दुर्गम भागातील २४७३ युवक-युवतींना पोलिसांच्या पुढाकाराने मिळाली नोकरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 7, 2022 10:54 AM2022-06-07T10:54:20+5:302022-06-07T11:10:12+5:30
जिल्हा पोलीस दलाने गेल्या तीन वर्षांत २४७३ युवक-युवतींना विविध क्षेत्रांत नोकरी मिळवून देऊन सन्मानाने जगण्याचा मार्ग दाखविला आहे.
मनोज ताजने
गडचिरोली : नक्षलवादाने बरबटलेल्या आणि उद्योगविरहित गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी नवयुवकांसाठी रोजगार ही महत्त्वाची समस्या आहे. या जिल्ह्यात नक्षलवाद फोफावण्याचे मूळही याच समस्येत आहे. यातूनच आतापर्यंत अनेक युवक-युवतींनी अजाणतेपणे नक्षल चळवळीची वाट धरली; पण आता जिल्हा पोलीस दलाने त्यांना नक्षल चळवळीत जाण्यापासून रोखण्यासाठी रोजगाराचे नवीन पर्याय उपलब्ध करून देत त्यांना बाहेरची दुनिया दाखविली. त्यातून गेल्या तीन वर्षांत २४७३ युवक-युवतींना विविध क्षेत्रांत नोकरी मिळवून देऊन सन्मानाने जगण्याचा मार्ग दाखविला आहे.
जिल्हा पोलीस दलाने महाराष्ट्रासह आंध्र प्रदेश, तेलंगणा, गोवा, गुजरात येथील काही कंपन्यांशी बोलणे केले. गडचिरोली जिल्ह्याच्या दुर्गम भागातील युवा वर्गात क्षमता आणि प्रामाणिकपणा आहे. केवळ थोड्या प्रशिक्षणाची गरज होती. विविध शासकीय व सामाजिक संस्थांच्या माध्यमातून पोलिसांनी त्याचीही सोय केली आणि टप्प्याटप्प्याने सुरक्षा रक्षक, नर्सिंग असिस्टंट, हॉस्पिटॅलिटी, ऑटोमोबाईल, इलेक्ट्रीशियन, प्लंम्बिंग, वेल्डिंग, फिल्ड ऑफिसर अशा विविध क्षेत्रांत आणि विविध शहरांमध्ये युवक-युवतींना नोकरी मिळवून दिली. पोलीस उपमहानिरीक्षक संदीप पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांच्या मार्गदर्शनात हे उपक्रम राबविले जात आहेत.
२७३७ जणांना व्यावसायिक प्रशिक्षण
प्रत्येक युवक-युवतीला नोकरी देणे शक्य नसल्याने किमान व्यावसायिक कौशल्य असल्यास स्वयंरोजगार उभारता येईल, या दृष्टीने पोलिसांकडून सातत्याने विविध प्रकारचे प्रशिक्षण दिले जात आहे. त्यात ब्युटीपार्लर, शिवणकाम, फोटोग्राफी, वाहन दुरुस्ती, मत्स्यपालन, कुक्कुटपाल, बदक पालन, शेळी पालन, फास्ट फूड, पापड-लोणचे, पालेभाज्या लागवड, मधमाशी पालन, तसेच पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षणही देण्यात आले. एवढेच नाही, तर बँकांकडून कर्ज मिळवून देण्यासाठी मदत करून स्वयंरोजगार उभारण्याचा मार्गही प्रशस्त केला. आतापर्यंत २७३७ जणांना वेगवेगळे प्रशिक्षण मिळाले आहे.
नक्षल भरतीवर परिणाम
खासगी का असेना, मिळालेल्या नोकरीच्या निमित्ताने प्रथमच जिल्ह्याबाहेर गेलेल्या युवा वर्गाला बाहेरची दुनिया पाहता आली. आपण कुठे आहे आणि दुनिया कुठे आहे, नक्षलवादामुळे आपण किती मागे राहिलो याचीही जाणीव होऊ लागली. याचा परिणाम नक्षल भरतीवर झाला आहे. नक्षल चळवळीत जाण्यासाठी आता कोणीही तयार नाही. त्यामुळे नक्षल्यांनी चळवळीत येण्यासाठी छत्तीसगडमधील लोकांवर लक्ष केंद्रित केले आहे.
एका गावात एका मुलाला नोकरी लागली तर तो संपूर्ण गावकऱ्यांचे मनपरिवर्तन करतो. त्यातून गावकऱ्यांचा प्रशासनाकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलत आहे. त्यांच्यात आपुलकीची भावना निर्माण होत आहे. गावातील इतर युवक-युवतीमध्येही आत्मविश्वास निर्माण होऊन पोलीस हे आपल्या परिवाराचाच भाग आहेत, असेही त्यांना वाटते. आम्हाला हेच अभिप्रेत आहे.
संदीप पाटील, पोलीस उपमहानिरीक्षक, गडचिरोली