२७७ घरांची पडझड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2018 10:21 PM2018-07-23T22:21:29+5:302018-07-23T22:21:48+5:30
पावसाळ्याच्या सुरूवातीपासून २२ जुलैपर्यंत अतिवृष्टीमुळे जिल्हाभरातील २६६ घरांची अंशत: पडझड तर १० घरे पूर्णपणे कोसळली आहेत. २६ जनावरांचा मृत्यू झाला.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : पावसाळ्याच्या सुरूवातीपासून २२ जुलैपर्यंत अतिवृष्टीमुळे जिल्हाभरातील २६६ घरांची अंशत: पडझड तर १० घरे पूर्णपणे कोसळली आहेत. २६ जनावरांचा मृत्यू झाला.
यावर्षी समाधानकारक पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला होता. हा अंदाज खरा ठरत यावर्षी पावसाळ्याच्या अगदी सुरूवातीपासून पावसाचा जोर सुरू आहे. अधूनमधून अतिवृष्टीही होत आहे. त्याचबरोबर धरणांचे पाणी सोडल्यानंतर नद्यांची पातळी वाढून पूर परिस्थिती निर्माण होते. याचा फटका नदी जवळच्या गावांना बसला. मागील २० दिवसांपासून जिल्हाभरात संततधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे घरांची पडझड होण्याचे प्रमाण वाढले आहे. गडचिरोली जिल्ह्यातील बहुतांश घरे कौलारू व मातीचे आहेत. यातील काही घरे जुनी असल्याने त्यांचे छत गळते. सातत्याने पाऊस सुरू असल्याने मातीच्या भिंतींमध्ये ओलावा निर्माण होते व काही दिवसानंतर भिंत कोसळते. पावसाळ्यापासून २२ जुलैपर्यंत सुमारे २७७ घरांची पडझड झाली आहे. पडझड झालेल्या घरांमध्ये सहा गोठे व तीन झोपड्यांचा समावेश आहे. महसूल विभागाने संबंधित घरांचे पंचनामे केले आहेत. ऐन पावसाळ्यात घर कोसळल्याने संबंधित कुटुंबासमोर निवाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. ठिकठिकाणी विजेचा धक्का, वीज पडणे यासारख्या घटनांमध्ये २६ जनावरांचा मृत्यू झाला आहे.
अनेक शेतकºयांनी धान पिकाची रोवणी करण्यासाठी पैसे गोळा करून ठेवले. सदर पैसे घराच्या डागडुजीवर खर्च करावे लागत आहेत. ज्या शेतकºयांचे बैल मरण पावले. अशा शेतकºयांना वेळेवर २५ ते ३० हजार रूपये खर्चून बैल खरेदी करावे लागणार आहेत. अन्यथा शेती धोक्यात येण्याची शक्यता आहे.
मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी जास्त पाऊस पडत आहे. पावणे दोन महिन्यांच्या कालावधीत वार्षिक सरासरीच्या अर्धा पाऊस पडला आहे. आॅगस्ट महिन्यात सर्वाधिक पाऊस पडतो. त्यामुळे यावर्षी वार्षिक सरासरीच्या अधिक पाऊस होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे आणखी घर कोसळण्याच्या, वीज पडण्याच्या घटन घडून जीवित व वित्तहानी होण्याचा अंदाज वर्तविला जात आहे.
कोसरीत घर पडले
आरमोरी तालुक्यातील देलनवाडी ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या कोसरी येथील निरींगशहा जग्गू किरंगे यांचे मातीचे घर संततधार पावसामुळे रविवारी पहाटे ४ वाजताच्या सुमारास कोसळले. यात सुदैवाने जीवितहानी झाली नाही. घरातील सर्व वस्तूंची नासाडी झाली.