बालिका विद्यालयातील २८ विद्यार्थिनी आजारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 3, 2018 01:18 AM2018-10-03T01:18:35+5:302018-10-03T01:19:03+5:30
कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयातील सुमारे २८ विद्यार्थिनी आजारी असल्याचे निदर्शनास आले आहे. चार मुलींची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना १ आॅक्टोबर रोजी रात्री ११ वाजता व पाच विद्यार्थिनींना २ आॅक्टोबर रोजी जिल्हा सामान्य रूग्णालयात हलविण्यात आले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
धानोरा : कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयातील सुमारे २८ विद्यार्थिनी आजारी असल्याचे निदर्शनास आले आहे. चार मुलींची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना १ आॅक्टोबर रोजी रात्री ११ वाजता व पाच विद्यार्थिनींना २ आॅक्टोबर रोजी जिल्हा सामान्य रूग्णालयात हलविण्यात आले आहे. दोन मुली धानोरा येथील ग्रामीण रूग्णालयात भरती आहेत. तर उर्वरित १७ मुलींवर उपचार सुरू आहेत. विशेष म्हणजे, दोन दिवसांपूर्वी येथील विद्यार्थिनी सानिका बांबोळे या विद्यार्थिनीचा मृत्यू झाला होता.
शाळेतील २८ विद्यार्थिनींना टायफाईड, डोकेदुखी, ताप, पोटदुखी, घसा दुखणे, मलेरिया हे आजार झाले असल्याचे आढळले आहे. आश्रमशाळेमध्ये असुविधा असलेल्याचे दिसून येते. एवढ्या मोठ्या प्रमाणात विद्यार्थिनी प्रकृती बिघडल्याने पालक व शिक्षकांमध्ये खळबळ माजली आहे. वसतिगृहाची पाहणी केली असता, वसतिगृहात अस्वच्छता दिसून आली. परिसरातही अस्वच्छता पसरली आहे. पाण्याची टाकी फुटली आहे. शुध्द पाण्याकरिता लावलेला आरओ बंद स्थितीत आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर तहसीलदार महेंद्र गणवीर यांनी १ आॅक्टोबर रोजी रात्री १० वाजता धानोरा येथील ग्रामीण रूग्णालयात जाऊन आजारी विद्यार्थ्यांची विचारपूस केली. आरोग्य कर्मचाऱ्यांनी फवारणी करावी, असे निर्देश दिले. आरोग्य कर्मचाºयांनी विद्यालयात जाऊन ३७ विद्यार्थ्यांच्या रक्ताचे नमुने घेतले आहेत. तसेच पाण्याचेही नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. फवारणी सुध्दा करण्यात आली आहे. आरओ मशीन सुरू होईपर्यंत आरओच्या कॅनद्वारे पाणीपुरवठा केला जाणार आहे. संवर्ग विकास अधिकारी यशवंत भांड, गट शिक्षणाधिकारी सुधीर आखाडे, नगर पंचायतचे मुख्याधिकारी दामोधर भगत यांनी सुध्दा विद्यालयाला भेट देऊन स्थितीची पाहणी केली. या ठिकाणी स्वतंत्र आरोग्य पथक नेमावे, अशी मागणी होत आहे.
मुलींची तब्येत बिघडण्याबाबत डॉ. देवेंद्र सावसाकडे यांना विचारणा केली असता, वातावरण बदल व दुषित पाण्यामुळे असा प्रकार घडू शकतो, अशी माहिती लोकमतशी बोलताना दिली.
कर्मचाऱ्यांचा करार संपला
कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयात शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी असे एकूण १५ कर्मचारी कार्यरत आहेत. त्यापैकी १२ कर्मचाऱ्यांचा ३० सप्टेंबर रोजी करार संपला आहे. करार संपला असला तरी सदर कर्मचारी शाळेमध्ये येत आहेत.