२३ हजार क्विंटल धान केंद्र परिसरात उघड्यावरच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2018 11:16 PM2018-02-05T23:16:22+5:302018-02-05T23:16:52+5:30
आदिवासी विकास महामंडळांतर्गत आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थांच्या वतीने गडचिरोली प्रादेशिक कार्यालयासह अहेरी उपविभागात एकूण ३५ केंद्रावरून धान खरेदी सुरू आहे.
आॅनलाईन लोकमत
गडचिरोली : आदिवासी विकास महामंडळांतर्गत आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थांच्या वतीने गडचिरोली प्रादेशिक कार्यालयासह अहेरी उपविभागात एकूण ३५ केंद्रावरून धान खरेदी सुरू आहे. मात्र अहेरी उपविभागातील केंद्र परिसरातील गोदाम खरेदी केलेल्या धानाने पूर्णत: भरलेले आहेत. तसेच भरडाईसाठी धानाची उचल करण्यात दिरंगाई होत असल्याने तब्बल २३ हजार ९४४ क्विंटल धान केंद्र परिसरात उघड्यावर आहे. परिणामी यंदाही आदिवासी विकास महामंडळाला लाखोचा फटका बसण्याची शक्यता नाकारता येत नाही.
महामंडळाच्या आधारभूत खरेदी योजना हंगाम २०१७-१८ अंतर्गत अहेरी उपप्रादेशिक कार्यालयाच्या वतीने अहेरी उपविभागात एकूण ३५ धान खरेदी केंद्रास मंजुरी देण्यात आली असून यापैकी ३४ धान खरेदी केंद्रावर प्रत्यक्ष धानाची आवक झाली आहे. अहेरी उपविभागात या कार्यालयाच्या वतीने संस्थांमार्फत आतापर्यंत एकूण जवळपास ९३ हजार ८८७.४८ क्विंटल धानाची खरेदी झाली आहे. यापैकी ६८१४३.४४ धानाची खरेदी गोदामात तर २५७४४.०४ इतक्या धानाची खरेदी उघड्यावर झालेली आहे. यापैकी आतापर्यंत उघड्यावरून १ हजार ८०० क्विंटल इतक्याच धानाची भरडाईसाठी उचल झाली आहे. ६८१४३.४४ इतका धान गोदामात साठवण्यात आला असून तब्बल २३९४४.०४ क्विंटल धान केंद्राच्या परिसरात उघड्यावर ठेवण्यात आले आहे.
अहेरी येथील केंद्रावर २०६७.९० क्विंटल धान उघड्यावर आहे. देचलीपेठा येथील केंद्रावर ३४३४.८० क्विंटल, अमरादी येथील केंद्रावर ७ हजार ७५२ क्विंटल, अंकिसा केंद्रावर २२५४.४० क्विंटल, वडधम केंद्रावर २५५०.०४ क्विंटल, रोमपल्ली येथील केंद्रावर २५०१.६० क्विंटल, तोडसा येथील केंद्रावर ४६० क्विंटल, घोटसूर येथील केंद्रावर ५५२.१० क्विंटल, जारावंडी केंद्रावर २२६४.८० तर हालेवारा केंद्रावर १०६.४० क्विंटल धान केंद्राच्या परिसरात उघड्यावर आहे. या संदर्भातील अहवाल अहेरी कार्यालयाने गडचिरोलीच्या कार्यालयाला सादर केला आहे.
पुरेशा गोदाम निर्मितीकडे कानाडोळा
आदिवासी विकास महामंडळामार्फत अहेरी उपप्रादेशिक कार्यालयाच्या वतीने आविका संस्थांमार्फत दरवर्षी रबी व खरीप हंगामात मोठ्या प्रमाणात धान खरेदी अनेक केंद्रांवरून केली जाते. मात्र या केंद्रस्तरावर पुरेशा गोदामाची व्यवस्था नाही. त्यामुळे हजारो क्विंटल धान केंद्राच्या परिसरात उघड्यावर ठेवावा लागतो. परिणामी महामंडळाला दरवर्षी नुकसान सहन करावे लागते. हे नुकसान टाळण्यासाठी आदिवासी विकास महामंडळासह शासनाने नव्याने गोदामाची निर्मिती करणे गरजेचे आहे. मात्र या बाबीकडे कानाडोळा होत आहे.