नागपूर प्रवासासाठी २४० रूपये तिकीट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 5, 2018 12:19 AM2018-11-05T00:19:56+5:302018-11-05T00:20:36+5:30
दिवाळीतील गर्दीच्या हंगामाचा आर्थिक लाभ उठविण्यासाठी एसटी महामंडळाने १ ते १६ नोव्हेंबर या कालावधीत सुमारे १० टक्के वाढ केली आहे. त्यामुळे या कालावधीत नागपूरसाठी प्रवाशांना सुमारे २४० रूपये मोजावे लागणार आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : दिवाळीतील गर्दीच्या हंगामाचा आर्थिक लाभ उठविण्यासाठी एसटी महामंडळाने १ ते १६ नोव्हेंबर या कालावधीत सुमारे १० टक्के वाढ केली आहे. त्यामुळे या कालावधीत नागपूरसाठी प्रवाशांना सुमारे २४० रूपये मोजावे लागणार आहेत. नागपूरची नियमित तिकीट २१५ रूपये आहे.
दिवाळीसाठी प्रत्येक व्यक्ती आपल्या गावाकडे जाण्याचा प्रयत्न करतो. लक्ष्मी पूजनानंतर भाऊबिज सुरू होते. भाऊबिजेनिमित्त पुन्हा जवळपास आठ दिवस बसमध्ये गर्दी राहते. या गर्दीच्या हंगामाचा लाभ उचलण्यासाठी मागील काही वर्षांपासून ऐन दिवाळीच्या हंगामात भाडेवाढ करण्याचा निर्णय एसटी महामंडळाकडून घेतला जात आहे. मागील वर्षी काही दिवस वगळून भाडेवाढ होती. यावर्षी मात्र सरसकट १ ते १६ नोव्हेंबरपर्यंत १० टक्के भाडेवाढ लागू केली आहे. या भाडेवाढीच्या माध्यमातून जादा उत्पन्न मिळविण्याचा प्रयत्न एसटी विभागाकडून सुरू आहे. त्याचबरोबर मुख्य मार्गांवर अतिरिक्त बसफेऱ्या सुरू केल्या जाणार आहेत.
गडचिरोली आगारातून प्रामुख्याने नागपूर, देसाईगंज, चंद्रपूर, सिरोंचा, धानोरा व गडचिरोली जिल्ह्याच्या इतर ग्रामीण भागात बसफेºया जातात. नियमित मार्गांवर प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन बसफेºया वाढविल्या जाणार आहेत. गडचिरोली आगारातून यवतमाळ, नागपूरसाठी प्रत्येकी दोन फेºया तर अहेरी तालुक्यातील रेगुंठा व अहेरीसाठी प्रत्येकी एक अतिरिक्त फेरी अशा एकूण सहा फेºया वाढविण्यात आल्या आहेत. प्रवाशांची संख्या लक्षात घेऊन वेळेवर बसफेºया सोडल्या जाणार आहेत.
एसटीसमोर खासगी बससेवेचे आव्हान
गर्दीच्या हंगामाचा फायदा उचलण्यासाठी एसटीने सुमारे १० टक्के भाडेवाढ केली आहे. १०० रूपयांपर्यंतच्या प्रवासाचे तिकीट १० रूपयांनी वाढले आहे. कुटुंबातील चौघे प्रवास करणार असतील तर ४० रूपये अधिकचे मोजावे लागणार आहेत. एसटीला खासगी बससेवेसोबत स्पर्धा करावी लागणार आहे. एसटीने भाडेवाढ केली असली तरी खासगी बसची तिकीट वाढविली जात नाही. खासगी वाहनचालक गर्दीच्या हंगामात नियमित प्रवाशांपेक्षा अधिकचे प्रवाशी भरून उत्पन्न मिळवितात. भाडेवाढ झाल्यामुळे एसटीचा प्रवाशी खासगी वाहनाकडे वळण्याची शक्यता नाकारता येत नाही. असे झाल्यास एसटीने उत्पन्न वाढविण्यासाठी भाडेवाढीचा घेतलेला निर्णय एसटीलाच तोंडघशी पाडण्यास जबाबदार ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही.
दिवसेंदिवस नागरिकांकडे कार व दुचाकी वाहनांची संख्या वाढत चालली आहे. याचा मोठा परिणाम एसटीच्या उत्पन्नावर पडत आहे.