दलित वस्त्यांसाठी मिळणार २.३० कोटी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2020 12:48 AM2020-01-15T00:48:38+5:302020-01-15T00:49:31+5:30
सदर योजनेअंतर्गत १९७४ पासून ज्या गावांना लाभ मिळाला नाही त्या गावांना यात प्राधान्य देऊन त्या गावांची निवड करण्यात आली. यात सर्वाधिक १६ वस्त्या आरमोरी तालुक्यातील आहेत. त्यांना ५८ लाख ४० हजार रुपयांचा निधी मिळणार आहे. यासोबतच गडचिरोली तालुक्यातील १४ वस्त्यांचा समावेश असून त्यांना ५३.५० लाखांचा निधी दिला जाणार आहे. प्रत्येक वस्तीला १ ते ५ लाखापर्यंत निधी मिळणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : जिल्ह्यातील अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांचा विकास (दलित वस्ती सुधार) योजनेअंतर्गत आतापर्यंत लाभापासून वंचित असलेल्या जिल्ह्यातील ७३ गावांना २ कोटी ३० लाख रुपयांचा निधी मिळणार आहे. ही कामे याच आर्थिक वर्षात पूर्ण करावयाची आहेत. त्यामुळे पुढील दोन महिन्यात अनेक गावात छोटी-मोठी कामे होणार आहेत.
सदर योजनेअंतर्गत १९७४ पासून ज्या गावांना लाभ मिळाला नाही त्या गावांना यात प्राधान्य देऊन त्या गावांची निवड करण्यात आली. यात सर्वाधिक १६ वस्त्या आरमोरी तालुक्यातील आहेत. त्यांना ५८ लाख ४० हजार रुपयांचा निधी मिळणार आहे. यासोबतच गडचिरोली तालुक्यातील १४ वस्त्यांचा समावेश असून त्यांना ५३.५० लाखांचा निधी दिला जाणार आहे. प्रत्येक वस्तीला १ ते ५ लाखापर्यंत निधी मिळणार आहे. त्यातून अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या उत्थानासाठी विविध उपक्रम राबविणे अपेक्षित आहे. मात्र प्रत्यक्षात रस्ता, नाल्या, हातपंप यासारख्या कामांचेच प्रस्ताव येत आहेत. जिल्हा परिषद समाजकल्याण विभागामार्फत सदर निधीचे वाटप केले जाणार आहे.
निधी मिळण्यासाठी निवडलेल्या गावांमध्ये गडचिरोली तालुक्यातील मारोडा, खुर्सा, मेंढा, पोर्ला (आंबेडकर वार्ड व सुभाष वार्ड), गुरवळा, बामणी, साखरा, खरपुंडी (आंबेडकर वार्ड क्र.३ व गौतम वार्ड क्र.२), पारडी, काटली (गांधी वार्ड, आंबेडकर वार्ड) आणि नगरगाव या गावांमधील वस्त्यांचा समावेश आहे. आरमोरी तालुक्यातील चामोर्शी माल, वासाळा (डॉ.आंबेडकर वार्ड व मेश्राम वार्ड), कोरेगाव रांगी (कोरेगाव व थोटेबोडी), नरचुली, मोहझरी, किटाळी, वडधा, कुरंडीमाल (रमाई वार्ड व कराडी चक), देऊळगाव (वार्ड क्र.१ व ३), सिर्सी आणि वैरागड या गावांमधील वस्त्यांना निवडण्यात आले आहे.
देसाईगंज तालुक्यातील आमगाव, कुरूड येथील आंबेडकर चौक, होळी चौक व इंदिरा आवास टोली, विसोरा, सावंगी आणि चोप येथील ३ वस्त्यांचा मिळून ३० लाखांचा निधी मिळणार आहे. कोरची तालुक्यातील सोहले, कोठरा व भीमपूर या गावांना १०.५० लाख दिले जाणार आहे. सिरोंचा तालुक्यातील आदिमुत्तापूर, मोयाबीनपेठा, पर्सेवाडा व जामनपल्ली या गावांना १९ लाख रुपयांचा निधी मिळणार आहे. चामोर्शी तालुक्यात कुनघाडा रै., अड्याळ, ईल्लूर, भाडबिडी बी, माडे आमगाव या गावांना १५ लाखांचा निधी दिला जाणार आहे.
भामरागड तालुक्यात आरेवाडा, टेकला, धोडराज, लाहेरी आणि ताडगाव या गावांमधील दलित वस्तींना १२ लाख, मुलचेरा तालुक्यात चुटगुंटा ग्रा.पं.अंतर्गत लगाम चेकसाठी २ लाख, कुरखेडा तालुक्यात तळेगाव व वडेगाव ग्रामपंचायतींना ५.५० लाख, धानोरा तालुक्यात रांगी व मोहली या गावांना ७ लाख मिळणार आहेत.
अहेरी तालुक्यात आरेंदा, जिमलगट्टा (रसपल्ली), कमलापूर, कुरूमपल्ली, मेडपल्ली, नागेपल्लीमधील येकापल्ली व मोदुमडगू तथा रेपनपल्ली या गावांच्या दलित वस्तींना १६ लाखांचा निधी दिला जाणार आहे. तसेच एटापल्ली तालुक्यातील सोहगाव (भापडा), घोटसूर (गुंडाम), वटेगट्टा आणि बुर्गी (पैमा) या चार गावांना ८ लाखांचा निधी मिळणार आहे.
तपासणी करून गावांची निवड
अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांचा विकास योजनेअंतर्गत १९७४ पासून झालेल्या कामांचा तपासणी करण्यात आली. समाजकल्याण आयुक्त पुणे यांच्यामार्फत नियुक्त चमूने गेल्यावर्षीच ही तपासणी केली. त्यात जिल्ह्यातील कोणत्या दलित वस्त्यांमध्ये किती निधी खर्च करण्यात आला हे पाहिल्यानंतर जी गावे आतापर्यंत वंचित किंवा दुर्लक्षित होती त्याच ग्रामपंचायतींमधील दलित वस्त्यांची यासाठी निवड करण्यात आली. लवकरच त्यातून कामे सुरू होतील.