ट्रॅक्टर उलटल्याने २५ जण जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2018 12:54 AM2018-04-30T00:54:14+5:302018-04-30T00:54:14+5:30

25 people injured in traffic accident | ट्रॅक्टर उलटल्याने २५ जण जखमी

ट्रॅक्टर उलटल्याने २५ जण जखमी

googlenewsNext
ठळक मुद्देरांगीजवळ अपघात : हायड्रॉलिकच्या गीअरवर पडला पाय

लोकमत न्यूज नेटवर्क
रांगी : धावत्या ट्रॅक्टरच्या हायड्रॉलिकच्या गिअरवर पाय बसल्याने ट्रॉली उलटून २५ जण जखमी झाल्याची घटना रांगीपासून १ किमी अंतरावर दुपारी २ वाजताच्या सुमारास घडली.
रांगी येथील श्यामराव ताडाम यांच्या घरी नामकरण विधीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी छत्तीसगड राज्यातील गहानगट्टा येथील नागरिक आले होते. रांगीपासून १ किमी अंतर असताना ट्रॅक्टरवर बसलेल्या एका व्यक्तीचा पाय नकळत हायड्रॉलिकच्या गिअरवर पडला. त्यामुळे ट्रॅक्टरची ट्रॉली धावत असतानाच वर उचलल्या गेली. त्यामुळे काही नागरिक ट्रॅक्टर धावत असतानाच ट्रॉलीमधून खाली पडले. ट्रॅक्टरमध्ये ३५ पेक्षा अधिक नागरिक बसले होते. त्यापैकी २५ जण जखमी झाले. जखमींमध्ये विजया हलामी (३५), गिरजा कुमोटी (४०), शारदा हलामी (३२), लालसू हलामी (४०), रामसू हलामी (४५), मुंगीबाई दुग्गा (५०), सुमित्रा (१२), रसिका नैताम (३०), मनीबाई दुग्गा (४०), सीता नैताम (३५), सुगन हलामी (४२), अजित हलामी (१५), रखमा धुर्वे (४०), मिनकोबाई कल्लो (४७), लालसू हलामी (५०) सर्व रा. रामनगट्टा अशी गंभीर जखमी झालेल्या नागरिकांची नावे आहेत.
रांगी येथील नागरिकांनी अपघातस्थळी धाव घेतली. जखमींना मिळेल त्या वाहनाने रांगी प्राथमिक आरोग्य केंद्रात भरती केले. त्यानंतर गडचिरोली येथून तीन १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिका बोलविण्यात आल्या. जखमींना गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयात भरती केले.
तब्बल एका तासानंतर पोहोचले रांगीचे डॉक्टर
रांगी येथे प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. या आरोग्य केंद्रात दोन वैद्यकीय अधिकारी कार्यरत आहेत. मात्र अपघात घडला त्यावेळी एकही वैद्यकीय अधिकारी दवाखान्यात नव्हता. हातपाय तुटलेले रुग्ण असह्य वेदनांनी तडफडत होते. गावातील नागरिकांनी दोन्ही वैद्यकीय अधिकाऱ्यांना फोन करून बोलविले. त्यावेळी एका तासानंतर डॉ. सयाम हे दवाखान्यात आले. याचा अर्थ ते मुख्यालयी नव्हते. या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी रांगी येथील नागरिकांनी केली आहे.
रांगी येथील दवाखान्यात पिण्यासाठी पाणी नव्हते. पंखे बंद होते. त्यामुळे रुग्णांचे हाल झाले. दवाखान्याची अशी स्थिती असतानाही या रुग्णालयाला डॉ. आनंदीबाई जोशी पुरस्कार मिळाला. सदर पुरस्कार या दवाखान्याला मिळाला कसा, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

Web Title: 25 people injured in traffic accident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Accidentअपघात