२५ हजारांवर दमा रूग्णांनी घेतले औषध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2019 12:10 AM2019-06-09T00:10:32+5:302019-06-09T00:11:27+5:30
देसाईगंज तालुक्यातील कोकडी येथे मृग नक्षत्राच्या पहिल्या दिवशी शनिवारी दमा रोगावरचे औषध वितरित करण्यात आले. सदर औषध घेण्यासाठी देशभरातून २५ हजार पेक्षा अधिक रूग्ण कोकडीत दाखल झाले. सायंकाळी ६ वाजेपासून औषधी वितरणाला सुरूवात झाली.
लोकमत न्यूज नेटवर्क
विसोरा/तुळशी : देसाईगंज तालुक्यातील कोकडी येथे मृग नक्षत्राच्या पहिल्या दिवशी शनिवारी दमा रोगावरचे औषध वितरित करण्यात आले. सदर औषध घेण्यासाठी देशभरातून २५ हजार पेक्षा अधिक रूग्ण कोकडीत दाखल झाले. सायंकाळी ६ वाजेपासून औषधी वितरणाला सुरूवात झाली. औषधी घेण्यासाठी दमा रूग्णांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. दमा रूग्णांनी कोकडी गाव फुलून गेले होते.
प्रदुषणामुळे दिवसेंदिवस दमा रूग्णांची संख्या वाढत चालली आहे. डॉक्टरांकडे हजारो रुपये खर्च करूनही दमा रोग कधीकधी बरा होत नाही. दमा रोगावर कोकडी येथील प्रल्हाद कावळे मोफत औषधी वितरित करतात. सदर औषधी केवळ मृग नक्षत्राच्या पहिल्याच दिवशी वितरित केली जाते. अनेकांना या औषधीचा लाभ झाला असल्याने दिवसेंदिवस दमा रूग्णांवर औषध घेण्यासाठी कोकडी येथे येणाऱ्या रूग्णांची संख्या वाढत चालली आहे. ८ जून रोजी दमा औषधीचे वितरण केले जाणार असल्याने पहिल्याच दिवशी छत्तीसगड, तेलंगणा व महाराष्टÑातील नागरिक कोकडी येथे डेरेदाखल झाले. शनिवारी सायंकाळी ६ वाजेपासून औषधीच्या वितरणाला सुरूवात झाली. आपल्याला औषधी लवकर मिळावी, यासाठी नागरिक दुपारपासूनच रांगेत लागले होते. जवळपास अर्ध्या किमी अंतराच्या मोठमोठ्या रांगा लागल्या होत्या. दमा रूग्णांनी कोकडी गाव फुलून गेले होते. रात्री पुन्हा कोकडी येथे दमा रूग्णांची गर्दी होण्यास सुरूवात झाली. दमा औषधीचे वितरण करण्यास संपूर्ण गावाने मदत केली.
औषधी वितरणाच्या शुभारंभाप्रसंगी आमदार कृष्णा जि.प. अध्यक्ष योगीता भांडेकर, आ.कृष्णा गजबे, माजी आ. हरीराम वरखडे, भाग्यवान खोब्रागडे, जि.प. सदस्य रमाकांत ठेंगरी, रोशन पारधी, पं.स. उपाध्यक्ष गोपाल उईके, न.पं. उपाध्यक्ष मोतीलाल कुकरेजा, अर्चना ढोरे, सुधीर वाढई, परसराम टिकले, दिगांबर मेश्राम, डॉ. नामदेव किरसान, राजू जेठाणी, नरेश विठ्ठलानी, मन्साराम बुध्दे, पोलीस पाटील कापगते, बन्सोड उपस्थित होते. यावेळी प्रल्हाद कावळे यांचा सपत्निक सत्कार झाला.