२२ गावांनी घेतला दारूबंदीचा ठराव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 1, 2018 01:20 AM2018-12-01T01:20:54+5:302018-12-01T01:22:03+5:30
तालुक्यातील उडेरा, बुर्गी, येमली, तुमरगुंडा तोडसा, शेवारी, मानेवाडा आणि गुरुपल्ली ग्रामपंचायती अंतर्गत येणाऱ्या २२ हून अधिक गावांनी ग्रामसभेत दारू आणि सुगंधी तंबाखूयुक्त खर्राबंदीचा ठराव घेत गावाला नशामुक्त करण्याचा ध्यास घेतला.
लोकमत न्यूज नेटवर्क
एटापल्ली : तालुक्यातील उडेरा, बुर्गी, येमली, तुमरगुंडा तोडसा, शेवारी, मानेवाडा आणि गुरुपल्ली ग्रामपंचायती अंतर्गत येणाऱ्या २२ हून अधिक गावांनी ग्रामसभेत दारू आणि सुगंधी तंबाखूयुक्त खर्राबंदीचा ठराव घेत गावाला नशामुक्त करण्याचा ध्यास घेतला. मुक्तिपथ तालुका चमूच्या सहकार्याने गाव संघटनेने यासाठी परिश्रम घेतले. केवळ दारूबंदीचा ठराव नाही, तर ही बंदी टिकविण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील राहणार असल्याचे ग्रामसभेत गावकऱ्यांनी सांगितले.
तालुक्यातील उडेरा ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या उडेरा(स), उदेरा(म), आलदंडी, परसलगोंदी, रेखानार या गावांनी गावसंघटनेच्या माध्यमातून दोन महिन्यापूर्वीच गावात दारूबंदी केली. एवढ्यावरच न थांबता शुक्रवारी उडेरा गावात सर्व गावांची एकत्रित ग्रामसभा झाली. यावेळी सर्व गावांनी दारूविक्री आणि खर्राविक्री बंद करण्याचा ठराव घेतला. बुर्गी गावात ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या मरकल, फुंडी, पैमा, अबनपल्ली गावांची एकत्रित ग्रामसभा घेण्यात आली.
या गावांनीही अनेक दिवसांपासून गाव संघटनेमार्फत दारू व सुगंधित तंबाखूयुक्त खर्राविक्री बंद केली आहे. या आठवड्यात ग्रामसभेत हा ठराव पारित करून या निर्णयावर त्यांनी शिक्कामोर्तब किले. त्याचबरोबर शेवारी, मानेवाडा, गुरुपल्ली या गावांसह तोडसा ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या सर्व गावांनी ग्रामसभेत दारूबंदीचे ठराव घेतले. मुक्तिपथ तालुका चमूने यासाठी सहकार्य केले.
तुमरगुंडा गावाचा दारूसह खर्ऱ्याच्या कायम बंदीचा ठराव
तालुक्यातील तुमरगुंडा गावाने दोन महिन्यापूर्वी गावातील खर्रा व दारूविक्री पूर्णपणे बंद केली आहे. ही बंदी अशीच टिकून गावात शांतता नांदावी, यासाठी गावसंघटन आणि ग्रामस्थ प्रयत्नशील आहेत. त्यासाठी म्हणून येथील ग्रामस्थांनी ग्रामसभा घेऊन दारू व खर्रा कायम बंदीचा ठराव घेतला.
केवळ दारूबंदीचा ठराव घेऊन चालणार नाही, तर ही बंदी टिकविण्यासाठी गावसंघटन आणि गावकऱ्यांनी प्रयत्न करण्याची गरज मुक्तिपथ तालुका चमूने लक्षात आणून दिली. त्यामुळे बंद केलेली दारू पुन्हा गावात कुठल्याही मागार्ने सुरू होऊ नये, यासाठी प्रयत्न करणार असल्याने ठरावात गावकऱ्यांनी सांगितले.