वाघ व बिबट्यांच्या हल्ल्यात २३० पाळीव जनावरे ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2020 05:00 AM2020-12-13T05:00:00+5:302020-12-13T05:00:32+5:30
वन्यजीवांच्या हल्ल्यात जखमी झालेल्या व्यक्तीला वनविभागामार्फत आर्थिक मदत दिली जाते. त्यामुळे मनुष्य किंवा प्राण्यांची हानी झाल्यास त्याची नाेंद वनविभाग ठेवते. वनविभागाकडे उपलब्ध माहितीनुसार जानेवारी ते सप्टेंबर या नऊ महिन्यांच्या कालावधीत सुमारे २३० पाळीव जनावरांवर हल्ले झाले आहेत. त्यांच्या मालकांना वनविभागामार्फत २४ लाख रुपयांची मदत वितरित केली आहे. तर २ लाख रुपये अर्थसहाय्य देणे बाकी आहे.
लाेकमत न्यूज नेटवर्क
गडचिराेली : जानेवारी ते सप्टेंबर या नऊ महिन्यांच्या कालावधीत वाघ व बिबट्यांनी केलेल्या हल्ल्यांमध्ये सुमारे २३० पाळीव जनावरे ठार झाली आहेत. सर्वाधिक हाणी देसाईगंज व गडचिराेली वनविभागाअंतर्गत झाली आहे. त्या प्राण्यांच्या मालकांना वनविभागाकडून २४ लाखांची मदत देण्यात आली.
गडचिराेली जिल्ह्यात जवळपास ७८ टक्के भूभागावर जंगल असले तरी वाघांची संख्या अगदी नगण्य हाेती. काही प्रमाणात बिबटे आढळून येत हाेते. मात्र हे बिबटे जंगलातच राहत असल्याने त्यांच्याकडून मानव किंवा पाळीव जनावरांवर फार क्वचित प्रमाणात हल्ले हाेत हाेते. मात्र मागील काही दिवसांमध्ये जिल्ह्यात वाघ व बिबट्यांची संख्या माेठ्या प्रमाणात वाढली आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील ताडाेबा येथील अनेक वाघांनी सीमा ओलांडून गडचिराेली जिल्ह्यात प्रवेश केला आहे. तसेच पूर्वीच्या तुलनेत बिबट्यांची संख्या सुद्धा वाढली आहे. परिणामी या दाेन्ही हिंस्त्र प्राण्यांकडून मानव व पाळीव जनावरांवरील हल्ले वाढले आहेत.
वन्यजीवांच्या हल्ल्यात जखमी झालेल्या व्यक्तीला वनविभागामार्फत आर्थिक मदत दिली जाते. त्यामुळे मनुष्य किंवा प्राण्यांची हानी झाल्यास त्याची नाेंद वनविभाग ठेवते. वनविभागाकडे उपलब्ध माहितीनुसार जानेवारी ते सप्टेंबर या नऊ महिन्यांच्या कालावधीत सुमारे २३० पाळीव जनावरांवर हल्ले झाले आहेत. त्यांच्या मालकांना वनविभागामार्फत २४ लाख रुपयांची मदत वितरित केली आहे. तर २ लाख रुपये अर्थसहाय्य देणे बाकी आहे.
५२ नागरिक जखमी
वाघ, बिबट, रानडुकर, अस्वल या हिंस्त्र प्राण्यांच्या हल्ल्यात जानेेवारी ते सप्टेंबर या कालावधीत सुमारे ५२ नागरिक जखमी झाले आहेत. यातही गडचिराेली व देसाईगंज वनविभागात हल्ल्यांचे प्रमाण अधिक आहे.
मागील दाेन वर्षात गडचिराेली जिल्ह्यात वाघ व बिबट्यांची संख्या वाढली आहे. वाघ व बिबटे गावाजवळ तसेच गावातही प्रवेश करीत आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. बिबट्यांनी अनेकवेळा गावांमध्ये शिरून हल्ले केले आहेत. या हिंस्त्र प्राण्यांचा बंदाेबस्त करणे आवश्यक आहे.