रस्त्यांमुळे एसटीचे 25 % शेड्युल्ड रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 9, 2022 10:45 PM2022-10-09T22:45:39+5:302022-10-09T22:46:41+5:30
गडचिराेली-आलापल्ली-सिराेंचा हा जिल्ह्यातील मुख्य मार्ग आहे. आष्टी ते सिराेंचा या मार्गाला शासनाने राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा देण्यात आला आहे. मात्र, मागील अनेक वर्षांपासून या मार्गाची दुरुस्तीच करण्यात आली नाही. मागील वर्षीही या मार्गावर माेठ्या प्रमाणात खड्डे पडले हाेते. मात्र, दुरूस्ती झाली नाही. दरवर्षी खड्ड्यांचा आकार वाढतच चालला असल्याचे दिसून येत आहे. या मार्गांवरून वाहन नेणे कठीण झाले आहे.
लाेकमत न्यूज नेटवर्क
गडचिराेली : जिल्ह्याच्या दक्षिण भागातील रस्त्यांची माेठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. एका खड्ड्यातून वाहन निघताच दुसऱ्या खड्ड्यात पडत आहे. त्यामुळे एसटीची गती मंदावली आहे. तसेच २५ टक्के शेड्युल्ड बंद झाले आहेत. केवळ मानव विकास मिशनच्या बसेस चालविण्यावर जाेर दिला जात आहे.
गडचिराेली-आलापल्ली-सिराेंचा हा जिल्ह्यातील मुख्य मार्ग आहे. आष्टी ते सिराेंचा या मार्गाला शासनाने राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा देण्यात आला आहे. मात्र, मागील अनेक वर्षांपासून या मार्गाची दुरुस्तीच करण्यात आली नाही. मागील वर्षीही या मार्गावर माेठ्या प्रमाणात खड्डे पडले हाेते. मात्र, दुरूस्ती झाली नाही. दरवर्षी खड्ड्यांचा आकार वाढतच चालला असल्याचे दिसून येत आहे. या मार्गांवरून वाहन नेणे कठीण झाले आहे.
एसटी हे प्रवासी वाहन आहे. त्यामुळे सामाजिक जबाबदारी सांभाळत एसटी बसेस चालवाव्या लागत आहेत. मात्र, नाईलाजास्तव काही शेड्युल्ड व फेऱ्या रद्द कराव्या लागत आहे. विद्यार्थ्यांच्या प्रवासासाठी केवळ मानव विकास मिशनच्या बसेस किंवा त्या मार्गावरील फेऱ्या चालविल्या जात आहेत.
दुसऱ्या विभागाच्या बसेस येतच नाहीत
- पूर्वी अहेरी आगारात नागपूर, सावनेर, वर्धा या आगारांच्या बसेस येत हाेत्या. रस्त्यांची दुरवस्था झाली असल्याने संबंधित आगारांनी अहेरीला बसेस पाठविणेच बंद केले आहे.
- अहेरी आगारामार्फत नागपूर, वर्धा या लांब पल्ल्याच्या बसेस चालविल्या जात हाेत्या. मात्र, या बसेस रात्री उशिरा पाेहाेचत असल्याने प्रवासी मिळत नाहीत. परिणामी लांब पल्ल्याच्या फेऱ्या बंद करून केवळ चंद्रपूरपर्यंत बसेस चालविल्या जात आहेत.
सिराेंचा मार्गावर २५ टक्केच फेऱ्या
अहेरी ते सिराेंचा या मार्गाचीही माेठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. या मार्गावर केवळ २५ टक्केच बसेस चालविल्या जात आहेत. त्यातही केवळ विद्यार्थ्यांची ने-आण करण्यासाठीच प्राधान्य दिले जात आहे.
कमाईपेक्षा ताेटाच अधिक
- रस्त्यांची अवस्था अतिशय वाईट असल्याने एसटीचे स्प्रिंग, खिडक्या, दरवाजे, पत्रे तुटण्याचे प्रकार वाढले आहेत. स्टेअरिंग जाम हाेत आहेत.
- सायंकाळी बस आगारात आल्यानंतर तिला दुरूस्त केल्याशिवाय पर्यायच राहिलेला नाही. त्यावर अतिरिक्त खर्च हाेत आहे.
- अतिशय कमी वेगाने बस चालविली जात असल्याने डिझेलचा खर्चसुद्धा वाढला आहे.
बसला उशीर हाेण्यास चालक जबाबदार असताे का?
मानव विकास मिशनच्या बसेस वेळेवर पाेहाेचत नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेत पाेहाेचण्यास उशीर हाेते. तर शाळा सुटल्यावर बस येण्यास उशीर हाेत असल्याने बसस्थानकावरच अंधार पडत आहे. यासाठी बस चालकाला किंवा एसटी प्रशासानाला जबाबदार धरले जात आहे. विद्यार्थी आंदाेलनही करीत आहेत. मात्र, यासाठी चालकच जबाबदार आहे काय हा प्रश्न आहे.
रस्त्याची अवस्था अतिशय वाईट आहे. त्यामुळे एका तासात जेवढे अंतर पूर्वी बस कापत हाेती तेवढे अंतर कापण्यासाठी आता दीड तासाचा कालावधी लागत आहे. त्यामुळे बसला उशीर हाेत आहे.