२८ नागरिकांना ठोठावला दंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2020 05:00 AM2020-07-25T05:00:00+5:302020-07-25T05:00:46+5:30
सध्या देशभर हाहाकार माजवणाऱ्या कोरोनाचा संसर्ग थुंकीच्या माध्यमातून होत असल्याचे निष्पन्न झाले आहे. तसेच धुम्रपानामुळे कर्करोग, क्षयरोग, न्युमोनिया, श्वसनाचे विविध आजार होतात. देशभर कोरोनाचा संसर्ग वाढत चालला असून गडचिरोली जिल्ह्यातही पॉझिटीव्ह रुग्णसंख्या वाढतच आहे. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार, लॉकडाऊन व सुगंधित तंबाखूचा खर्रा व तंबाखूजन्य पदार्थ खाण्यावर कडक प्रतिबंध लावले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
धानोरा : खर्रा खाऊन सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्या व मास्क न घालता फिरणाºया २८ नागरिकांवर २४ जुलै रोजी धानोरा शहरात दंडात्मक कारवाई करून त्यांच्याकडून ३ हजार ७०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
सार्वजनिक ठिकाणी धुम्रपानावर व थुंकणाऱ्यावर कायद्याने प्रतिबंध असला तरी व त्या माध्यमातून वेळोवेळी दंडात्मक कारवाई होत असली तरीही धुम्रपान करणाऱ्यांचे प्रमाण कमी होताना दिसत नाही. खर्रा खाऊन थुंकण्यामुळे सार्वजनिक मालमत्ता विदृप होऊन वेळोवेळी रंगरंगोटी करावी लागते. त्यामुळे जनतेने कररूपात दिलेला पैसा विनाकारण खर्च होतो. याशिवाय नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण होतो.
सध्या देशभर हाहाकार माजवणाऱ्या कोरोनाचा संसर्ग थुंकीच्या माध्यमातून होत असल्याचे निष्पन्न झाले आहे. तसेच धुम्रपानामुळे कर्करोग, क्षयरोग, न्युमोनिया, श्वसनाचे विविध आजार होतात. देशभर कोरोनाचा संसर्ग वाढत चालला असून गडचिरोली जिल्ह्यातही पॉझिटीव्ह रुग्णसंख्या वाढतच आहे. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार, लॉकडाऊन व सुगंधित तंबाखूचा खर्रा व तंबाखूजन्य पदार्थ खाण्यावर कडक प्रतिबंध लावले आहेत. तरी सुद्धा धानोरा शहरातील अनेक नागरिक सर्रास खर्रा खाऊन सार्वजनिक ठिकाणी थुंकत होते. अनेक नागरिक मास्क न घालता सार्वजनिक ठिकाणी फिरताना दिसत होते.
याबाबीची दखल घेऊन नगर पंचायत, पोलीस स्टेशन व मुक्तीपथच्या संयुक्त विद्यमाने धानोरा शहरात फिरून दुकानाची तपासणी केली व तंबाखूजन्य पदार्थाची विक्री करू नये याविषयी समज दिली. तसेच विना मास्क फिरणाऱ्या व खर्रा खाऊन थुंकणाऱ्या एकूण २८ नागरिकांवर दंडात्मक कारवाई करून त्यांचेकडून ३ हजार ७०० रुपये दंड वसूल करण्यात आला.
ही कारवाई नगर पंचायत मुख्याधिकारी नरेंद्र बेंबरे यांच्या नेतृत्त्वात करण्यात आली. यावेळी पोलीस उपनिरीक्षक सतीश रेड्डी, मुक्तीपथ गडचिरोलीचे उपसंचालक संतोष सावळकर, मुक्तीपथ धानोरा तालुका प्रभारी अक्षय पेद्दीवार, नगर पंचायत कर्मचारी गुलाब ठाकरे, उमेश नागपुरे व इतर कर्मचारी उपस्थित होते.
गडचिरोली पालिकेला कारवाई मुहूर्त सापडेना
विनामास्क फिरणाऱ्या व खर्रा, तंबाखूजन्य पदार्थ खाऊन सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्या नागरिकांची गडचिरोली शहरात प्रचंड संख्या आहे. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर गडचिरोली पालिकेने कारवाई करण्याची गरज आहे. मात्र न.प.ला कारवाईसाठी मुहूर्त अजूनही सापडला नाही.