वीज ग्राहकांकडे अडीच कोटींची थकबाकी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2019 11:20 PM2019-02-21T23:20:03+5:302019-02-21T23:21:50+5:30
वीज वसुलीसाठी महावितरणतर्फे कडक पावले उचलण्यात येत असली तरी काही ग्राहक नियमितपणे वीज पुवरठा करीत नाही. गडचिरोली मंडळांतर्गत येणाऱ्या एकूण १४ हजार ८५९ ग्राहकांकडे सुमारे २ कोटी ३५ लाख रुपयांचे वीज बिल थकले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : वीज वसुलीसाठी महावितरणतर्फे कडक पावले उचलण्यात येत असली तरी काही ग्राहक नियमितपणे वीज पुवरठा करीत नाही. गडचिरोली मंडळांतर्गत येणाऱ्या एकूण १४ हजार ८५९ ग्राहकांकडे सुमारे २ कोटी ३५ लाख रुपयांचे वीज बिल थकले आहे. त्यामुळे आता महावितरणने त्यांच्यावर वीज खंडित करण्याची कारवाई सुरू केली आहे.
थकीत वीज बिलामुळे महावितरणची आर्थिक स्थिती अत्यंत कमकुवत झाली आहे. त्यामुळे वीज बिल वसुलीबाबत महावितरणकडून कडक पावले उचलली जात आहेत. एक महिना जरी वीज बिल थकला तरी संबंधित ग्राहकाचा वीज पुरवठा खंडित केला जातो.
महावितरणतर्फे सप्टेंबर महिन्यापासून राज्यभर केंद्रीकृत बिलिंग प्रणाली सुरू केली आहे. बिलिंगची प्रक्रिया महावितरणच्या सांघिक कार्यालयामार्फत केली जात असल्याने थकबाकीदार ग्राहकांवरही सांघिक कार्यालयाकडून विशेष लक्ष दिले जात आहे. थकबाकीचा वाढता बोजा लक्षात घेता महावितरणला आपला आर्थिक गाडा खेचणे तारेवरची कसरत ठरत आहे. नागपूर परिक्षेत्रांतर्गत एकूण १ लाख ७६ हजार ९७९ ग्राहकांकडे ७० कोटी ३१ लाख रुपये थकले आहेत. त्यापैकी ७ हजार ४ ग्राहकांचा वीज पुरवठा तात्पुरत्या स्वरूपात तर ४ हजार २३६ ग्राहकांचा वीज पुरवठा कायमस्वरूपी खंडित केला जात आहे. गडचिरोली मंडळात एकूण १४ हजार ८५९ ग्राहकांकडे २ कोटी ३५ लाख रुपये थकले आहेत. महावितरणने कारवाई करीत सुमारे ३४४ ग्राहकांचा वीज पुरवठा तात्पुरत्या स्वरूपात ४२९ ग्राहकांचा वीज पुरवठा कायमस्वरूपी खंडित केला आहे.
उन्हाळा सुरू झाल्याने विजेची मागणी वाढणार आहे. त्यामुळे वीज विभागाच्या खर्चातही वाढ होणार आहे. वाढलेला खर्च भरून काढण्यासाठी वसुली होणे आवश्यक आहे. महावितरणने शुन्य थकबाकीचे लक्ष निर्धारीत केले आहे. त्यामुळे थकबाकीदार ग्राहकांवर वीज पुरवठा खंडित करण्याची कारवाई केली जाणार असल्याचे महावितरणच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
उन्हाळ्यात आता वसुली मोहीम तीव्र केली जाणार असल्यामुळे अनेकांचा वीज पुरवठा खंडित होईल.
वीज बिल भरण्यासाठी अनेक पर्याय उपलब्ध
जिल्ह्यातील बहुतांश वीज ग्राहकांचा मोबाईल क्रमांक महावितरणने नोंदणीकृत केला आहे. त्यामुळे वीज बिलाची अद्यावत माहिती ग्राहकांना एसएमएसच्या माध्यमातून उपलब्ध करून दिली जाते. हा एसएमएस वीज भरणा केंद्रावर दाखवून ग्राहकाला त्याच्या बिलाचा भरणा करणे शक्य आहे. एसएमएसच्या आधारे बिल स्विकृतीस नकार देणाऱ्या कर्मचाऱ्याची महावितरण कार्यालयाकडे तक्रार करण्याची मूभा सुध्दा ग्राहकाला दिली आहे. त्याला काही ग्राहकांनी प्रतिसाद दिला आहे. पूर्वी वीज बिल मिळालेच नाही, अशी तक्रार केली जात होती. आता मात्र ही समस्या दूर झाली आहे. तरीही काही नागरिक मुद्दाम वीज बिलाचा भरणा वेळेवर भरत नसल्याचे दिसून येते. गो ग्रीनच्या माध्यमातून कागदी बिलाऐवजी ईमेलच्या माध्यमातून वीज बिल स्वीकारण्याचा पर्याय ग्राहकाला देण्यात आला आहे. यावर ग्राहकाला वीज बिलात १० रुपयांची सवलतही दिली जात आहे. एसएमएस मिळताच वीज बिलाचा भरणा केल्यास ग्राहकाला वीज बिलात सवलतही दिली जाते.