११ वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार करणाऱ्यास २५ वर्षांचा कारावास

By संजय तिपाले | Published: December 15, 2023 08:41 PM2023-12-15T20:41:34+5:302023-12-15T20:42:14+5:30

गडचिरोली जिल्हा न्यायालयाचे आदेश : आईच्या मानलेल्या भावाचे घृणास्पद कृत्य.

25 years imprisonment for assaulting 11 year old child | ११ वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार करणाऱ्यास २५ वर्षांचा कारावास

११ वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार करणाऱ्यास २५ वर्षांचा कारावास

संजय तिपाले, गडचिरोली: आईने ज्याला भाऊ मानले त्याने तिच्या ११ वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार केला. सहा वर्षांपूर्वी धानोरा तालुक्यात घडलेल्या या घटेनेने जिल्हा हादरला होता. १५ डिसेंबर रोजी येथील विशेष जिल्हा व सत्र न्या. उत्तम मुधोळकर यांनी आरेापीला दोषी ठरवून २५ वर्षांचा सश्रम कारावास व एक लाखाचा दंड अशी शिक्षा ठोठावली.

अनिल बाजीराव मडावी (वय ४८ वर्षे,रा. मोहली ता.धानोरा) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. १७ जानेवारी २०१८ रोजी धानोरा पोलिस ठाणे हद्दीत ११ वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचाराची घटना उघडकीस आली होती. पीडित ११ वर्षीय मुलीच्या आईचा अनिल मडावी हा मानलेला भाऊ होता. घटनेच्या दिवशी सकाळी पीडित चिमुकलीच्या शाळेत जाऊन अनिल मडावीने तुला आईने घरी बोलावले आहे, असे खोटे सांगून नेण्याचा प्रयत्न केला, पण मुलीने ही बाब शिक्षकास सांगितली. त्यामुळे अनिल मडावी तेथून गुपचूप निघून गेला.

दुपारी दोनवाजता शाळेला सुटी झाल्यानंतर मुलगी गावाजवळच्या तलावावर घरचे कपडे धुण्यासाठी एकटीच गेली. यावेळी अनिल मडावी तिच्या मागावरच होता. त्याने तिला हाक मारुन जवळ बोलावले. अनिल आईचा मानलेला भाऊ असल्याने त्याचे घरी नित्य येणे जाणे होते, त्यामुळे पीडित मुलगी त्याच्याकडे गेली. मात्र, त्याने हात पकडून तिला आडोशाला नेऊन कुकर्म केले. पीडितेच्या आईच्या फिर्यादीवरुन बलात्कार, बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक अधिनियमानुसार गुन्हा नोंदविण्यात आला. २४ जानेवारी २०१८ ला पोलिसांनी अनिल मडावीला अटक केली. उपनिरीक्षक हिम्मतराव सरगर यांनी प्रथम व नंतर पो.नि. विजय पुराणिक यांनी तपास करुन दोषारोपपपत्र दाखल केले.

विशेष न्यायालयात सुनावणी झाली. पीडितेसह फिर्यादी, वैद्यकीय पुरावा, साक्षीदारांचे जबाब, जिल्हा सरकारी वकील अनिल प्रधान यांचा युक्तिवाद ग्राह्य धरुन विशेष जिल्हा व सत्र न्या. उत्तम मुधोळकर यांनी आरोपीस २५ वर्षे सश्रम कारावास व एक लाख रूपये दंडाची शिक्षा ठोठावली. दंडाची रक्कम पीडितेला देण्याचा आदेश पारित केला.

...तर तलवारीने कापून टाकीन

पीडितेने आरडाओरड करण्याचा प्रयत्न केला तेव्हा आरोपी अनिल मडावीने तिला धमकावले. यावेळी पीडितेची आजी शेतावर जात असताना आरोपीने पाहिले. त्यामुळे तो तेथून पळाला. त्यानंतर पीडिता कपडे धुण्यासाठी तलावावर गेली असता त्याने तेथे येऊन ही बाब कोणाला सांगितल्यास तलवारीने कापून टाकीन, अशी धमकी दिली. मात्र, दुपारी पावणे चार वाजता घरी गेल्यावर चिमुकलीने आईला सर्व हकीकत सांगितली. त्यानंतर आईने धानोरा ठाणे गाठून फिर्याद दिली.

Web Title: 25 years imprisonment for assaulting 11 year old child

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.