पूर्व विदर्भात हत्तीपायाचे २३,८२३ रुग्ण; सर्वाधिक 'या' जिल्ह्यांत

By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2023 02:24 PM2023-01-10T14:24:25+5:302023-01-10T14:34:12+5:30

राज्यभरातून हत्तीरोगाचे व अंडकोषाचे सर्वाधिक रुग्ण चंद्रपूर जिल्ह्यातच; काय आहे कारण?

23,823 Lymphatic filariasis patients in East Vidarbha; Most in Chandrapur, Gadchiroli district | पूर्व विदर्भात हत्तीपायाचे २३,८२३ रुग्ण; सर्वाधिक 'या' जिल्ह्यांत

पूर्व विदर्भात हत्तीपायाचे २३,८२३ रुग्ण; सर्वाधिक 'या' जिल्ह्यांत

Next

मनाेज ताजने / परिमल डाेहणे

गडचिरोली / चंद्रपूर : राज्यात हत्तीपायाचे सर्वाधिक २३ हजार ८२३ रुग्ण पूर्व विदर्भातील ६ जिल्ह्यांत आहेत. त्यात चंद्रपूर जिल्हा पहिल्या क्रमांकावर आहे. चंद्रपूरमध्ये हत्तीपायाचे तब्बल १० हजार ३८० रुग्ण आहेत. जंगलाचा प्रदेश, भाताची शेती आणि घाण पाणी तुंबणे ही त्यामागील प्रमुख कारणे सांगितली जातात.

क्युलेक्स या जातीच्या डासांपासून हत्तीपाय, अंडवृद्धी आणि जपानी मेंदुज्वर होतो. क्युलेक्सच्या अनेक प्रजाती आहेत. या डासांचा नेहमी प्रादुर्भाव असणाऱ्या भागात आरोग्य विभागाकडून डासांचे नमुने गोळा करून त्यांचे प्रयोगशाळेत परीक्षण केले जाते. त्यानुसार धोकादायक डासांचे प्रमाण असणाऱ्या भागात कीटकनाशक फवारणीसोबत नागरिकांना मच्छरदाण्यांचे वाटप केले जाते; पण तरीही हत्तीपायासारख्या आजारांचे प्रमाण अपेक्षेएवढे कमी झालेले नाही. पूर्व विदर्भात होणारी धानाची शेती, जंगलांचे प्रमाण आणि साचून राहणारे अस्वच्छ पाणी ही त्यामागील प्रमुख कारणे आहेत. शहरी भागात प्रत्येक घरात शौचालयांच्या पाइपवर जाळ्या बनविण्यासाठी नगर प्रशासनाने पुढाकार घेणे गरजेचे आहे.

१८ महिने दिसत नाहीत लक्षणे

हत्तीपायाच्या डासांचा दंश झाल्यानंतर थोडा ताप येतो; पण १८ महिन्यांपर्यंत ठळक लक्षणे दिसत नाहीत. विशेष म्हणजे या कालावधीत त्या व्यक्तीला दंश करणाऱ्या डासामार्फत हत्तीपायचे जंतू इतरांच्या शरीरात जाऊ शकतात. १८ महिन्यांनंतर मात्र हत्तीरोग झालेल्या व्यक्तीमार्फत आजार पसरत नाही.

‘क्युलेक्स कटेझरी’वरील संशोधन अर्धवट?

२०१३-१४ दरम्यान तत्कालीन कीटकशास्त्रज्ञ मुकुंद देशपांडे यांनी गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा तालुक्यात कटेझरी गावाजवळच्या एका नाल्याजवळ क्युलेक्स प्रजातीच्या डासाची अळी पकडून नागपूरच्या प्रयोगशाळेत संशोधन केले. ती क्युलेक्समधीलच वेगळ्या प्रजातीच्या डासाची अळी असल्याचे दिसून आले. त्यामुळे त्याला क्युलेक्स कटेझरी हे नाव देण्यात आले; पण त्या डासापासून नेमका कोणता आजार होतो याचे संशोधन मात्र झाले नाही.

राज्यभरातून हत्तीरोगाचे व अंडकोषाचे सर्वाधिक रुग्ण चंद्रपूर जिल्ह्यातच असल्याची नोंद आहे. हत्तीरोगाचे उच्चाटन करण्यासाठी ९ जानेवारीपासून चिमूर येथे गोळ्या वाटपाचे काम सुरू करण्यात आले आहे.

- डॉ. प्रतीक बोरकर, हिवताप अधिकारी, चंद्रपूर

हत्तीपाय रुग्णांची संख्या

  • चंद्रपूर : १०,३८०
  • नागपूर ४,३९०
  • गडचिरोली ३,६९८
  • भंडारा २,९३६
  • नांदेड २,१६५
  • वर्धा १,६८९
  • अमरावती १,१०५
  • गोंदिया ७३०
  • पालघर ६४७
  • यवतमाळ ५९२

अंडकोष रुग्णांची संख्या

  • चंद्रपूर ३,०६७
  • गडचिरोली ९०२
  • गोंदिया ७५१
  • नागपूर ६७९
  • यवतमाळ ३९०
  • नांदेड ३६२
  • अमरावती ३२१
  • लातूर २९७
  • भंडारा २०५
  • उस्मानाबाद ११०

Web Title: 23,823 Lymphatic filariasis patients in East Vidarbha; Most in Chandrapur, Gadchiroli district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.