२८ मुस्लीम जोडप्यांचा सामूहिक निकाह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2017 12:03 AM2017-12-28T00:03:32+5:302017-12-28T00:03:44+5:30
तमाम मुस्लीम जमाअत देसाईगंजच्या वतीने दरवर्षी प्रमाणे यंदाही स्थानिक मदिना मशिदीच्या प्रांगणात मुस्लीम समाजातील उपवर-वधूंच्या सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
देसाईगंज : तमाम मुस्लीम जमाअत देसाईगंजच्या वतीने दरवर्षी प्रमाणे यंदाही स्थानिक मदिना मशिदीच्या प्रांगणात मुस्लीम समाजातील उपवर-वधूंच्या सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. या सोहळ्यात मुस्लीम समाजातील एकूण २८ जोडपी विवाहबद्ध झाली.
सदर विवाहसोहळ्याप्रसंगी कमेटीचे नाजीमे आला हाजी बशीर अहमद सौदागर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. तसेच बाहेर जिल्ह्यातून आलेल्या सर्व मान्यवर व मुस्लीम बांधवांचे स्वागत केले.
मागील वर्षापर्यंत देसाईगंज येथील मुस्लिम समाजाच्या वतीने एकुण १७५ जोडपी विवाहबद्ध करण्यात आली असून या विवाह सोहळ्यात गडचिरोली जिल्ह्यातील तसेच लगतच्या एकूण १९ तालुक्यांचा सहभाग असायचा. मात्र यावर्षी यात वाढ होऊन सावली, मूल, चिमुर, भिवापूर, लाखनी, सडक अर्जुनी, देवरी या तालुक्यातील वधु-वरांनी सहभाग नोंदविल्यामुळे एकूण २६ तालुक्यांची नोंद झाली. मुस्लिम बांधवांनी या विवाह सोहळ्यात सहभाग घेऊन सोहळा यशस्वी करण्यात मोलाचे योगदान मिळत आहे. सामूहिक विवाह सोहळ्यामुळे वेळ व पैशाची बचत होत असते.
मुस्लिम समाजातील सामुहिक विवाह सोहळा इतर समाजासाठी प्रेरणादायी ठरत आहे. त्यामुळे येथील सामूहिक विवाह सोहळ्याची विदर्भस्तरावर दखल घेण्यात आली आहे. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी देसाईगंज शहरातील सर्व मुस्लिम बांधव एकत्र येऊन सहकार्य करीत असल्याने सदर कार्यक्रम चांगल्या पद्धतीने यशस्वी होत आहे.
बुधवारी पार पडलेल्या मुस्लिम समाजाच्या या विवाह सोहळ्याच्याय शस्वीतेसाठी अ. सलाम शेख, खलिल खॉ, निसार अहेमद, अ. मजीद खॉ, नवेद खॉ, मकसुद खॉ, बबलुभाई कबाडी, सय्यद आबीद अली, राजीक खॉ, कैसर जमाल, उमेद अली, उमरभाई, जावेद कुरेशी, साकिब शेख, जावेद खॉ आदींनी सहकार्य केले. सदर विवाह सोहळ्याला वधू-वरांचे नातेवाईक, मित्रमंडळी व समाजबांधव उपस्थित होते.
सात वर्षात २०४ जोडपी अडकली लग्नाच्या बेडीत
तमाम मुस्लिम जमाअत देसाईगंजच्या वतीने गेल्या सात वर्षांपासून देसाईगंज शहरात मुस्लिम समाजातील उपवर-वधूंचा सामूहिक विवाह सोहळ्याचा उपक्रम घेतल्या जात आहे. या उपक्रमासाठी देसाईगंज शहरातील मुस्लिम समाजातील पदाधिकारी व बांधवांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. सन २०११ ते २०१७ या सात वर्षांच्या कालावधीत सामूहिक विवाह सोहळ्याच्या माध्यमातून मुस्लिम समाजातील एकूण २०४ जोडपी लग्नाच्या बेडीत अडकली. सामूहिक विवाह सोहळ्यात सन २०११ मध्ये ११, २०१२ मध्ये २३, २०१३ मध्ये ३३, २०१४ मध्ये २९, २०१५ मध्ये ३९, २०१६ मध्ये ४० व यंदा २०१७ मध्ये २८ जोडपी विवाहबद्ध झाले. यामध्ये पूर्व विदर्भातील जोडप्यांचा समावेश आहे.