24 डी.एड्. कॉलेजला अवकळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2020 05:00 AM2020-12-19T05:00:00+5:302020-12-19T05:00:32+5:30
महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीनंतर (१९६०) गाव तिथे शाळा हे धाेरण शासनाने अवलंबले. त्यावेळी माेठ्या प्रमाणात प्राथमिक शिक्षकांची भरती झाली. हे शिक्षक १९९५ पासून सेवानिवृत्त हाेण्यास सुरूवात झाले. त्यांची जागा भरण्यासाठी दरवर्षी नवीन प्राथमिक शिक्षकांची भरती हाेत हाेती. त्या कालावधीत डीएड् काॅलेजची संख्या कमी हाेती. त्यामुळे प्रशिक्षणार्थी सुध्दा कमी हाेते. परिणामी डीएड्चे प्रशिक्षण पूर्ण हाेताच अवघ्या एक वर्षाच्या कालावधीत प्राथमिक शिक्षकाची नाेकरी मिळत हाेती.
लाेकमत न्यूज नेटवर्क
गडचिराेली : एकेकाळी नाेकरीची हमखास हमी देणारा अभ्यासक्रम म्हणून डीएड् पदविकेची ओळख हाेती. मात्र मागील १० वर्षांमध्ये शिक्षक भरती रखडल्याने डीएड्चे प्रशिक्षण घेऊनही नाेकरी न मिळालेले हजारो युवक उदरनिर्वाहासाठी इतर व्यवसाय करत आहेत. या स्थितीमुळे विद्यार्थ्यांनी या प्रशिक्षणाकडे पाठ फिरवली आहे. प्रशिक्षणार्थी विद्यार्थीच मिळत नसल्याने जिल्ह्यातील एकूण २५ डीएड् काॅलेजपैकी सुमारे २४ डीएड् काॅलेज बंद पडले आहेत. केवळ मुरखळा येथील एकमेव डीएड् काॅलेज सुरू आहे.
महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीनंतर (१९६०) गाव तिथे शाळा हे धाेरण शासनाने अवलंबले. त्यावेळी माेठ्या प्रमाणात प्राथमिक शिक्षकांची भरती झाली. हे शिक्षक १९९५ पासून सेवानिवृत्त हाेण्यास सुरूवात झाले. त्यांची जागा भरण्यासाठी दरवर्षी नवीन प्राथमिक शिक्षकांची भरती हाेत हाेती. त्या कालावधीत डीएड् काॅलेजची संख्या कमी हाेती. त्यामुळे प्रशिक्षणार्थी सुध्दा कमी हाेते. परिणामी डीएड्चे प्रशिक्षण पूर्ण हाेताच अवघ्या एक वर्षाच्या कालावधीत प्राथमिक शिक्षकाची नाेकरी मिळत हाेती. परिणामी डीएड करण्याकडे विद्यार्थ्यांचा कल वाढला. जे विद्यार्थी स्पर्धेत टिकू शकत नव्हते असे विद्यार्थी डीएड् काॅलेजच्या व्यवस्थापन काेट्यातून प्रवेश घेत हाेते. यासाठी १० वर्षांच्या पूर्वी दाेन ते अडीच लाख रुपये डाेनेशन म्हणून संस्थाचालकाला देत हाेते. २००५ मध्ये सर्वात माेठी भरती झाली. त्यानंतर मात्र प्राथमिक शिक्षकांच्या जागा निघणे कमी कमी हाेत गेले. मात्र या कालावधीत डीएड काॅलेजची संख्या व प्रशिक्षणार्थ्यांची संख्या कित्येक पटीने वाढली हाेती. डीएड् करूनही नाेकरी मिळत नसल्याचे लक्षात आल्यानंतर विद्यार्थ्यांनी युवकांनी डीएडच्या प्रशिक्षणाकडे पुन्हा पाठ फिरविली. दाेन वर्ष डीएड् करण्यापेक्षा इतर अभ्यासक्रम करण्यावर भर दिला. परिणामी डीएड् काॅलेजला विद्यार्थी मिळत नसल्याने हे काॅलेज बंद करावे लागले. गडचिराेली जिल्ह्यात एक शासकीय डीएड् काॅलेज व २४ विनाअनुदानित काॅलेज हाेते. सद्य:स्थितीत शासकीय डीएड् काॅलेजसह सुमारे २३ विनाअनुदानित काॅलेज बंद पडले आहेत. केवळ गडचिराेली जवळील मुरखळा येथील साईनाथ अद्यापक विद्यालय सुरू आहे. या अद्यापक विद्यालयात काही विद्यार्थ्यांनी प्रवेश सुध्दा घेतला आहे. डीएड् काॅलेज बंद पडल्याने या ठिकाणी काम करणारे शेकडाे प्राध्यापक बेराेजगार झाले आहेत.
टीईटीची मुदत संपली
२०१३ मध्ये टीईटी (शिक्षक पात्रता परीक्षा) घेण्यात आली हाेती. नाेकरीसाठी ही परीक्षा पात्र असणे आवश्यक हाेते. या परीक्षेत लाखाे विद्यार्थी पात्र ठरले. भरती निघून नाेकरी लागेल, अशी अपेक्षा हाेती. मात्र भरती निघाली नाही. सात वर्षानंतर आता मुदतही संपली आहे.
मिळेल त्या क्षेत्रात काम
प्राथमिक शिक्षकाची नाेकरी मिळणे कठीण आहे. ही बाब लक्षात आल्यानंतर युवकांनी मिळेल ताे राेजगार व नाेकरी करण्यास सुरूवात केली. काही प्रशिक्षणार्थी आपला पारंपारीक व्यवसाय करीत आहेत. अनेक क्षेत्रात डीएड, बीएड, बीपीएड झालेले प्रशिक्षणार्थी काम करताना अजुनही दिसून येतात.
प्राथमिक शिक्षकाची नाेकरी मिळेल या अपेक्षेने बारावीनंतर डीएड्चे प्रशिक्षण केले. प्रशिक्षण पूर्ण हाेऊन आता जवळपास आठ वर्षांचा कालावधी पूर्ण झाला आहे. मात्र नाेकरी मिळाली नाही. त्यामुळे मला पारंपरिक पर्यायी व्यवसाय सुरू करावा लागला.
- त्रिदेव जांभुळे,
बेरोजगार तरुण