दुकानदारांचे २४ लाखांचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2017 01:27 AM2017-07-21T01:27:18+5:302017-07-21T01:27:18+5:30
पर्लकोटा नदीला आलेल्या पुराचे पाणी भामरागड शहरात शिरले. यामुळे व्यापाऱ्यांचे २४ लाख रूपयांचे नुकसान झाले
तहसीलदारांना निवेदन : भामरागडातील पंचनामे करून तत्काळ मदत द्या
लोकमत न्यूज नेटवर्क
भामरागड : पर्लकोटा नदीला आलेल्या पुराचे पाणी भामरागड शहरात शिरले. यामुळे व्यापाऱ्यांचे २४ लाख रूपयांचे नुकसान झाले असून तलाठ्यांमार्फत पंचनामा करून नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी तहसीलदारांच्या मार्फत जिल्हाधिकाऱ्यांना पाठविलेल्या निवेदनातून भामरागड शहरातील व्यापाऱ्यांनी केली आहे.
पुराचे पाणी रात्रीच्या सुमारास भामरागड शहरात शिरले. त्यामुळे व्यापाऱ्यांना दुकानातील सामान काढण्यासह सवड मिळाली नाही. परिणामी दुकानातील सामान पुराच्या पाण्याने खराब झाले. प्रत्येक व्यापाऱ्याचा लाखो रूपयांचा नुकसान झाले आहे. या सर्व नुकसानीचा पंचनामा करून आर्थिक मदत जाहीर करावी, अशी मागणी निवेदनातून केली.
पुरामुळे आशिफ रहिमतुल्ला सुफी यांचे तीन लाख रूपयांचे नुकसान झाले आहे. सुधाकर मोंडय्या ऐतावार सात लाख, हमीद सब्बरबेग मोगल यांचे दीड लाख, अकमक पठाण यांचे दीड लाख, सलीम बब्बू शेख यांचे एक लाख, करणसिंग मोहनसिंग राठोड यांचे एक लाख, राजकुमार अवस्ती एक लाख, सर्फराजअली रियाजअली सय्यद यांचे ५० हजार, बहादूर भिकाजी आत्राम यांचे दीड लाख, सुजीत जतीन डे यांचे दोन लाख, महेश येनप्रेड्डीवार यांचे अडीच लाख रूपयांचे नुकसान झाले आहेत.
दुकानातील बहुतांश माल पाण्याने भिजून नष्ट झाला आहे. इमारत, फर्निचर, इलेक्ट्रॉनिक वस्तूंचेही मोठे नुकसान झाले आहे. त्याचबरोबर काही दिवस दुकानही बंद ठेवावे लागणार आहे. त्यामुळेही दुकानदारांचे नुकसान होणार आहे. तत्काळ मदतीची मागणी आहे.