वर्षभरात २७ प्रसूत मातांचा मृत्यू

By Admin | Published: July 10, 2017 12:31 AM2017-07-10T00:31:57+5:302017-07-10T00:31:57+5:30

राज्य शासनाचा आरोग्य विभाग माता व बालमृत्यूचे प्रमाण रोखण्यासाठी प्रशासन स्तरावरून विविध उपाययोजना करीत असला तरी...

27 birth mothers die in the year | वर्षभरात २७ प्रसूत मातांचा मृत्यू

वर्षभरात २७ प्रसूत मातांचा मृत्यू

googlenewsNext

मातृ सुरक्षा दिन : १५ हजार ५४९ मातांची संस्थात्मक प्रसुती
गोपाल लाजुरकर । लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : राज्य शासनाचा आरोग्य विभाग माता व बालमृत्यूचे प्रमाण रोखण्यासाठी प्रशासन स्तरावरून विविध उपाययोजना करीत असला तरी दळणवळणाचा अभाव, योग्यवेळी औषधोपचार न मिळणे यासह विविध कारणांमुळे एप्रिल २०१६ ते मार्च २०१७ या एक वर्षाच्या कालावधीत जिल्ह्यात अतिजोखीमीच्या २७ मातांचा प्रसूतीदरम्यान मृत्यू झाला. एका वर्षात जिल्ह्यात १५ हजार ५४९ मातांची संस्थात्मक तर १ हजार ४५४ मातांची घरी प्रसुती झाली.
एका वर्षाच्या कालावधीत जिल्ह्यात संस्थात्मक प्रसुतीचे प्रमाण ९२ टक्के आहे. हे प्रमाण मागील काही वर्षाच्या तुलनेत समाधानकारक आहे. तर घरी प्रसूती होण्याचे प्रमाण आठ टक्के आहे. आरोग्य विभागाच्या जनजागृतीमुळे व शासनाच्या आरोग्यविषयक सेवांमुळे संस्थात्मक प्रसूतीत वाढ झालेली आहे. आरोग्य विभागामार्फत वर्षभर संस्थात्मक प्रसूतीकरिता महिलांमध्ये विशेषत: गरोदर मातांमध्ये जनजागृती केली जाते. जिल्हा रूग्णालयासह ग्रामीण रूग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र, आरेग्य पथक, आरोग्य उपकेंद्रांमध्ये गरोदर मातांची तपासणी केली जाते. या तपासणीदरम्यान त्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले जाते. गरोदर मातांच्या रक्तातील हिमोग्लोबीनचे प्रमाण योग्य व समतोल राहावे, यासाठी आरोग्य विभागामार्फत औषधोपचार नियमित केला जातो. परंतु जिल्ह्याचा बराचसा भाग दुर्गम व अतिदुर्गम असल्याने प्रसूती काळात गरोदर मातांना आरोग्य केंद्र, उपकेंद्र अथवा तालुका व जिल्हास्थळावरील रूग्णालयात वेळीच पोहोचविले जात नाही. गंभीर स्थिती झाल्यानंतर रूग्णालयात दाखल केले जाते. अशावेळी गरोदर माता प्रसूतीदरम्यान दगावतात. जिल्ह्यात मागील एका वर्षात २७ मातांचा प्रसूतीदरम्यान मृत्यू झाला. वर्षभरात ९२ टक्के संस्थात्मक प्रसूती झाली तर आठ टक्के प्रसूती घरी झाली. १५ हजार ५४९ मातांची संस्थात्मक तर १ हजार ४५४ मातांची घरी प्रसूती झाली. प्रसूतीदरम्यान मातांचा मृत्यू रोखण्यासाठी आरोग्य विभागातर्फे दुर्गम भागात विशेष व्यवस्था करण्यात येणार आहे.

संभाव्य प्रसूत मातांसाठी
मायक्रो बर्थ प्लॉन
जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागामार्फत संस्थात्मक प्रसूतीसाठी विशेष प्रयत्न केले जात असताना मातामृत्यू टाळण्यासाठी मायक्रो बर्थ प्लॉन सुरू करण्यात आलेला आहे. या अंतर्गत जिल्ह्यातील प्रत्येक गावातील गरोदर महिलेची प्रसूतीचा अवधी विशेष म्हणजे, प्रसूतीची तारीख आरोग्य उपकेंद्र, पथक व प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत जिल्ह्याच्या आरोग्य विभागाला कळविली जाते. त्यामुळे दररोज किती महिलांची प्रसूती होणार आहे, याबाबत माहिती आरोग्य विभागाला यंत्रणेमार्फत आपोआप कळत असते. संभाव्य प्रसूत महिलेची प्रसूतीची तारीख कळल्यानंतर आरोग्य विभाग सदर महिलेबाबत संवेदनशील असते. मायक्रो बर्थ प्लॉन अंतर्गत दर दिवशी प्रसूत महिलांची संख्या माहित होण्यास मदत होते.

संस्थात्मक प्रसुतीवर भर द्या - भंडारी
संस्थात्मक प्रसुतीचे अनेक फायदे आहेत. संस्थात्मक प्रसुतीत माता दगावण्याचा धोका राहत नाही. आरोग्य विभागामार्फत मातांना मोफत वाहतूक सेवा, औषधी, जेवण, रक्त तपासणी आदी सुविधा दिल्या जातात. बीपीएल महिलांसाठी चार हजार रूपये बुडीत मजुरी, जननी सुरक्षा योजनेंतर्गत ७०० रूपये दिले जातात. गरोदर महिलांनी योग्य आहार घ्यावा, गोळ्यांचे नियमित सेवन करावे, अती कष्टाची कामे करू नये व सुरक्षित प्रसूतीसाठी संस्थात्मक प्रसूतीवर भर द्यावा, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कमलेश भंडारी यांनी केले आहे.

प्रसुतीदरम्यान माता दगावण्याची कारणे
अतिजोखीमीच्या मातांना वेळेवर प्रसूतीसाठी संस्थांमध्ये न पाहोचविणे, दळणवळणाच्या साधनांचा अभाव असणे, रक्तामधील हिमोग्लोबीनचे अत्यल्प प्रमाण, आयर्न व फॉलिक अ‍ॅसिडच्या गोळ्यांचे सेवन न करणे, पारंपरिक पध्दतीने प्रसूती करण्यावर भर देणे यासह विविध कारणांमुळे प्रसुतीदरम्यान मातांचा मृत्यू होतो.

Web Title: 27 birth mothers die in the year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.