१२९ पदांसाठी २८ हजार अर्ज!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2018 01:29 AM2018-03-07T01:29:35+5:302018-03-07T01:29:35+5:30

नक्षलविरोधी अभियानामुळे सीमेवरील लष्कराप्रमाणे असुरक्षित जीवन असतानाही गडचिरोली पोलीस दलात भरती होण्यासाठी बेरोजगार युवक-युवतींनी झुंबड केली आहे.

28 thousand applications for 12 posts! | १२९ पदांसाठी २८ हजार अर्ज!

१२९ पदांसाठी २८ हजार अर्ज!

googlenewsNext
ठळक मुद्देबेरोजगारीची अशीही तीव्रता : ९ पासून सुरू होणार पोलीस भरती

ऑनलाईन लोकमत
गडचिरोली : नक्षलविरोधी अभियानामुळे सीमेवरील लष्कराप्रमाणे असुरक्षित जीवन असतानाही गडचिरोली पोलीस दलात भरती होण्यासाठी बेरोजगार युवक-युवतींनी झुंबड केली आहे. अवघ्या १२९ पदांच्या या भरतीसाठी तब्बल २८ हजार १७० अर्ज आॅनलाईन पद्धतीने भरण्यात आले आहेत. यावरून जिल्ह्यात बेरोजगारीची समस्या किती भीषण आहे याची कल्पना येते.
राज्याच्या गृह विभागाकडून यावर्षी गडचिरोली पोलीस दलात शिपाई पदाच्या भरतीसाठी ९ मार्चपासून प्रत्यक्ष शारीरिक क्षमता चाचणीला सुरूवात होणार आहे. सर्व चाचण्यांमध्ये उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची गुणवत्ता यादी प्रकाशित करून नंतर लेखी परीक्षा घेतली जाणार आहे.
जिल्ह्यात शिपाई पदासाठी १२९ जणांची भरती होणार आहे. त्यात ज्या प्रमाणात उमेदवारांनी अर्ज भरले आहे त्यावरून एका पदामागे २१८ उमेदवारांची अर्ज भरल्याचे दिसून येते. पोलीस विभाग या भरतीच्या तयारीला लागला आहे.
१२९ पदांपैकी खुल्या गटासाठी ९९, अनुसूचित जाती प्रवर्गासाठी १४ व इतर प्रवर्गासाठी पद निश्चित केले आहेत. त्यात पुरूष ४२ तर महिलांसाठी ३९ पद राखीव आहेत. याशिवाय खेळाडूंसाठी ६, प्रकल्पग्रस्तांसाठी ६, भूकंपग्रस्तांसाठी २, माजी सैनिकांसाठी १९, अंशकालीन पदवीधरांसाठी ६, पोलीस पाल्यांसाठी ३ आणि होमगार्ड जवानांसाठी ६ पद राखीव राहणार आहेत.
४६२ अधिकारी-कर्मचाऱ्यांचा सहभाग
पोलीस भरतीची ही प्रक्रिया निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी पोलीस विभागाकडून ४६२ पुलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडे वेगवेगळी जबाबदारी सोपविण्यात आली आहे. त्यात अपर पोलीस अधीक्षक १, उपविभागीय पोलीस अधिकारी ४, सहायक पोलीस निरीक्षक आणि उपनिरीक्षक ५५ या अधिकाऱ्यांसह पुरूष कर्मचारी १५२ आणि महिला पोलीस अधिकारी व कर्मचारी २४० आदींचा सहभाग राहणार आहे.
पहिल्या दिवशी एक हजार उमेदवार
प्रभारी पोलीस अधीक्षक माहेश्वर रेड्डी यांनी सांगितले की भरतीसाठी इच्छुक उमेदवारांची संख्या जास्त आहे. त्यामुळे पहिल्या दिवशी एक हजार उमेदवारांची चाचणी घेतली जाईल. त्यानंतर उमेदवारांची संख्या वाढविली जाईल. आरएसआयडी तंत्रज्ञानाचा उपयोग या प्रक्रियेत केला जाईल, असेही त्यांनी सांगितले.

Web Title: 28 thousand applications for 12 posts!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.