२२ सीसीटीव्हींची अहेरीवर नजर
By Admin | Published: May 14, 2016 01:20 AM2016-05-14T01:20:21+5:302016-05-14T01:20:21+5:30
जिल्ह्यातील राजनगरी म्हणून प्रसिध्द असलेल्या अहेरी शहरातील विविध भागांमध्ये २२ सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचे काम प्रगतीपथावर आहे.
गुन्हेगारीला बसणार चपराक : जिल्ह्यातील पहिलाच प्रयोग
अहेरी : जिल्ह्यातील राजनगरी म्हणून प्रसिध्द असलेल्या अहेरी शहरातील विविध भागांमध्ये २२ सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचे काम प्रगतीपथावर आहे. या सीसीटीव्ही कॅमेरामुळे गुन्हेगारीवर आळा बसेल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.
अहेरी शहरातील मुख्य चौक, सर्व शाळा, महाविद्यालयांचा परिसर, पोलीस स्टेशन दवाखाना, बसस्थानक परिसर व धार्मिक स्थळांच्या परिसरात कॅमेरे लावले जाणार आहेत. यासाठी १५ लाख रूपयांचा खर्च येणार आहे. गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी हे शहर उपविभागातील अत्यंत महत्त्वाचे शहर आहे. विविध शासकीय कामांसाठी ग्रामीण व दुर्गम भागातील शेकडो नागरिक दर दिवशी अहेरी शहरात येतात.
सीसीटीव्ही कॅमेरांच्या माध्यमातून चोरी, घरफोडी, रोडरोमिओ, समाजकंटक व सामाजिक तेढ निर्माण करणारे उपद्रवी इसम, संशयास्पद मृत्यू व इतर सर्व बाबी सीसीटीव्ही कॅमेरात कैद होणार आहेत. महिला व युवतींच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोणातून हे कॅमेरे अत्यंत महत्त्वाची भूमिका बजाविणार आहेत. यातील सर्वच कॅमेरे वायरलेस असून याचे थेट लाईव्ह चित्रीकरण अहेरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरिक्षक यांच्या चेंबरमध्ये दिसणार आहे. सर्व कॅमेरामधील अहेरीची दैनंदिन परिस्थिती पोलीस अधिकारी कधीही बसू शकणार आहेत. कायदा व सुव्यवस्था कायम ठेवण्यासाठी तसेच सामान्य नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी मदत होणार आहे.
सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याचा प्रयोग जिल्ह्यात पहिल्यांदाच अहेरी शहरात केला जात आहे. हा प्रयोग यशस्वी झाल्यास आलापल्ली शहरातसुध्दा कॅमेरे बसविण्यात येणार आहे. पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांच्या प्रयत्नातून सीसीटीव्ही कॅमेरांसाठी निधी उपलब्ध झाला व सदर कॅमेरे लावण्याचे काम वेगाने सुरू आहे.
अहेरीचे पोलीस निरिक्षक संजय मोरे हे या उपक्रमासाठी विशेष मेहनत घेत आहेत. सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याचे काम सुरू झाले असून दानशूर चौक व राजे धर्मराव विज्ञान महाविद्यालयासमोर मनोरे उभारण्यात आले आहेत. लवकरच इतरही ठिकाणी मनोरे उभे करून सीसीटीव्ही कॅमेरे एक महिन्याच्या आत लावले जातील, अशी माहिती प्रशासनाने दिली आहे. सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याचा उद्देश जरी चांगला असला तरी सदर कॅमेरांची वेळोवेळी देखभाल व दुरूस्ती करावी लागणार आहे. अन्यथा सौरदिव्याप्रमाणेच कॅमेरांची स्थिती होण्याची शक्यता नाकारता येत नाही. (प्रतिनिधी)
सीसीटीव्ही कॅमेराच्या माध्यमातून अहेरी शहरातील गुन्हेगारी वृत्तीच्या नागरिकांवर करडी नजर राहणार आहे. सीसीटीव्ही कॅमेरामुळे महिलांची सुरक्षा वाढणार आहे व रोडरोमिओंवर चपराक बसणार आहे. अहेरीच्या प्रत्येक भागाची लाईव्ह माहिती संगणकावर लगेच अहेरी पोलीस स्टेशनमध्ये पाहता येणार आहे. त्यामुळे गुन्हेगारी प्र्रवृत्तीवर आळा बसण्यास फार मोठी मदत होईल.
- संजय मोरे,
पोलीस निरीक्षक, पोलीस स्टेशन अहेरी