जिल्ह्यात अतिवृष्टीने ६९ लाखांचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2018 01:13 AM2018-09-08T01:13:53+5:302018-09-08T01:15:12+5:30
यावर्षीच्या पावसाळ्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे सुमारे ६९ लाख रूपयांच्या संपत्तीचे नुकसान झाले आहे. यामध्ये १० नागरिकांना जीव सुध्दा गमवावा लागला आहे. हवामान खात्याचा अंदाज खरा ठरवत यावर्षी पावसाने सरासरी गाठली.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : यावर्षीच्या पावसाळ्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे सुमारे ६९ लाख रूपयांच्या संपत्तीचे नुकसान झाले आहे. यामध्ये १० नागरिकांना जीव सुध्दा गमवावा लागला आहे.
हवामान खात्याचा अंदाज खरा ठरवत यावर्षी पावसाने सरासरी गाठली. अगदी सुरूवातीपासून सातत्याने पाऊस कोसळत आहे. अधूनमधून अतिवृष्टीसुध्दा होत आहे. अतिवृष्टीमुळे अनेकदा पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे सखल भागात वास्तव्यास असलेल्या गावांना या पुराचा फटका बसला आहे. यावर्षी विशेष करून दक्षिणेकडील अहेरी, भामरागड व मुलचेरा, सिरोंचा या तालुक्यांना सर्वाधिक झळ सहन करावी त्यातही अहेरी तालुक्यात सर्वाधिक नुकसान झाले. अतिवृष्टीमुळे १० नागरिकांचा मृत्यू झाला. प्रत्येक व्यक्तीला शासनाकडून चार लाख रूपयांची मदत दिली जाते. ८२ लहान जनावरे मृत्यूमुखी पडले. यामुळे २ लाख ५८ हजारांची नुकसान झाले. मोठी १६५ जनावरे मृत्यूमुखी पडली. यामुळे २० लाख ७१ हजारांचे नुकसान झाले. १ हजार ८९ शेळ्या मरण पावल्या. १ हजार ५९३ घरांचे अंशत: नुकसान झाले. यामुळे ४० लाख रूपयांचे नुकसान झाले. तर ५५ घरे पूर्णपणे कोसळली आहेत. यामुळे ५ लाख २० हजारांचे नुकसान झाले. गुरांचे ६७ गोठे कोसळले. यामुळे ८१ हजार २०० रूपयांचे नुकसान झाले.
पावसाळ्याच्या सुरूवातीपासून यावर्षी पाऊस कोसळत आहे. एक-दोन दिवसानंतर पाऊस कोसळत आहे. संततधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. मध्यंतरी आठ दिवस पावसाने उसंत घेतली होती. त्यानंतर आता गुरूवारपासून पुन्हा पावसाला सुरूवात झाली आहे. सध्याचे वातावरण लक्षात घेतले तर पाऊस आणखी काही दिवस थांबण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
संततधार पावसाने जनजीवन विकस्ळीत
मागील दोन दिवसांपासून जिल्हाभरात संततधार पाऊस पडत आहे. यामुळे ग्रामीण भागासह शहरी भागातीलही जनजीवन विस्कळीत झाले आहे. सततच्या पावसामुळे गडचिरोली शहरातील बाजारपेठ शुकशुकाट दिसून येत होता. शासकीय कार्यालयांमध्येही नागरिक येत नसल्याने कर्मचारी आपल्या मर्जीने खुर्च्या लाऊन बसल्याचे चित्र दिसून येत होते. यावर्षीच्या पावसाने धानपीक डोलत आहे. मात्र कापूस, सोयाबिन, तूर या पिकांना पावसाचा फटका बसला आहे. या पिकांना पाण्याची कमी गरज राहते. मात्र सातत्याने पडणाऱ्या पावसामुळे जमीन ओलिचिंब आहे. परिणामी या पिकांची वाढ खुंटली आहे. पावसाचा जोर असाच सुरू राहिल्यास सोयाबिन, कापसाच्या उत्पादनात कमालीची घट येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत येण्याची शक्यता आहे.