२३४ नागरिकांना घरपोच प्रमाणपत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2018 12:07 AM2018-07-15T00:07:09+5:302018-07-15T00:08:16+5:30
भामरागडचे तहसीलदार कैलास अंडील यांच्या पुढाकाराने तलाठी प्रविण पाटील, कोतवाल दौलत तलांडे यांनी भर पावसात २३४ लोकांना जात प्रमाणपत्राचे वाटप केले. विशेष म्हणजे, सदर कर्मचाऱ्यांनी संबंधित नागरिकांना हे दाखले घरपोच पुरविले.
लोकमत न्यूज नेटवर्क
भामरागड : भामरागडचे तहसीलदार कैलास अंडील यांच्या पुढाकाराने तलाठी प्रविण पाटील, कोतवाल दौलत तलांडे यांनी भर पावसात २३४ लोकांना जात प्रमाणपत्राचे वाटप केले. विशेष म्हणजे, सदर कर्मचाऱ्यांनी संबंधित नागरिकांना हे दाखले घरपोच पुरविले. जात प्रमाणपत्र मिळाल्यामुळे आता विसामुंडीवासीयांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेणे शक्य होणार आहे.
दुर्गम भागातील विसामुंडी गावाला जाण्यासाठी पक्का रस्ता नाही. याशिवाय मर्दहूर, कत्रणगट्टा, गुंडापूरी आदी गावांना जाण्यासाठी रस्ता नाही. भामरागड तालुका मुख्यालयापासून या गावांचे अंतर ३० ते ३३ किमी आहे. रस्ते व दळणवळणाच्या सोयीअभावी सदर परिसरातील नागरिक जात प्रमाणपत्र काढण्यासाठी भामरागड येथे पोहाचत असतात. मात्र येथे कधी तलाठी मिळत नाही. ग्रामसेवक मिळत नाही. इंटरनेटची समस्या आहे. त्यामुळे आवश्यक असलेले जात प्रमाणपत्र व इतर सर्व प्रमाणपत्रे व दाखले विसामुंडीवासीयांना वेळेत उपलब्ध होत नव्हते. परिणामी या गावातील व परिसरातील बहुतांश नागरिक शासकीय योजनांच्या लाभापासून वंचित आहेत. ही बाब लक्षात घेऊन भामरागडचे तहसीलदार कैलास अंडील यांनी महसूल कर्मचाºयामार्फत नागरिकांना घरपोच जात प्रमाणपत्र देण्याचा निर्णय घेतला. दुर्गम भागातील नागरिकांचे दाखल्यांचे प्रस्ताव तयार करून घेण्याचे ठरविण्यत आले. कोटगल साजाच्या तलाठ्यामार्फत आवश्यक दस्तावेज तयार करून ते आॅनलाईन पाठविण्याचे निर्देश दिले. यंत्रणा कामाला लागून प्रमाणपत्र तयार केले. विसामुंडी येथील २३४ नागरिकांना जात प्रमाणपत्राचे घरपोच वितरण करण्यात आले. यावेळी विसामुंडीचे पोलीस पाटील आनंदराव मडावी, शामराव मडावी, अनिल पोरतेटी, गुंडापुरीचे पोलीस पाटील बिरजू हिचामी, कत्रणगट्टाचे पोलीस पाटील मुक्ता मडावी, जि.प. शाळेचे मुख्याध्यापक रोहणकर, शिक्षक बंडावार आदी उपस्थित होते. तहसीलदार अंडील यांच्या पुढाकाराने तालुक्याची महसूल यंत्रणा कामाला लागली. त्यामुळे आता कर्मचाºयांमार्फत दररोज नागरिकांना प्रमाणपत्राचे वाटप केले जात आहे.
नागरिकांनी व्यक्त केले समाधान
भामरागड तालुक्याच्या दुर्गम व अतिदुर्गम गावात रस्ता व वाहतुकीच्या साधनांचा अभाव आहे. त्यामुळे दररोज भामरागड येथे येऊन विविध प्रकारचे प्रमाणपत्र प्राप्त करून घेऊ शकत नाही. ही अडचण लक्षात घेऊन तहसीलदार अंडील यांच्या पुढाकाराने प्रमाणपत्र घरपोच देण्याचा उपक्रम सुरू केला आहे.