२६९ गावांना धान्य पुरवठा
By admin | Published: June 6, 2017 12:53 AM2017-06-06T00:53:24+5:302017-06-06T00:53:24+5:30
जिल्ह्याच्या दुर्गम गावात रस्ते व पुलांचा अभाव असल्याने पावसाळ्यात चार महिने या गावांचा संपर्क तुटतो.
पुरवठा विभागाचे नियोजन : पावसाळ्यात चार महिन्यांसाठी सोय
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : जिल्ह्याच्या दुर्गम गावात रस्ते व पुलांचा अभाव असल्याने पावसाळ्यात चार महिने या गावांचा संपर्क तुटतो. या गावात अन्नधान्याचा पुरवठा करण्यासाठी शासनाने सुरुवात केली असून पावसाळ्यातील चार महिन्याचा धान्यसाठा पोहोचविला जात आहे.
२०१७-२०१८ करिता नवसंजीवन योजनेत येत असलेल्या जिल्ह्यातील धानोरा, मुलचेरा, अहेरी, एटापल्ली, भामरागड व सिरोंचा या सहा तालुक्यातील पावसाळ्यात संपर्क तुटणाऱ्या २६९ गावांना १४३ रास्तभाव दुकानामार्फत जून ते सप्टेंबर २०१७ या चार महिन्यांचे अन्नधान्य शिधापत्रिकाधारकांना अन्नधान्य पुरवठा करण्यात येणार आहे. जून २०१७ च्या वितरणाकरिता राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम २०१३ अंतर्गत अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटूंबातील पात्र लाभार्थ्यांना तांदूळ व गव्हाचे नियतन मंजूर करण्यात आले आहे. तसेच सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत जिल्ह्यातील पिवळ्या शिधापत्रिकाधारकांना (केवळ बीपीएल व अंत्योदय) जून २०१७ करिता साखरेचे मासिक नियतन मंजूर करण्यात आलेले आहे.
नव संजीवन योजना लागू असलेले तालुके वगळता गडचिरोली, चामोर्शी, आरमोरी, देसाईगंज, कुरखेडा व कोरची या तालुक्यांना तसेच नव संजीवन योजना लागू असलेल्या धानोरा, मुलचेरा, अहेरी, एटापल्ली, सिरोंचा व भामरागड या तालुक्यातील नव संजीवन योजना लागू नसलेल्या गावामधील (२६९ गावे) प्राधान्य कुटुंब लाभार्थी, अंत्योदय अन्न योजनेचे लाभार्थी व पिवळ्या शिधापत्रिकाधारकांना (लाभार्थ्यांना) गोदामातील उपलब्धतेनुसार जून २०१७ करिता प्राधान्य कुटुंब लाभार्थी, अंत्योदय अन्न योजनेचे लाभार्थी व पिवळ्या शिधापत्रिकांना वाटप परिमाण निर्धारित करण्यात येत आहे. त्याप्रमाणे अन्नधान्य व साखरेचे वितरण शिधापत्रिकाधारकांना करण्यात यावे, असे जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी आवाहन केले आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीलाच प्रशानाच्या वतीने हालचाली सुरू करण्यात आले आहेत.
दुर्गम गावात दैनंदिन गरजेच्या वस्तूंचीही साठवणूक
दुर्गम गावात रस्ते व पुलाचा अभाव असल्याने पावसाळ्यात दळणवळणाच्या सोयी उपलब्ध नसतात. जवळपास चार महिने संपर्क तुटलेला असतो. त्यामुळे या भागातील नागरिक पावसाळ्याच्या सुरुवातीलाच दैनंदिन गरजेच्या वस्तूंची साठवणूक करतात. तालुका अथवा केंद्रातील गावातून चार महिने पुरेल एवढी वस्तू खरेदी करतात.