२४ विद्यार्थ्यांना सुवर्णपदक प्रदान

By admin | Published: February 14, 2017 12:43 AM2017-02-14T00:43:25+5:302017-02-14T00:43:25+5:30

स्थानिक गोंडवाना विद्यापीठाचा चतुर्थ दीक्षांत समारंभ सोमवारी विद्यापीठाच्या परिसरात भव्य शामीयानात पार पडला.

24 students awarded gold medal | २४ विद्यार्थ्यांना सुवर्णपदक प्रदान

२४ विद्यार्थ्यांना सुवर्णपदक प्रदान

Next

विजय भटकर यांचा आशावाद : गोंडवाना विद्यापीठाचा लवकरच नावलौकिक होणार
गडचिरोली : स्थानिक गोंडवाना विद्यापीठाचा चतुर्थ दीक्षांत समारंभ सोमवारी विद्यापीठाच्या परिसरात भव्य शामीयानात पार पडला. याप्रसंगी गडचिरोली जिल्ह्यातील चार व चंद्रपूर जिल्ह्यातील २० अशा एकूण २४ विद्यार्थ्यांना सुवर्णपदक व प्रमाणपत्र प्रदान करून उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
यावेळी प्रमुख अतिथी म्हणून नालंदा विद्यापीठाचे कुलगुरू पद्मभुषण संगणकतज्ज्ञ डॉ. विजय भटकर तर विशेष अतिथी म्हणून मेघालयचे माजी राज्यपाल तथा सेवानिवृत्त सनदी अधिकारी रणजित मुशाहरी उपस्थित होते. अध्यक्षस्थानी गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नामदेव कल्याणकर होते. यावेळी मंचावर विद्यापीठाचे कार्यकारी कुलसचिव दीपक जुनघरे, शिक्षण, विद्या शाखेचे अधिष्ठाता डॉ. राजेश चंदनपाट, विधी शाखेच्या अधिष्ठाता डॉ. अंजली हस्तक, समाज विज्ञान शाखेचे अधिष्ठाता डॉ. नंदाजी सातपुते, वाणिज्य शाखेचे अधिष्ठाता डॉ. जे. एम. सोमानी, विज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. चक्रधर निखाडे, अभियांत्रिकी विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. झेड. जे. खान, गृहविज्ञान विद्याशाखेच्या अधिष्ठाता डॉ. माधुरी नासरे, औषधी निर्माणशास्त्र विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. सतीश कोसलगे तसेच व्यवस्थापन व विद्वत परिषदेचे सदस्य उपस्थित होते.
या दीक्षांत समारंभात गडचिरोली जिल्ह्याच्या शिवाजी महाविद्यालय गडचिरोली येथील संध्या देवराव खेवले यांना एमए इंग्रजी या अभ्यासक्रमात सर्वाधिक गुण प्राप्त केल्याबद्दल श्री शांताराम पोटदुखे सुवर्णपदक व विठोबाजी शेंडे सुवर्णपदक देऊन सन्मानित करण्यात आले. महात्मा गांधी कला, वाणिज्य, विज्ञान महाविद्यालय आरमोरी येथील ज्योती हरीचंद्र झुरे यांना मास्टर आॅफ सायन्स अ‍ॅन्ड जीओलॉजी परीक्षेत विज्ञान शाखेतून सर्वाधिक गुण प्राप्त केल्याबद्दल स्व. डॉ. वैभव वसंत दोंतुलवार स्मृती सुवर्णपदक देऊन सन्मानित करण्यात आले तर किसनराव खोब्रागडे महाविद्यालय आरमोरी येथील प्रियंका मंगलदास वंजारी यांना बॅचलर आॅफ आर्ट परीक्षेत मानसशास्त्र या विषयात सर्वाधिक गुण प्राप्त केल्याबद्दल स्वातंत्र्य संग्राम सैनिक स्व. गणपतराव आर. मोगरे स्मृती सुवर्णपदक देऊन सन्मानित करण्यात आले. तर एसबी कला, वाणिज्य महाविद्यालय अहेरी येथील जनार्धन शंकर पेरगुवार यांना बॅचलर आॅफ आर्ट परीक्षेत आंबेडकर विचारधारा या विषयात सर्वाधिक गुण मिळाल्याबद्दल त्यांना स्व. श्रीमती भूमिका देविदास गणवीर स्मृती सुवर्णपदक देऊन नालंदा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विजय भटकर यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
याप्रसंगी विविध विषयात विद्यापीठातून सर्वाधिक गुण घेणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी नालंदा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विजय भटकर म्हणाले, गडचिरोलीचे गोंडवाना विद्यापीठ हे सध्या प्राथमिक अवस्थेत असले तरी या विद्यापीठाच्या विकासाला मोठी संधी आहे. येत्या काही वर्षात सदर विद्यापीठ महाराष्ट्रासह देशात नावलौकीक करणार असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.
याप्रसंगी अध्यक्षीय भाषणात कुलगुरू डॉ. कल्याणकर म्हणाले, २७ सप्टेंबर २०११ च्या अधिसूचनेनुसार गडचिरोली येथे गोंडवाना विद्यापीठाची निर्मिती चंद्रपूर व गडचिरोली या दोन जिल्ह्यासाठी करण्यात आली. या विद्यापीठाशी २३८ महाविद्यालये संलग्नीत असून जवळपास एक लाख विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. विद्यापीठाने स्थापनेपासूनच श्रेयांकाधारीत सत्र पध्दतीचा अवलंब केला आहे. सदर पध्दतीचा अवलंब २०१६-१७ मध्ये पद्व्युत्तर अभ्यासक्रमासाठी करण्यात आला. शैक्षणिक सत्र २०१७-१८ पासून पदवी अभ्यासक्रमाकरिता निवड आधारीत श्रेयांक पध्दतीचा अवलंब करण्यात येणार आहे. विद्यापीठाला सद्य:स्थितीत २५० एकर जमिनीची आवश्यकता असून खासगी भूमीअधिग्रहणाची प्रक्रिया सुरू आहे. त्यादृष्टीने निधीची गरज आहे. सहा पद्व्युत्तर अभ्यासक्रम सुरू असून यामध्ये गणित, वाणिज्य, समाजशास्त्र, इतिहास, इंग्रजी, एमबीएचा समावेश आहे. विद्यापीठाने पद्व्युत्तर शैक्षणिक विभागात १८ सहायक प्राध्यापकांची पदभरती केली असून या व्यतिरिक्त २२ पद्व्युत्तर शैक्षणिक विभागाचे प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात आले आहेत. शैक्षणिक सत्र २०१६-१७ मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद येथे इंद्रधनुष्य २०१६ या सांस्कृतिक युवा महोत्सवात ‘शोभायात्रा’ या कलाप्रकारात गोंडवाना विद्यापीठाच्या संघाने प्रथम पारितोषीक प्राप्त केले आहे, असेही डॉ. कल्याणकर यांनी यावेळी सांगितले. विद्यापीठाचा भावी शैक्षणिक परिसर उभारणीच्या दृष्टीने आराखडा तयार करण्याकरिता ४ व ५ मार्च २०१७ रोजी चंद्रपूर येथे व्हीजन कान्फरन्सचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञ, लोकप्रतिनिधी, व्यवस्थापनाचे प्रतिनिधी, संशोधक आदी सहभाग नोंदविणार आहेत, असे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे संचालन प्रा. डॉ. नरेंद्र आरेकर, प्रा. शिल्पा आठवले यांनी केले. या कार्यक्रमाला माजी कुलगुरू डॉ. विजय आर्इंचवार, डॉ. कीर्तिवर्धन दीक्षित यांच्यासह चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यातील शिक्षण संस्थाचालक, प्राचार्य, प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. (स्थानिक प्रतिनिधी)

या आचार्य पदवीधारकांचा गौरव
गोंडवाना विद्यापीठ गडचिरोलीकडे नोंदणी करून सहा विद्यार्थ्यांनी विविध विषयात आचार्य पदवी यंदा प्राप्त केली. सोमवारी आयोजित गोंडवाना विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात विविध विषयात आचार्य पदवी मिळविणाऱ्या सहा गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. यामध्ये जयवंत काशीनाथ शिंपी (शारीरिक शिक्षण), अस्लम याकुब सुरीया (संगणक विज्ञान), प्रदोषचंद्र पटनाईक (संगणक विज्ञान), विपीन कमलनारायण जैस्वाल (गणित), योगेश वामनराव थेरे (सुक्ष्मजीवशास्त्र), गणेश मधुकर जामनकर (भौतिकशास्त्र) व जावेद अहमद वाणी (भौतिकशास्त्र) यांचा समावेश आहे. आणखी अनेक विद्यार्थ्यांनी आचार्य पदवीसाठी गोंडवाना विद्यापीठाकडे यावर्षी नोंदणी केली असल्याची माहिती विद्यापीठाच्या प्रशासकीय सूत्रांकडून मिळाली आहे.

Web Title: 24 students awarded gold medal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.