिकारी महादेव शेलार व अंमलदार यांनी सहकार्य केले.
आतापर्यंत २१५४ जणांना लाभ
पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातून आतापर्यंत जिल्ह्याच्या दुर्गम व अतिदुर्गम भागातील बेरोजगार युवक-युवतींना विविध प्रशिक्षण देण्यात आले. त्यात ब्युटी पार्लर ७०, मत्स्यपालन ६०, कुक्कुटपालन २९३, शिवणकाम ३५, फोटोग्राफी ३५, मधमाशी पालन ३२ व शेळीपालन ६७, पालेभाज्या लागवड ११४, टू व्हिलर व फोर व्हिलर दुरुस्ती २३५ अशा एकूण ९४१ बेरोजगार युवक-युवतींना प्रशिक्षण देऊन स्वयंरोजगारासाठी आत्मनिर्भर केले.
तसेच हॉस्पिटॅलिटी २५४, ऑटोमोबाइल प्रशिक्षण १९७, इलेक्ट्रिशियन ११५, प्लंबिंग ११, वेल्डिंग १८, सुरक्षा रक्षक ४१३, नर्सिंग असिस्टंट ११४३, ॲक्सिस बँक गडचिरोली यांच्या माध्यमातून फिल्ड ऑफिसर ११, अशा २१५४ ग्रामीण, गरीब व गरजू युवक-युवतींना प्रशिक्षण देऊन रोजगार उपलब्ध करून देण्यात आला.
३०० उमेदवारांना नियुक्तिपत्र
दि.३० डिसेंबरला एज्युकेशन फाउंडेशन राळेगाव, औरंगाबाद, अहमदनगर यांच्या माध्यमातून हॉस्पिटॅलिटी, ऑटोमोबाइल, इलेक्ट्रिकल, प्लंबिंग, वेल्डिंग, जनरल ड्युटीमध्ये निवड झालेल्या ३०० उमेदवारांना नियुक्तिपत्र तसेच आरसेटीच्या माध्यमातून पापड, लोणचे, टु-व्हिलर, फोर-व्हिलर दुरुस्ती, फास्ट फुड प्रशिक्षण पूर्ण केलेल्या १०१ युवक-युवतींना स्वयंरोजगार सुरू करण्याकरिता किट देण्यात आली. त्याचप्रमाणे कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन केंद्र (आत्मा) यांच्यामार्फत ९५ युवक-युवतींना पालेभाज्या लागवड प्रशिक्षण देण्यात आले.