गडचिरोलीतून विनावाहक २४ थेट बसफेऱ्या सुरू

By Admin | Published: September 25, 2016 01:50 AM2016-09-25T01:50:34+5:302016-09-25T01:50:34+5:30

राज्य परिवहन महामंडळाचे गडचिरोली येथील विभागीय नियंत्रक व्ही. टी. गव्हाळे यांनी गडचिरोली आगारात वाहकांची संख्या कमी असल्यामुळे

24 live buses from Gadchiroli start without permission | गडचिरोलीतून विनावाहक २४ थेट बसफेऱ्या सुरू

गडचिरोलीतून विनावाहक २४ थेट बसफेऱ्या सुरू

googlenewsNext

विभागीय नियंत्रकांचा निर्णय : दर अर्ध्या तासाने चंद्रपूरकरिता बसफेरी
गडचिरोली : राज्य परिवहन महामंडळाचे गडचिरोली येथील विभागीय नियंत्रक व्ही. टी. गव्हाळे यांनी गडचिरोली आगारात वाहकांची संख्या कमी असल्यामुळे लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी नवे धोरण आखले आहे. त्यांनी गेल्या दीड महिन्यांपासून गडचिरोली येथून चंद्रपूरसाठी दिवसातून तब्बल २४ बसफेऱ्या थेट सुरू केल्या आहे. या थेट बसफेऱ्यांमुळे लांब पल्ल्याचा प्रवास करणारे प्रवाशी सुखावले असले तरी व्याहाड बूज, व्याहाड खुर्द व सावली तसेच चंद्रपूर मार्गावरील इतर भागातील प्रवाशांची अडचण झाली आहे.
विभागीय नियंत्रक गव्हाळे हे येथे रूजू झाल्यानंतर त्यांनी बसफेऱ्या, चालक, वाहक तसेच इतर मनुष्यबळाबाबतचा सविस्तर आढावा कर्मचाऱ्यांकडून घेतला. निलंबित झालेले अनेक बसवाहक पुन्हा एसटीच्या सेवेत रूजू होत नाही. याशिवाय अत्यल्प वेतन असल्याने अनेक चालक, वाहक काही वर्षात राज्य परिवहन महामंडळाची नोकरी सोडून जातात. त्यामुळे गडचिरोली आगारासह राज्यभरात चालक व वाहकाचे पदे दरवर्षी झपाट्याने रिक्त होत आहेत. रिक्त पदांमुळे आगाराच्या दैनंदिन बसफेऱ्यांवर मोठा परिणाम होतो. एसटीची प्रवाशी वाहतूक प्रभावित होऊ नये, यासाठी एसटी वाहक कमी असतानाही ‘विनावाहक’ बस सेवा सुरू करण्याचा निर्णय विभागीय नियंत्रक गव्हाळे यांनी घेतला. या निर्णयाची अंमलबजावणी गेल्या दीड महिन्यांपासून सुरू आहे. गडचिरोलीवरून थेट चंद्रपूरकडे जाणाऱ्या दिवसातून २४ बसफेऱ्यांचा थांबा केवळ मूल व चंद्रपूर येथेच देण्यात आला आहे. यामुळे लांब पल्ल्याचा प्रवास करणाऱ्या प्रवाशांना गडचिरोली आगारामार्फत चांगली सेवा मिळत आहे. दर अर्ध्या तासाने चंद्रपूरसाठी थेट बसफेरी असल्याने चंद्रपूर व मूलला जाणाऱ्या प्रवाशांची प्रतीक्षा (ताटकळत राहणे) संपली आहे. चंद्रपूर ते गडचिरोली दररोज अपडाऊन करणारे शासकीय, खासगी कर्मचाऱ्यांना सदर बसफेरी सुलभ झाली आहे. मात्र या बसफेरीच्या चालकाला तिकीट कापण्याची अतिरिक्त जबाबदारी पार पाडावी लागत आहे. खाजगी बससेवेला फटका बसला आहे. (प्रतिनिधी)

विनावाहक दैनंदिन बसफेऱ्यांचे वेळापत्रक
गडचिरोली आगारातून चंद्रपूरसाठी विनावाहक दिवसातील पहिली बसफेरी सकाळी ७ वाजता रवाना होते. दुसरी बसफेरी ७.३० वाजता, तिसरी ८.०० वाजता, चौथी ८.३० त्यानंतर ९.३०, १०.००, १०.३०, ११.००, ११.३०, ११.००, दुपारी १२.००, १२.३०, १.००, १.३०, २.००, २.३०, ३.००, ३.३० अशा प्रकारे अर्ध्या तासाने गडचिरोली आगारातून चंद्रपूरसाठी थेट बसफेऱ्या सोडल्या जात आहेत. गडचिरोलीवरून चंद्रपूरसाठी शेवटची विनावाहक थेट बसफेरी ६.३० वाजता सोडली जात आहे. गडचिरोली आगाराच्या या बसफेऱ्यांमुळे चंद्रपूर मार्गावरील लांब पल्ल्याचा प्रवास करणारे प्रवाशी खासगी ट्रॅव्हल्स व काळी-पिवळी टॅक्सींना मिळेनासे झाले आहेत. सदर खासगी वाहनधारक आपल्या वाहनात व्याहाड बुज, व्याहाड खुर्द, सावली व तसेच इतर ठिकाणी उतरणारे प्रवाशी चढवत आहेत.

Web Title: 24 live buses from Gadchiroli start without permission

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.