माडेमूल शेतशिवारात २२ क्विंटल मोहसडवा नष्ट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2021 04:36 AM2021-04-11T04:36:03+5:302021-04-11T04:36:03+5:30
गडचिरोली : तालुक्यातील रानभुमी -माडेमूल शेतशिवारात मिळालेला २ लाख रुपये किंमतीचा २२ क्विंटल मोहसडवा व साहित्य नष्ट ...
गडचिरोली : तालुक्यातील रानभुमी -माडेमूल शेतशिवारात मिळालेला २ लाख रुपये किंमतीचा २२ क्विंटल मोहसडवा व साहित्य नष्ट करण्यात आले. गडचिरोली पोलीस व मुक्तीपथ तालुका चमूने ८ एप्रिल रोजी संयुक्तरित्या कारवाई केल्याने दारू विक्रेत्यांचे मोठे नुकसान करण्यात यश आले आहे.
रानभुमी -माडेमूल या गावांच्या माध्यमातून जिल्हा मुख्यालयासह तालुक्यातील इतर गावात सुद्धा दारू पुरविल्या जाते. यामुळे परिसरातील अनेक गावे त्रस्त झाले आहेत. याबाबत गडचिरोली पोलीस ठाण्यात वारंवार तक्रारी प्राप्त होत होत्या. गडचिरोली पोलीस व मुक्तीपथ तालुका चमूने संयुक्तरित्या रानभुमी -माडेमूल परिसरात अहिंसक कृती करण्याचे ठरविले. त्यानुसार शेतशिवारात शोधमोहीम राबवत दारू अड्डे उध्वस्त केले. विविध ठिकाणी टाकलेला २ लाख रुपये किंमतीचा २२ क्विंटल मोहसडवा व इतर साहित्य नष्ट करण्यात आले आहे. पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांच्या आदेशाने ऍक्शन प्लॅननुसार तालुक्यातील अवैध दारूविक्रेत्यांविरोधात मोहीम सुरु आहे. त्यानुसार तालुक्यातील मुजोर गावातील दारू विक्रेत्यांविरोधात गडचिरोली पोलिसांचे धाडसत्र सुरु आहे. अलोनी, चांदाळा, माडेमूल- रानमूल, रानभुमी येथे केलेल्या कारवाईमुळे तालुक्यातील दारूविक्रेते धास्तावले आहेत. ही कारवाई ठाणेदार दामदेव मंडलवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक ओमकांत म्हशाखेत्री, पोलिस शिपाई गणेश कांबळे, किशोर खोब्रागडे, मुक्तिपथ तालुका उपसंघटक रेवनाथ मेश्राम यांच्यासह होमगार्ड पथकाने केली.
फोटो ओळ - मोहसडवा नष्ट करताना पोलीस व मुक्तिपथ चमू